सनातन संस्‍थेला दैवी ज्ञान मिळणारे साधक प्राप्‍त होण्‍यामागील कारणे !

‘पुढील गुणांमुळे सनातन संस्‍थेला दैवी ज्ञान मिळणारे सुश्री (कु.) मधुरा भोसले, श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) हे तीन साधक मिळाले आहेत. त्‍यामागील आध्‍यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या तीन साधकांमध्‍ये दैवी ज्ञान प्राप्‍त करण्‍यासाठी आवश्‍यक असणारे विविध गुण असल्‍यामुळे ते सनातन संस्‍थेला मिळाले असणे

दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या तीन साधकांनी विविध योगमार्गानुसार साधना केल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये धर्म आणि अध्‍यात्‍म यांतील विविध अंगांचे ज्ञान प्राप्‍त करण्‍याची उपजतच क्षमता आहे. दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांमध्‍ये ‘जिज्ञासा, तळमळ, दैवी ज्ञान ग्रहण करण्‍याची क्षमता असणे’ इत्‍यादी अनेक गुण आहेत.

१ अ. दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांचे गुण आणि त्‍यांचे प्रमाण   

टीप १ – सुश्री (कु.) मधुरा भोसले यांचा प्रमुख साधनामार्ग भक्‍तीयोग असल्‍यामुळे त्‍यांना मिळणारे ज्ञान अधिक प्रमाणात देवदेवतांशी, म्‍हणजे ईश्‍वराच्‍या सगुण रूपाशी संबंधित असते. त्‍यांच्‍या ज्ञानात्‍मक विश्‍लेषणामध्‍ये त्‍यांच्‍या अंत:करणातील भाव ओतप्रोत भरलेला असतो. त्‍यामुळे त्‍यांचे दैवी ज्ञान वाचत असतांना धर्म आणि अध्‍यात्‍म यांच्‍या विविध अंगांचे शास्‍त्र कळण्‍यासह भावाचे तरंगही वाचकांच्‍या अंतर्मनाला स्‍पर्शून जातात. त्‍यामुळे वाचकांची भावजागृती होते. श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख यांचा प्रमुख साधनामार्ग ज्ञानयोग असल्‍यामुळे त्‍यांना मिळालेल्‍या विश्‍लेषणात्‍मक ज्ञानातून धर्म आणि अध्‍यात्‍म यांच्‍या विविध अंगांचे शास्‍त्र सविस्‍तररित्‍या उलगडते. तिन्‍ही ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना मिळालेले दैवी ज्ञान वाचल्‍यामुळे वाचक आणि जिज्ञासू यांची धर्म अन् अध्‍यात्‍म यांच्‍यावरील श्रद्धा वाढते.

टीप २ – सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्‍यामध्‍ये श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख यांच्‍या तुलनेत सूक्ष्मातून दैवी ज्ञान प्राप्‍त करण्‍याची सेवा करतांना सूक्ष्मातून होणार्‍या वाईट शक्‍तींच्‍या त्रासाला सामोरे जाण्‍याची क्षमता अल्‍प प्रमाणात असल्‍यामुळे तिच्‍यामध्‍ये अन्‍य दोघांच्‍या तुलनेत दैवी ज्ञान प्राप्‍त करण्‍याची क्षमता अल्‍प आहे.

२. कलियुगामध्‍ये ज्ञानशक्‍तीचा प्रसार करून ज्ञानशक्‍तीच्‍या बळावर धर्मसंस्‍थापना करण्‍यासाठी अवतरलेले ज्ञानावतार परात्‍पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍या अवतारी कार्यात सहभागी होऊन योगदान देण्‍यासाठी दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेला मिळाले असणे

श्री. राम होनप

या भीषण कलियुगात धर्मसंस्‍थापना करण्‍यासाठी विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले पृथ्‍वीवर अवतरले आहेत. ते ज्ञानावतार असून त्‍यांच्‍या माध्‍यमातून ज्ञानशक्‍ती कार्यरत होऊन या ज्ञानशक्‍तीच्‍या बळावर पृथ्‍वीवर धर्मसंस्‍थापना होणार आहे. या अवतारी कार्यामध्‍ये सहभागी होऊन दैवी ज्ञान प्राप्‍त करून या अवतारी कार्यात योगदान देण्‍यासाठी कु. मधुरा भोसले, श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख यांचा जन्‍म पृथ्‍वीवर झालेला आहे. हे तिन्‍ही जीव महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेले आहेत.

३. ईश्‍वरेच्‍छेनुसार कलियुगातील सनातनच्‍या ग्रंथसंपदेच्‍या माध्‍यमातून ५ व्‍या वेदाची निर्मिती करण्‍यासाठी दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेला मिळाले असणे

सत्‍ययुगामध्‍ये चारही वेदांचे ज्ञान एकत्रितरित्‍या उपलब्‍ध होते. द्वापरयुगामध्‍ये महर्षि व्‍यासांनी वेदांची चार भागांत विभागणी करून ‘ऋग्‍वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद’, या चार वेदांची निर्मिती केली. काळाच्‍या ओघात या चारही वेदांतील अनेक शाखांचे ज्ञान लुप्‍त झालेले आहे. त्‍यामुळे कलियुगात धर्माला ग्‍लानी आलेली आहे. धर्माची ग्‍लानी दूर करून धर्माची पुनर्स्‍थापना करण्‍यासाठी वेदांचे लुप्‍त झालेले अनमोल ज्ञान पुन्‍हा प्राप्‍त करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. वेदांतील ज्ञान लुप्‍त होऊन ब्रह्मांडपोकळीमध्‍ये सामावले आहे. तेथे वेदांतील ज्ञानाच्‍या लहरी आकाशतत्त्वाच्‍या स्‍तरावर नादरूपाने कार्यरत आहेत. सनातनच्‍या ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांमध्‍ये श्री गुरुकृपेमुळे ब्रह्मांडपोकळीतील नादलहरींच्‍या स्‍वरूपातील ईश्‍वरी ज्ञान विचारांच्‍या रूपाने, म्‍हणजे नादभाषेत ग्रहण करण्‍याची क्षमता निर्माण झालेली आहे. त्‍यामुळे सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक पृथ्‍वीवर लुप्‍त झालेले वैदिक ज्ञान ग्रहण करून त्‍याचे लिखाण करत आहेत. अशाप्रकारे ईश्‍वरी ज्ञानावर आधारित असणारे ‘सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेले ग्रंथ’ म्‍हणजे, ‘कलियुगातील साक्षात् ५ वा वेदच’ आहेत.

४. धर्म आणि अध्‍यात्‍म यांचे शास्‍त्र बुद्धीच्‍या स्‍तरावर जिज्ञासूंना कळावे यासाठी शास्‍त्रीय भाषेत अन् वैज्ञानिक परिभाषेत धर्मशास्‍त्र अन् अध्‍यात्‍मशास्‍त्र समजवण्‍यासाठी ईश्‍वराकडून येणारे दिव्‍य ज्ञान समष्‍टीला देण्‍यासाठी दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेला मिळाले असणे

श्री. निषाद देशमुख

‘धर्म आणि अध्‍यात्‍म यांचे शास्‍त्र बुद्धीच्‍या स्‍तरावर जिज्ञासूंना कळावे’, यासाठी कलियुगात शास्‍त्रीय भाषेत अन् वैज्ञानिक परिभाषेत धर्मशास्‍त्र आणि अध्‍यात्‍मशास्‍त्र समजावणे आवश्‍यक आहे. हे कार्य केवळ दैवी ज्ञान प्राप्‍त करण्‍याची क्षमता असणारे साधकच करू शकतात. त्‍यामुळे ते सनातन संस्‍थेला मिळाले आहेत. दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक विविध धार्मिक विधी, संगीताचे प्रयोग आणि अन्‍य कार्यक्रमांचे सूक्ष्म परीक्षण करतात. त्‍याचप्रमाणे त्‍यांना धर्म, अध्‍यात्‍म आणि दैवीजगत यांच्‍याशी निगडित असणार्‍या विविध अंगांचे ज्ञान उत्‍स्‍फूर्तपणे किंवा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारलेले प्रश्‍न यांच्‍या माध्‍यमातून मिळते. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना अत्‍यंत दुर्मिळ असणारे ज्ञान शास्‍त्रीय परिभाषेत मिळत आहे. त्‍यामुळे या ज्ञानातून सिद्ध झालेले लेख संकेतस्‍थळ आणि ग्रंथ यांच्‍या माध्‍यमातून संपूर्ण पृथ्‍वीवरील अनेक मानवांपर्यंत पोचत आहेत. त्‍यामुळे संपूर्ण पृथ्‍वीवर धर्म आणि अध्‍यात्‍म यांचा प्रसार होऊन अनेक जिज्ञासूंच्‍या मनावर धर्म अन् अध्‍यात्‍म यांचे महत्त्व बिंबून ते धर्माचरण आणि साधना करत आहेत. अशाप्रकारे या ईश्‍वरी ज्ञानामुळे विश्‍वातील अनेक जिवांचा उद्धार होत आहे.

