भारताच्या सियाचीन सीमेवर असलेल्या सैनिकांना प्राणवायू मिळावा, यादृष्टीने ‘प्राणवायू प्रकल्प’ उभारण्यासाठी दिवंगत योगेश चिथडे आणि श्रीमती सुमेधा चिथडे तळमळीने अन् जिद्दीने प्रयत्न करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो’, या वचनाला अनुसरून देशहिताविषयी सतत विचार करणार्या श्रीमती सुमेधा चिथडे यांनी देशप्रेम म्हणजे काय ? राष्ट्र्रहितासाठी सरकार काय करणार ? याहून मी काय करू शकते ?, याविषयी स्वतःच्या कृतीतून सर्व भारतियांसाठी आदर्श धडा घालून दिला आहे. या कार्यासाठी त्यांनी त्यांचे सोणेनाणेही विकले. या कार्यासाठी त्यांचे पती दिवंगत योगेश चिथडे आणि श्रीमती सुमेधा चिथडे यांना ‘स्वयं गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवास्पद कार्याविषयी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. ‘यू ट्यूब’वरील ‘स्वयं टॉक्स’ या कार्यक्रमात नुकताच श्रीमती सुमेधा चिथडे यांच्याशी त्यांच्या कार्याच्या संदर्भात वार्तालाप करण्यात आला. त्यात त्यांनी मांडलेली सूत्रे या लेखात वाचकांसाठी येथे देत आहोत.
(भाग १)
१. सैनिकांसाठी धडपड करण्यामागील उद्देश !
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या संस्कारात मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे ‘जीवन जगणे व्हावे, हा मंत्र माझ्या वडिलांनी माझ्यावर ठसवला. ‘देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो.’ हे देणे देण्याचा मार्ग मी शोधायचा प्रयत्न केला. हे आवर्जून सांगण्याचे कारण की, भौतिकतेने आलेल्या समृद्धीच्या पलीकडची समृद्धी आली, तर ती व्यक्ती श्रीमंत समजावी. सौंदर्य हे कृत्रिमतेचे नसावे, तर उत्तम विचारांचे असावे आणि ते उत्तम कृतीमध्ये उतरले पाहिजे. याअर्थी मी स्वतःला श्रीमंत समजते. माझे वैयक्तिक आयुष्य मी अशा जीवन सहकार्याशी जोडले की, त्यांनी वायूदलामध्ये राष्ट्राची सेवा केली आहे. मी अशा एका सैनिकी अधिकार्याची आई आहे, जो आता राष्ट्रसेवेमध्ये आहे. गेली २४ वर्षे माझे पती आणि मी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काहीच करावे लागले नाही; परंतु मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले योगदान आपण दिले पाहिजे. ही धडपड या कार्यामागील कारण आहे.
२. सियाचीन येथील प्राणवायू प्रकल्पाच्या नामफलकावर ‘चिथडे’ यांच्या नावाचा उल्लेख नसणे
मी सियाचीनमध्ये प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे कार्य केले. (तेथील प्रकल्पाच्या नामफलकावर ‘चिथडे’ नावाचा उल्लेख नाही.) आमच्या घरात सैन्यसेवेची पार्श्वभूमी होती; म्हणून मी हे कार्य केले नाही. मी स्वतः शिक्षकी पेशातील आहे. माझ्या २८ वर्षांच्या अनुभवातून माझ्या लक्षात आले की, राष्ट्र्रभक्ती, सेवा आणि प्रेम हे आता बहुतांशी हद्दपार झालेले आहे. कुठलीही गोष्ट दुसर्याने कशी करावी ? अशी टीका करण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा ‘ज्या गोष्टीविषयी आपण काय करू शकतो ?’, असे वाटते, ते करणे महत्त्वाचे आहे’, असे मला वाटले.
राष्ट्राच्या पुढे कोणतीही व्यक्ती मोठी नाही, तर राष्ट्र मोठे आहे. त्यामुळे स्वतः पलीकडे जाऊन ‘आधी राष्ट्र प्रथम’ हा विचार झालाच पाहिजे. ‘ऑनर, वेलफेअर आणि सेफ्टी’ ही सैन्यदलाची विचारधारा आहे, म्हणजे राष्ट्राचा सन्मान, कल्याण आणि सुरक्षितता प्रथम असली पाहिजे. ज्यांच्या समवेत माझे पती काम करतात, त्यांचे युनिट आणि त्यांची रेजिमेंट त्यांची सुरक्षितता हे दुसरे अन् सगळ्यात शेवटी स्वतःची सुरक्षितता, स्वतःचा सन्मान आणि स्वतःचे जगणे हे येते. हा विचार करायला लागल्यावर माझ्या असे लक्षात आले की, माझे जगणे हे याच्या अगदी उलट आहे. मी सामान्य स्त्री म्हणून विचार केला, तर आधी ‘माझे घर’ आणि ‘माझा संसार’ न संपणारा आहे.
मनमोकळेपणाने सांगायचे, तर मला असे जीवन जगायचे नव्हते. माझ्या वडिलांना मी सांगितले होते की, लग्न कर आणि संसार कर, यासाठी कृपया माझ्या मागे लागू नका. माझे वडील जुन्या विचारांचे होते. मग मी त्यांना एक चांगली अट घातली की, मला सैन्यदलातील व्यक्तीशी लग्न करायचे आहे. मी संसारामध्ये रमणारी व्यक्ती नाही. मग माझी माझ्या पतींशी ओळख झाली. ते त्यांची वायूदलातील सेवा संपवून नुकतेच परत आले होते. त्या वेळी मी त्यांना एक चांगली अट घातली की, माझ्याकडून कोणत्याही प्रापंचिक अपेक्षा ठेवू नका. याला तुमची मान्यता असेल, तरच मी तुमच्याशी लग्न करायला सिद्ध आहे. आज त्याचे स्वरूप या कामाच्या निमित्ताने उभे राहिले. २४ वर्षे अव्याहतपणे मला आनंद आहे की, आमच्यातील प्रपंच संपला आहे. नाहीतर मग संसारातील देणे आणि घेणे हा प्रवास आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, तेथे ‘आपण काहीतरी दिले की, काहीतरी मला हवे आहे’, अशी बहुतेकांची भावना असते. येथे मला केवळ सैनिकांसाठी काम करायचे होते. जे सैनिक ३६५ दिवस २४ घंटे स्वतः पलीकडे जाऊन राष्ट्राची सेवा करतात, ते कधीही स्वतःला ‘प्रोजेक्ट’ करत नाहीत, कोणतीही तक्रार करत नाहीत, ते कधी संपावर जात नाहीत; पण त्यांचे कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या या कर्तव्यावर मी पुष्कळ प्रेम करते आणि त्यांच्याकडून शिकते.
३. प्राणवायू प्रकल्प उभारण्यामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यांवर केलेली मात
भारतामध्ये शौर्यासाठी ‘परमवीर चक्र’ हा सर्वाेच्च पुरस्कार दिला जातो. वर्ष १९५० पासून तो २१ जणांना देण्यात आला आहे; पण त्यापैकी आज केवळ तीनच जण जीवित आहेत. त्यातील एक वर्ष १९९९ मधील कारगील युद्धातील योगेंद्रसिंग यादव, दुसरे रायफलमॅन संजयकुमार आणि तिसरे माननीय कॅप्टन बालासिंह ! जगातील सर्वाेच्च रणभूमी सियाचीन ही आहे. तेथे समुद्रसपाटीपासून २१ सहस्र १५३ फुटांवर चौकी कैद होती. ती चौकी भारतामध्ये परत आणण्यासाठी माननीय कॅप्टन बालासिंग यांनी त्यांचे सर्वस्व अर्पण केले. (या तिघांना आम्ही पुणे येथे एका कार्यक्रमात व्यासपिठावर आमंत्रित केले होते.) रणभूमी कशी असते ? याची आपल्याला कल्पना नसावी. सियाचीनमध्ये वर्षभर ३० ते ३५ फूट बर्फ, ६० ते ८० किलोमीटर वेगाने वहाणारा वारा, तेथे काही फुटांवरचेही दिसत नाही. मेंदू गारठणे, हिमबाधा, विस्मरण होणे, वजन घटणे, या सगळ्या गोष्टी सैनिकांना सहन कराव्या लागतात. समुद्रसपाटीपासून अत्यंत उंचीवर असल्यामुळे तेथील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अल्प असते.
