उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. नारायण जोशी हा या पिढीतील एक आहे !
उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नारायण प्रतीक जोशी याचा २.११.२०२४ (बलीप्रतिपदा) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. नारायण यास प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. विवाहापूर्वी आईला देवाची आवड असणे आणि विवाहानंतर तिने साधना अन् सेवा करण्यास आरंभ करणे
‘लग्नाच्या आधी मला देवाची आवड आणि देवावर विश्वास होता. तेव्हा मी व्रत, पूजा आणि उपवास करायचे. लग्नानंतर मला सनातनच्या साधनेविषयी समजले आणि मी ‘कुलदेवी’ आणि ‘श्री दत्तगुरु’ यांचा नामजप करू लागले. अध्यात्माविषयी समजल्यावर मी धर्माचरण करणे चालू केले आणि मला सात्त्विकतेची ओढ वाटू लागली. नंतर मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाऊन साधना आणि सेवा करायला चालू केले.
२. गर्भधारणा झाल्यावर
२ अ. रज-तम गोष्टी टाळून सात्त्विक वेशभूषा करणे आणि सात्त्विक आहार घेणे : गर्भधारणा झाल्यावर बाळाला सात्त्विकता मिळावी; म्हणून मी आहार आणि दिनचर्या यांत पालट केले. मी दूरचित्रवाणी संचावर दाखवले जाणारे कार्यक्रम आणि चित्रपट पहाणे बंद केले. मी सात्त्विक वेशभूषा आणि आहार स्वीकारला. मला आठवा महिना लागेपर्यंत मी आश्रमात जाऊन सेवा करत होते.’
– सौ. श्रेया प्रतीक जोशी (चि. नारायणची आई)
२ आ. चैतन्य आणि सात्त्विकता आवडणे : ‘एका साधिकेने मला सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा ग्रंथ वाचायला दिला. त्यातून मला ‘पुष्कळ चैतन्य मिळाले’, असे जाणवले. नामजपादी उपाय करतांना मला बाळाची पुष्कळ हालचाल जाणवायची. मी पोटावर हात ठेवून नामजप करायचे. तेव्हा ‘बाळ अधिक हालचाल करून पोटात फिरत आहे’, असे मला वाटायचे. ‘बाळाला नामजप, सेवा आणि आश्रमातील महाप्रसाद पुष्कळ आवडतो’, असेही माझ्या लक्षात आले.’
– सौ. श्रेया प्रतीक जोशी
३. जन्मानंतर
३ अ. वय – १ ते ३ मास
३ अ १. संतांचे दर्शन होणे : ‘गुरुकृपेने आणि पूर्वपुण्याईने अगदी लहान वयातच नारायणला अनेक संतांचे दर्शन अन् आशीर्वाद लाभले आहेत.
३ अ २. नारायणची पहिली आश्रमभेट ! : नारायण २ मासांचा झाल्यावर आम्ही त्याला पहिल्यांदाच देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात घेऊन गेलो होतो. आश्रमात त्याला प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चारचाकी गाडीजवळ नेले. तेव्हा तो झोपेत होता, तरीही त्याने २ वेळा स्मितहास्य केले. आम्ही घरी गेल्यावर त्याच्या आजीने विचारले, ‘‘तुला प.पू. भक्तराज महाराज भेटले का ?’’ तेव्हा त्याने होकारार्थी मान डोलवली.
३ अ ३. श्रीरामाची ओढ असणे : श्रीरामाचा पाळणा लावल्यावर नारायणचे रडणे त्वरित थांबत असे. श्रीरामनवमीला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीरामाचे चित्र नारायणला दाखवल्यावर तो चित्राकडे एकटक बघून आनंदी होत असे.
३ आ. वय – ३ ते ९ मास
३ आ १. श्रीकृष्णाचे चित्र आवडणे : नारायण श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून आनंदाने हसायचा. त्या वेळी असे वाटायचे की, नारायण आणि श्रीकृष्ण यांच्यात पूर्वीपासूनच नाते जडले आहे.
३ आ २. संतांनी अन्नप्राशन विधी करणे : नारायणचा ‘अन्नप्राशन विधी’ करायचा होता. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. संगीता जाधव यांनी नारायणचा अन्नप्राशन विधी केला. तेव्हा त्यांना बघून नारायणला आनंद होत होता. त्या वेळी सद्गुरु अनुराधाताई यांनी सांगितले, ‘‘नारायणमध्ये दैवी गुण आहेत.’’
३ आ ३. आश्रम आणि साधक आवडणे : आम्ही आश्रमात गेल्यावर नारायण सर्वांकडे जातो आणि खेळतो. त्याला बालसाधक पुष्कळ आवडतात. तो आश्रमात छान रहातो आणि त्याचे सतत निरीक्षण चालू असते.
३ इ. वय – ९ ते १२ मास
३ इ १. प.पू. बाबांचे चित्र पाहून आनंदी होणे : नारायणला प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पहायला आवडते. तो त्यांच्या छायाचित्राकडे एकटक पहातो. तेव्हा तो पुष्कळ आनंदी असतो.
– सौ. श्रेया आणि श्री. प्रतीक जोशी (चि. नारायणचे आई-वडील), नवीन पनवेल, रायगड. (१०.१०.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |