दीपावली विशेष !
३ नोव्हेंबर या दिवशी भाऊबीज झाली. भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी येते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन् बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते. प्रत्येक बहीण भावाला ओवाळते. या औक्षणातून भावाला आणि बहिणीला देवतेचे चैतन्य ग्रहण करण्याची संधी असते. भाऊ बहिणीला ‘नेहमी तुझ्या पाठीशी सक्षमपणे उभा राहीन’, असे आश्वासन देतो. बहीण भावाच्या नात्यात प्रेमासमवेत रुसवे फुगवे झाले, तरी एक प्रकारे मैत्रीचे नातेही असते. रक्ताचे नाते असल्याने भावाबहिणींना एकमेकांविषयी एक अनामिक आपुलकी असते. एकमेकांना जीव लावणे, चुका सांगणे, साहाय्य करणे यांतून हे नाते फुललेले असते.
भावा-बहिणीच्या प्रेमाचे हे ऐतिहासिक महत्त्व पहाता एक प्रश्न पडतो की, खरंच आज आमच्या बहिणी सुरक्षित आहेत का ? महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदु युवती आणि महिला असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या चालूच आहेत. त्यामुळे या योजनेच्या समवेत ‘बहिणींना सुरक्षा द्या !’, ‘बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा’, अशा मागण्या देशभरात जोर धरत आहेत. यासाठी सहस्रोंच्या संख्येने अनेक मोर्चेही अनेक ठिकाणी काढण्यात आले आहेत. लक्षावधी हिंदु मुलींना आतापर्यंत लक्ष करण्यात आलेले आहे. श्रद्धा वालकर, उरण येथील कु. यशश्री शिंदे यांच्या अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणार्या हत्या करण्यात आल्या. महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एकामागे एक हत्येच्या घटना घडत असतांना समाज मात्र तात्पुरता शोक व्यक्त करतो. हे समाजाच्या प्रेतवत् मानसिकतेचे प्रतीक आहे. स्वतःमध्ये क्षात्रतेज जागवून शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सबळ होऊन आपण आपल्या भगिनींचे रक्षण केले पाहिजे. भगिनींनाही स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. प्रत्येक तरुणाने एका तरुणीचे ‘माझी लाडकी बहीण’ म्हणून रक्षण करण्याचे दायित्व घ्यायला हवे आणि तिला लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सांगायला हवे, हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव