
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तमिळ भाषेत बोलणार्या साधकाची भाषा समजत नसूनही त्याचे बोलणे कुतूहलाने ऐकून त्याला मान हलवून प्रतिसाद देणे

‘एकदा प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) सत्संगात मी आणि दक्षिण भारतातील काही साधक उपस्थित होतो. ‘सत्संगात सर्वांनी हिंदी भाषेत बोलावे’, असे सांगण्यात आले होते. उपस्थितांपैकी एका साधकाला केवळ ‘तमिळ’च भाषा येत होती. त्याला हिंदी अथवा इंग्रजीही येत नव्हते. तो प.पू. डॉक्टरांच्या समवेत बोलतांना ‘तमिळ’ भाषेमध्ये बोलू लागला. त्याच्या शेजारचा साधक त्याचे बोलणे हिंदी भाषेमध्ये अनुवाद करून सांगत होता. तो साधक तमिळ भाषेत बोलतांना प.पू. डॉक्टर त्याचे बोलणे पुष्कळ कुतूहलाने ऐकत होते. ते त्याचे प्रत्येक वाक्य ऐकून त्याला मान हलवून प्रतिसाद देत होते. तेव्हा ‘जणू गुरुदेवांना तो बोलत असलेली ‘तमिळ भाषा’ समजत आहे’, असे मला वाटत होते.
२. ‘सर्वज्ञ’ असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्या तमिळ भाषिक साधकाची बोलीभाषा नव्हेे, तर त्याच्या हृदयातील भावभाषा जाणून त्याला प्रतिसाद देणे
त्या वेळी प.पू. गुरुदेवांकडे पाहिल्यावर मी बुद्धीने विचार केला, ‘गुरुदेवांना तमिळ भाषा कशी कळत असेल ?’; परंतु तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेव त्या साधकाची बोलीभाषा नव्हे; तर त्याच्या अंतरातील भावभाषा ऐकत होते आणि ते ‘सर्वज्ञ’ असल्याने त्यांना ते सर्व कळत होते.’ यातून मला ‘गुरुदेव बोलीभाषेच्या पलीकडे जाणणारे असून साक्षात् परब्रह्मस्वरूप आहेत’, याची अनुभूती आली. त्या साधकालाही आश्वस्त करण्यासाठी गुरुदेव त्याला स्थुलातून मान हलवून प्रतिसाद देत होते.
३. प.पू. गुरुदेवांशी बोलतांना ‘शब्द’ नव्हेत, तर ‘भाव’ महत्त्वाचा असणे
‘प.पू. गुरुदेवा, प्रत्येक जिवावर तुमची किती ही प्रीती ! तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक भिन्न भाषिक आणि भिन्न वयोगटातील, इतकेच नव्हे, तर मुके-बहिरे कुणीही असो, त्याच्या अंतरातील भावभाषा तुम्हाला समजते.’
तेव्हा ‘गुरुदेवांशी बोलतांना ‘शब्द’ नव्हेत, तर ‘भाव’ महत्त्वाचा आहे’, हे मला शिकायला मिळाले. यासाठी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– परात्पर गुरुदेवांची, कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (१८.७.२०२४)