Saudi Arabia Death Penalty : सौदी अरेबियाने एका पाकिस्‍तानी नागरिकासह ७ जणांना दिली फाशी !

यावर्षी आतापर्यंत २३६ जणांना देण्‍यात आली फाशी

प्रतिकात्मक छायाचित्र

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियात ७ गुन्‍हेगारांना फाशी देण्‍यात आली. यांपैकी ५ जणांना अमली पदार्थांच्‍या तस्‍करीच्‍या, तर २ जणांना अन्‍य प्रकरणांमध्‍ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्‍यात आली होती. फाशी देण्‍यात आलेल्‍यांपैकी एक पाकिस्‍तानी नागरिक होता, तर सौदी अरेबियाचे २ आणि ४ जण येमेनचे नागरिक होते.

सौदीमध्‍ये यावर्षी आतापर्यंत २३६ जणांना फाशी देण्‍यात आली !

सौदी अरेबियामध्‍ये यावर्षी म्‍हणजेच वर्ष २०२४ मध्‍ये आतापर्यंत फाशीची शिक्षा झालेल्‍यांची संख्‍या २३६ वर पोचली आहे. यांपैकी ७१ जणांना अमली पदार्थांच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणी फाशी देण्‍यात आली आहे. युद्धग्रस्‍त सीरिया आणि लेबनॉन या देशांमधून येणार्‍या ‘कॅप्‍टॅगॉन’ या अमली पदार्थासाठी सौदी अरेबिया प्रमुख बाजारपेठ बनले आहे. सौदी सरकारने याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. २ वर्षांपूर्वी सौदीमध्‍ये अमली पदार्थांच्‍या प्रकरणात मृत्‍यूदंडावर असलेली बंदीही रहित करण्‍यात आली.

सर्वाधिक गुन्‍हेगारांना फाशी देणार्‍या देशांमध्‍ये सौदी अरेबिया तिसर्‍या क्रमांकावर

अ‍ॅम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेने म्‍हटले आहे की, सौदी अरेबियाने चीन आणि इराण या देशांनंतर वर्ष २०२३ मध्‍ये जगातील तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक गुन्‍हेगारांना फाशी दिली. फाशीच्‍या शिक्षेचा वापर केल्‍याबद्दल सौदी अरेबियावर मानवी हक्‍क गटांकडून सातत्‍याने टीका केली जाते. ‘सार्वजनिक सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी फाशीची शिक्षा आवश्‍यक आहे’, असे सौदीकडून काही काळापूर्वी सांगण्‍यात आले होते.

संपादकीय भूमिका

कायद्याचा धाक असल्‍यावरच नागरिक गुन्‍हे करण्‍याचे टाळतात. भारतात कायद्याचा धाकच नसल्‍याने देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीन तेरा वाजले आहेत. आता भारतानेही कठोर कायदे करण्‍यासह त्‍यांची कार्यवाहीही तितक्‍याच कठोरपणे केली पाहिजे !