३० कोटी रुपयांहून अधिक निधीचा वापर केला नसल्याचा ठपका
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय असून रुग्णालयात गरीब रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींहून अधिक निधीचा उपयोग केला नसल्याचा ठपका धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. याच रुग्णालयामध्ये पैशांअभावी गर्भवती तनिषा भिसे या मातेवर तातडीने उपचार न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून वाद निर्माण झाला होता. (याच्याशी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णासाठींच्या नियमावलींचे पालन केले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. अहवालामध्ये संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
आधुनिक वैद्यांवर २० सहस्र रुपये घेतल्याने गुन्हा नोंद !
लवळे येथील सिंबायोसिस युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या आधुनिक वैद्य प्रवीण लोहोटे यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘महिला रुग्णाची प्रकृती गुंतागुंतीची असून, तात्काळ उपचार करावे लागतील. पैसे भरले नाहीत, तर रुग्ण दगावू शकतो’ अशी भीती घालून शस्त्रक्रियेसाठी २० सहस्र रुपये घेतले. धर्मादाय आयुक्तालयाकडे रुग्णालयाची नोंद असूनही पैसे घेतले, असा आरोप रुग्णाच्या पुतण्याने, तसेच नातेवाइकांनी केला आहे.