५. ज्ञानप्राप्‍तीच्‍या सेवेच्‍या माध्‍यमातून गेल्‍या जन्‍मी अपूर्ण राहिलेली व्‍यष्‍टी आणि समष्‍टी स्‍तरांवरील साधना पूर्ण करून ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेला मिळाले असणे

दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांची साधना ऋषींप्रमाणे असल्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांच्‍या मागील जन्‍मांमध्‍ये विविध योगमार्गांनुसार अधिक प्रमाणात व्‍यष्‍टी आणि काही प्रमाणात समष्‍टी साधना केलेली आहे. त्‍यांची उर्वरित राहिलेली व्‍यष्‍टी आणि समष्‍टी स्‍तरावरील साधना पूर्ण होण्‍यासाठी ईश्‍वरेच्‍छेने त्‍यांचा संपर्क सनातन संस्‍थेशी करून दिला. सनातन संस्‍थेमध्‍ये शिकवलेल्‍या गुरुकृपायोगांतर्गतच्‍या साधनेमुळे दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा पाया भक्‍कम झालेला आहे. त्‍यामुळे ईश्‍वर त्‍यांच्‍यावर प्रसन्‍न होऊन त्‍यांच्‍याकडून व्‍यष्‍टीसाठी, म्‍हणजे ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी आणि समष्‍टीसाठी, म्‍हणजे धर्मसंस्‍थापना करण्‍यासाठी आवश्‍यक असणारे ईश्‍वरी ज्ञान त्‍यांना देऊन त्‍यांच्‍याकडून व्‍यष्‍टी अन् समष्‍टी साधना करवून घेत आहे. जर दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आले नसते, तर त्‍यांची अपूर्ण राहिलेली व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना या जन्‍मी पूर्ण झाली नसती. दैवी ज्ञान प्राप्‍त करण्‍याच्‍या सेवेच्‍या माध्‍यमातून दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांची गेल्‍या जन्‍मी अपूर्ण राहिलेली व्‍यष्‍टी आणि समष्‍टी स्‍तरांवरील साधना या जन्‍मी पूर्ण होण्‍यासाठी त्‍यांचा संपर्क सनातन संस्‍थेशी आलेला आहे.

६. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अवतार पृथ्‍वीवर सक्रीय असेपर्यंत दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना व्‍यष्‍टी आणि समष्‍टी अशा दोन्‍ही स्‍तरांवर त्‍यांच्‍या मार्गदर्शनाचा लाभ होण्‍यासाठी दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेला मिळाले असणे

जेव्‍हा दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना ईश्‍वराकडून दैवी ज्ञान मिळत असते, तेव्‍हा वाईट शक्‍ती सूक्ष्मातून त्‍यांच्‍यावर आक्रमण करतात आणि त्‍यांच्‍या ज्ञानामध्‍ये चुकीची सूत्रे सांगून ज्ञानामध्‍ये काळी शक्‍ती भरतात. परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे ज्ञानावतार असल्‍यामुळे ते जेव्‍हा साधकांना मिळालेल्‍या दैवी ज्ञानाची सत्‍यता पडताळतात, तेव्‍हा त्‍यांतील चुकीच्‍या ज्ञानाची सूत्रे बाजूला काढतात. त्‍याचप्रमाणे परात्‍पर गुरुदेवांच्‍या नेत्रातून प्रक्षेपित झालेल्‍या चैतन्‍यामुळे ज्ञानाच्‍या धारिकेतील शब्‍दांमध्‍ये साठलेली त्रासदायक शक्‍ती नष्‍ट होते. परात्‍पर गुरु डॉ. आठवले पृथ्‍वीवर असेपर्यंतच दैवी ज्ञानाच्‍या धारिकांची सत्‍यता पडताळून त्‍यांतील त्रासदायक शक्‍ती नष्‍ट होऊ शकते. त्‍यामुळे परात्‍पर गुरु डॉ. आठवले पृथ्‍वीवर असेपर्यंत त्‍यांचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व यांचा लाभ ज्ञानशक्‍तीला मिळून समाजापर्यंत धर्म अन् अध्‍यात्‍म यांचे योग्‍य ज्ञान पोचणार आहे. यासाठी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अवतार जोपर्यंत पृथ्‍वीवर सक्रीय आहे, तोपर्यंत त्‍यांचे मार्गदर्शन दैवी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना व्‍यष्‍टी आणि समष्‍टी अशा दोन्‍ही स्‍तरांवर होऊन त्‍यांना मिळणार्‍या दैवी ज्ञानाचा लाभ समष्‍टीला होत आहे. सध्‍या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अवतार पृथ्‍वीवर सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून कार्यरत असल्‍यामुळे दैवी ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक सनातन संस्‍थेला मिळाले आहेत.

७. सनातन संस्‍थेला दैवी ज्ञान मिळणारे साधक प्राप्‍त होण्‍यामागील कारणांचे तौलनिक महत्त्व

– सुश्री (कु.) मधुरा भोसले ( सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, वर्ष २०२४ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.