Durga Prasai Arrested : नेपाळमध्ये राजेशाहीचे समर्थक श्री. दुर्गा प्रसाई यांना अटक !

श्री. दुर्गा प्रसाई (मध्यभागी)

काठमांडू (नेपाळ) – देशात राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी करणार्‍या आंदोलकांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या प्रकरणी श्री. दुर्गा प्रसाई यांना नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. ८ मार्च या दिवशी हे आंदोलन झाले होते. दुर्गा प्रसाई यांना त्यांच्या अंगरक्षकासह भारताच्या सीमेवरील झापा जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

१. यापूर्वी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे सरचिटणीस धवल शमशेर राणा आणि उपाध्यक्ष रवींद्र मिश्रा यांच्यासह ६० हून अधिक लोकांना आंदोलनात सहभागी झाल्याविषयी अटक करण्यात आली होती.

२. काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ‘राज्य गुन्हे आणि संघटित गुन्हेगारी’च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई चालू केली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

३. गेल्या महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह २ जणांचा मृत्यू झाला होता. नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापित करण्याच्या मागणीच्या वेळी हा हिंसाचार झाला होता.

४. घटनात्मक राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांची पुनर्स्थापना हा देशाच्या समस्यांवर उपाय आहे, असा आंदोलन करणार्‍यांचा दावा आहे. वर्ष २००८ मध्ये नेपाळमध्ये २४० वर्षांची राजेशाही राजवट संपुष्टात आली होती. आता राजेशाही परत आणण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.