४. सियाचीन येथे प्राणवायू प्रकल्प उभारण्यामागील प्रेरणा
सियाचीनच्या भूमीविषयी पुष्कळ वाचले होते; पण प्राणवायू नाही, हे मला पचले नाही. हवा नसतांना आपले सैनिक कसे जगत असतील ? मी कॅप्टन बालासिंह यांना विचारले की, तुम्ही सांगा, मी काय करू शकते? ते म्हणाले, ‘‘बहनजी, तेथे श्वास घेणे कठीण आहे. जर आपल्याला खरोखरच काही करायचे असेल, तर आमच्या सैनिकांच्या श्वासासाठी काही करता येईल, तर करा.’’ त्यांचे हे वाक्य अगदी माझ्या आतपर्यंत गेले. मग मी माझ्या पतीच्या मागे लागले. वर्ष २०१५ पासून आम्ही प्राणवायूसाठी काय करू शकतो, याचा केवळ अभ्यास करत होतो. एवढ्या उंचीवर उन्हाळ्यामध्ये -३५ (उणे) डिग्री तापमान असते, तर थंडीमध्ये -६० (उणे) डिग्री आणि त्याहून खाली तापमान असते. आपल्याला त्या हवामानाची कल्पनाही येऊ शकत नाही. तेथे काही फुटांवरचे दिसत नाही आणि शस्त्रास्त्रेही काम करत नाहीत, अशी स्थिती असते. कॅप्टन बालासिंह मला सांगायचे की, जेव्हा आम्ही श्वास सोडतो, तेव्हा नाकाच्या खाली बर्फाचे छोटे छोटे तुकडे लागलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ती कैद चौकी कह्यात घेतली. हे शौर्य खरोखरच पुष्कळ मोठे आहे. ते सांगत होते की, ‘बहनजी, तेथे काही दिसत नव्हते, आमचे हात-पाय चालत नव्हते. शस्त्रास्त्रे काम करत नव्हती; कारण आपल्या शरिराच्या हालचालीच गोठून जातात. मग मी ठरवले वाट्टेल ते झाले, तरी हे काम आपल्या हातून झाले पाहिजे. ४ वर्षे सलग अभ्यास केल्यावर आमच्या समोर ‘प्राणवायू निर्मिती प्रकल्प’ हे उत्तर समोर आले.’ तेथील श्वासासाठी आपण ‘प्राणवायू निर्मिती प्रकल्प’ आणि ‘रिफीलिंग सेंटर’ या दोन्ही गोष्टी चालू करायला हव्यात.
आम्हाला मुंबईकरांचा पाठिंबा आहे. एका कार्यक्रमासाठी मी मुंबईला गेले असतांना एका आजींकडे गेले. तेथे जातांना आमचे भ्रमणभाषवरील बोलणे त्यांच्या घरातील मावशीने ऐकले. तिने मला भेटायची इच्छा व्यक्त केली. मी गेल्यावर मावशी मला म्हणाली, ‘‘काकू, मी तुम्हाला सैनिकांना देण्यासाठी पैसे देऊ का ?’’ मी म्हटले, ‘‘तुझी इच्छा !’’ माझ्यासमोर ती मावशी आजींना म्हणाली, ‘‘मला वर्षभराचे वेतन देऊ नका.’’ ‘दातृत्व’ हा गुण आहे. या कामामुळे मी श्रीमंत-गरीब आणि गरीब-श्रीमंत माणसे पुष्कळ अनुभवली. आपल्याकडे पुष्कळ आहे; पण आपली देण्याची इच्छा हवी आणि तो दातृत्वाचा संस्कारही हवा.
काही लोक विचारतात की, ‘तुम्ही हे का करता ? सरकार करील की !’ मला प्रश्न पडतो की, हे राष्ट्र आपले नाही का ? सरकार का करत नाही ?, हा प्रश्न कुणाशी संबंधित आहे, तर सरकारशी ! त्यासाठी सरकारला पाठपुरावा करून विचारले पाहिजे. माझ्याशी संबंधित प्रश्न असेल, तर मला विचारता येईल. मला सैनिकांसाठी जगायचे आहे; म्हणून मी हे करते. मी एका वृद्धाश्रमात गेले होते. माझे बोलणे संपल्यावर एक आजी हातात पैसे घट्ट धरून घेऊन आल्या. मला म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे केवळ २२ रुपये आहेत. मुलांनी खाऊसाठी दिले होते. तुम्ही घ्याल का ?’’ माझ्यासाठी ते पैसे म्हणजे २२ कोटी रुपये होते.
– श्रीमती सुमेधा चिथडे, पुणे.
संकेतस्थळ : sirf.org.in
(साभार : ‘स्वयं टॉक्स’ कार्यक्रम)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/850938.html
संपादकीय भूमिकाऑक्सिजनचे प्रमाण अल्प असलेल्या सियाचीनसारख्या प्रतिकूल ठिकाणी तैनात राहून राष्ट्ररक्षण करणार्या सैनिकांचे महत्त्व जाणा ! |