Forced Performance Of Islamic Song In DurgaPuja : बांगलादेशात दुर्गापूजेच्‍या मंचावर मुसलमान तरुणांनी गायले इस्‍लामी क्रांतीचे गाणे

प्रकरण दडपण्‍याच्‍या प्रयत्नाला विरोध झाल्‍यानंतर ६ मुसलमान तरुणांना अटक

मंचावर  इस्‍लामी क्रांतीचे गाणे गाताना मुसलमान तरुण

चितगाव (बांगलादेश) – येथे दुर्गापूजा मंडपामध्‍ये देशभक्‍तीपर गीत गाण्‍याच्‍या नावाखाली मंचावर चढलेल्‍या इस्‍लामी कट्टरतावाद्यांनी ‘इस्‍लामी क्रांती’ची हाक देणारे गाणे गायले. या गाण्‍यात बांगलादेशामध्‍ये इस्‍लामी क्रांती आणण्‍याबद्दल आणि मुसलमानेतरांना  लक्ष्य करण्‍याबद्दलच्‍या पंक्‍ती अंतर्भूत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर बांगलादेश प्रशासनाने हे प्रकरण नेहमीप्रमाणे दाबण्‍याचा प्रयत्न केला; पण जेव्‍हा त्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आणि वस्‍तूस्‍थिती तपासतांना असे कृत्‍य घडल्‍याचे समोर आले, तेव्‍हा स्‍थानिक प्रशासनाने कारवाई करण्‍याचा आदेश दिला. त्‍यानंतर ६ तरुणांना अटक करण्‍यात आली. ही घटना ९ ऑक्‍टोबरला घडली.

१. काही तरुणांनी, ‘चित्तग्राम कल्‍चरल अकादमी’ या स्‍थानिक सांस्‍कृतिक संस्‍थेचे सदस्‍य म्‍हणून मंडपाच्‍या आयोजकांना देशभक्‍तीपर गीते गाण्‍याची अनुमती मागितली. आयोजकांनी त्‍यांच्‍यावर संशय न घेता अनुमती दिली; मात्र यानंतर हे कट्टरतावादी तरुण मंचावर इस्‍लामी क्रांतीचा प्रचार करणारे गाणे गाऊ लागले. त्‍यामुळे वातावरण बिघडले.

या कृत्‍याने येथे उपस्‍थित असलेले हिंदू अस्‍वस्‍थ झाले. या घटनेनंतर लगेच त्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला; मात्र नेहमीप्रमाणे काही लोकांनी या घटनेला ‘बनावट’ किंवा ‘संपादित’ व्‍हिडिओ म्‍हणत घटना दडपण्‍याचा प्रयत्न केला.  स्‍थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी व्‍हिडिओमध्‍ये दाखवलेली घटना खरी असून ती खोटी करण्‍याचा प्रयत्न चुकीचा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

२. ‘ए.एफ्.पी.’ या वृत्तसंस्‍थेचे पत्रकार कादेरुद्दीन शिशिर यांनी सामाजिक माध्‍यमांतून पोस्‍ट करत सांगितले की, हा व्‍हिडिओ खोटा नाही आणि ही घटना खरोखरच घडली आहे. ज्‍या सांस्‍कृतिक संघटनेला आमंत्रित करण्‍यात आले आहे ती ‘जमात-ए-इस्‍लामी’शी संबंधित असू शकते.

३. या घटनेनंतर चितगावच्‍या उपायुक्‍त फरीदा खानम यांनी घटनास्‍थळी पोचून परिस्‍थितीचा आढावा घेतला आणि ‘या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन दिले. ‘अशा घटना बांगलादेशाच्‍या धार्मिक ऐक्‍याला घातक असून त्‍या खपवून घेतल्‍या जाणार नाहीत. दुर्गापूजेसारख्‍या धार्मिक कार्यक्रमात धार्मिक सलोखा बिघडणार नाही, याची काळजी प्रशासन घेईल’, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

४. पूजा मंडपाचे साहाय्‍यक सरचिटणीस सजल दत्ता यांनी या गटाला मंचावर इस्‍लमी गाणी गाण्‍याची अनुमती दिल्‍याचा आरोप काही लोकांनी केला आहे. ही बातमी पसरताच आयोजकांनी मंचावरून घोषित केले की, सजल दत्ता यांना पूजा उत्‍सव समितीतून काढून टाकण्‍यात आले आहे. दुसरीकडे ‘या घटनेची माहिती नसून आमची दिशाभूल करण्‍यात आली’, असा दावा आयोजकांनी केला आहे.

हिंदूंनी मशिदींमध्‍ये नमाजाच्‍या वेळी ‘हरे राम हरे कृष्‍णा’चे गायन केले तर.. ? – तस्‍लिमा नसरीन

बांगलादेशातील चितगाव येथील दुर्गापूजा मंडपामध्‍ये जिहादी इस्‍लामी जिहादी गाणी गात आहेत.

जर हिंदूंनी मशिदींमध्‍ये नमाजाच्‍या वेळी हरे राम हरे कृष्‍णाचे गायन केले तर..?, असा प्रश्‍न प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्‍लिमा नसरीन यांनी या घटनेनंतर  एक्‍सवर पोस्‍ट उपस्‍थित केला आहे.

संपादकीय भूमिका

येत्‍या काही वर्षांत बांगलादेशात दुर्गापूजाही होईल कि नाही, अशीच स्‍थिती असून पूजेसाठी हिंदूंही शिल्लक रहाणार नाहीत !