साधिका रुग्णाईत असतांना त्यांची मनापासून सेवा करणारा मुलगा आणि सून यांची त्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘एप्रिल २०२४ मध्ये एकदा माझ्या पोटात कळा येऊ लागल्या. आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार मडगाव येथील एका रुग्णालयात माझे पित्ताशय काढण्याचे शस्त्रकर्म झाले. त्यानंतर मी काही दिवस रुग्णाईत होते. माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर मी आमच्या ढवळी (फोंडा, गोवा) येथील घरी विश्रांतीसाठी गेले होते. तेव्हा माझा सुपुत्र श्री. स्वप्नील भोसले आणि माझी सून सौ. तृप्ती स्वप्नील भोसले यांनी माझी सुमारे एक ते दीड मास पुष्कळ सेवा केली. त्या कालावधीत मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले

१. श्री. स्वप्नील भोसले (मुलगा) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. स्वप्नील भोसले

१ अ. सर्वतोपरी साहाय्य करून आई-वडिलांना आधार देणे : ‘स्वप्नीलने मला शस्त्रकर्मासाठी फोंड्याहून मडगावला नेले. शस्त्रकर्म चालू असतांना तो त्याच्या बाबांच्या समवेत थांबून त्यांना मानसिक आधार देत होता. माझे शस्त्रकर्म झाल्यावर मी ३ – ४ दिवस रुग्णालयात होते. तेव्हा तो मला काय हवे-नको ते विचारत होता. त्याची प्राणशक्ती पुष्कळदा अल्प असते, तरीही त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली. त्यामुळे मला आणि माझ्या यजमानांना त्याचा पुष्कळ आधार वाटला.’

२. सौ. तृप्ती स्वप्नील भोसले (स्नुषा) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये    

सौ. तृप्ती भोसले

२ अ. प्रेमभाव : ‘मला तीव्र वेदना होत असल्यामुळे गुंगी येणार्‍या वेदनाशामक गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे माझा तोल जात असे. तेव्हा तृप्ती तत्परतेने माझा हात धरून मला प्रसाधनगृहापर्यंत जाण्यासाठी साहाय्य करत होती. मला रात्री अधिक वेळा प्रसाधनगृहात जावे लागत होते. त्यामुळे तिला रात्रीची झोपही व्यवस्थित मिळत नव्हती; पण तिने कधीच त्याविषयी गार्‍हाणे केले नाही.

२ आ. स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून मनोभावे सेवा करणे : या कालावधीत तृप्तीचे पाय पुष्कळ दुखत होते, तरीही तिने माझी काळजी घेतली. मला काही खावेसे वाटले, तर तिने त्वरित माझ्यासाठी पथ्यानुसार पदार्थ बनवून दिले. ‘माझे कपडे धुऊन वाळत घालणे, घरातील अन्य कामे करणे’, हे सर्व तृप्ती स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून मनापासून करत होती. ‘माझे केस धुऊन देणे, माझ्याशी मनमोकळेपणाने बोलून माझे मन हलके करणे’ इत्यादी सर्व साहाय्य ती अतिशय प्रेमाने करत होती.

‘मी रुग्णाईत असतांना माझी मनापासून काळजी घेऊन धीर देणारा मुलगा आणि सून मला लाभले अन् अन्य कुटुंबियांनीही मला साहाय्य केले’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२४)