श्री. प्रीतम नाचणकर आणि श्री. सागर गरूड, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज – यापूर्वी झालेल्या cमेळ्यात धर्मसंसदेत सर्व संतांनी अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्याची मागणी केली होती. त्यामुळेच ते कार्य पूर्णत्वास गेले. या महाकुंभमेळ्यात होणार्या धर्मसंसदेत सर्व संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आणि वक्फ मंडळ रहित करणे, या मागण्या कराव्यात, असे आवाहन कर्नाटकमधील उडपी येथील पलिमारून पीठाचे मठाधिपती १००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
१००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी पुढे म्हणाले,
१. हिंदूसाठी केवळ भारत हा एकच देश आहे. अन्य धर्मियांसाठी अनेक देश आहेत. अन्य धर्मीय भारत सोडून गेले, तर त्यांचे अन्य देशात स्वागत होईल. हिंदूसाठी भारताविना कोणताच देश नाही; म्हणून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायलाच हवे.
२. भारत महान देश आहे. ही भूमी म्हणजे केवळ माती नाही. भारतातील नद्यांचे जल हे तीर्थ आहे. अन्य देशांतही नद्या आहेत; परंतु तेथे कुणी स्नान करत नाही. केवळ भारतातच अशा पवित्र नद्या आहेत. प्रयागराजमध्येही स्नानासाठी कोट्यवधी भाविक येतात.
३. भारतात सर्वांसाठी एकच कायदा असावा. मुसलमान, ख्रिश्चन यांना वेगळे नियम आणि हिंदूंसाठी वेगळे नियम, असे का ? भारताचे आधारकार्ड असणार्या सर्वांना समान नियम असायला हवेत. यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून ‘समान नागरी कायदा’ आणायला हवा.
४. वक्फ मंडळ म्हणेल ती भूमी त्यांना मिळते, ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे आता वक्फ मंडळ कायमचे रहित करून सनातन मंडळाची निर्मिती करावी.
५. मुसलमान धर्माविषयी कुणी काही बोलले की, बोलणार्यास धर्मांध ठार मारतात; मात्र सनातन धर्माला कितीही दुषणे दिली, तरी सहिष्णु हिंदू काही करत नाहीत. भारतात राहून हिंदु धर्माविषयी चुकीचे बोलणे, हे महत पाप आहे. सनातन धर्माविषयी चुकीचे बोलेल, त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. तसा कायदा करावा, अशी मागणी महाकुंभच्या निमित्ताने आम्ही सरकारकडे करत आहोत.
६. देशातील सर्व सरकारीकरण केलेली मंदिरे ही भक्तांच्या कह्यात द्यायला हवीत. कोरोनाकाळात सर्व मंदिरांतील पूजाविधी भक्तच करत होते. त्या वेळी सरकारचे अधिकारी का आले नाहीत ? भक्तांकडेच मंदिरे सुरक्षित आहेत. सरकारने मंदिरांच्या कारभारात हस्तक्षेप करू नये.
सनातन प्रभातच्या कार्यात उत्तरोत्तर प्रगती होवो ! – महंत श्री विद्याधीश तीर्थस्वामी
‘सनातन प्रभात’ नियतकालिकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना १००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी म्हणाले, ‘‘सनातन प्रभात’ हे अतिशय चांगले वृत्तमाध्यम आहे. सनातन धर्माविषयी झोपलेल्यांना जागृत करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करते. सनातनच्या या कार्याचे आम्ही स्वागत करतो, आशीर्वाद देतो, तसेच ‘सनातन प्रभात’च्या कार्यात उत्तरोत्तर प्रगती होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’’