गोव्याचा बार्सिलोना होत आहे का ?

गेल्या मासात स्पेनच्या बार्सिलोनामधील शेकडो स्थानिकांनी पर्यटकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवून प्रमाणाबाहेर होत असलेल्या पर्यटनाचा निषेध नोंदवला. आदरातिथ्याची परंपरा असलेले आणि आईच्या मायेने साळीचा भात वाढणारे सोनकेवड्याचे हात असलेल्या पाहुण्यांवर पाणी फवारून निषेध व्यक्त करणार नाहीत. बार्सिलोनातील नागरिकांना हे का करावे लागले ? बार्सिलोनाने जे भोगले त्या वाटेने गोवा जात आहेत का ? याचे चिंतन होणे आवश्यक आहे.

१. निसर्गसौंदर्याने नटलेले स्पेनमधील बार्सिलोना शहर !

भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेले, विस्तीर्ण समुद्रकिनारा, उत्तम हवामान, डोंगररांगा, वैभवशाली वास्तूकला, द्राक्षांची वाईन, मुबलक मासे आणि आधुनिक फॅशन विश्वाचे माहेर असलेले सुंदर शहर म्हणजे बार्सिलोना ! पर्यटकांना आकर्षित करण्याचे सर्व गुण या शहरात आहेत. बार्सिलोनाने १९९२ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन करेपर्यंत हे शहर पर्यटकांच्या नकाशावर तसे ठळकपणे दिसत नव्हते. नाही म्हणायला १९६० आणि ७० च्या दशकात कोस्टासच्या (समुद्राच्या) बाजूने हॉटेल्स अन् रिसॉर्ट्स उगवण्यास प्रारंभ झाला होता. ऑलिंपिकच्या निमित्ताने औद्योगिक बंदर असलेल्या या शहराचा चेहरामोहरा पालटण्यात आला. नवीन समुद्रकिनारे सिद्ध करण्यासाठी अक्षरश: वाळू आयात करण्यात आली. पर्यटक आकर्षित होऊ लागले. करता करता बारमाही पर्यटक इतके वाढले की, स्थानिकांना रहाणे नकोसे होऊ लागले.

१ अ. पर्यटकांच्या गर्दीमुळे बार्सिलोनापुढे निर्माण झालेल्या नागरी समस्या

१ अ १. भव्य प्राचीन वास्तूंचे बनले बार आणि नाईट क्लब ! : वर्ष १९९० मध्ये फक्त १,१५,००० क्रूझ प्रवासी, व्यापारी बार्सिलोनामध्ये आले. वर्ष २०१७ पर्यंत हा आकडा २७ लाख इतका वाढला. अंदाजे १६ लाख २० सहस्र लोकसंख्या असलेल्या या भूभागात वर्ष २०२३ मध्ये भेट दिलेल्या एकूण पर्यटकांची संख्या चक्क २ कोटी ६० लाख इतकी होती. उपलब्ध साधनसुविधा, क्षमता यांच्या कितीतरी पट अधिक बोजा शहरावर पडला. इतक्या वर्षांच्या कालखंडात महसुलात वाढ झाली; पण त्यासह राजवाडे, चर्च यांसारख्या भव्य वास्तूंचे रूपांतर शाळा, वाचनालये, संग्रहालये, सरकारी कचेर्‍या यांत झाले. दूध, वर्तमानपत्रे मिळण्याची ठिकाणे कमी होऊन त्यांची जागा ‘सेकंड होम’ (दुसरे घर), बार, उपाहारगृहे, नाईट क्लब यांनी घेतली.

बार्सिलोना युरोपमधील सर्वांत प्रदूषित बंदर

१ अ २. बार्सिलोना बनले युरोपमधील प्रदूषित बंदर ! : वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण इतके वाढले की, वर्ष २०१९ मध्ये बार्सिलोना (पाल्मासह) हे युरोपमधील सर्वांत प्रदूषित बंदर ठरले. वागण्याच्या आणि जगण्याच्या अनेक पद्धतींची, संस्कृतीची सरमिसळ झाल्याने मूळ संस्कृती, भाषा यांची ओळख धूसर झाली. ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला. लोक अस्वस्थ झाले.

१ अ ३. प्रचंड घरभाडे आणि घरांच्या किंमतींमुळे स्थानिकच झाले बेघर ! : बार्सिलोना हे शहर तसे लहान आहे. माणसांचे वहन करण्याची त्याची क्षमता मर्यादित आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिकांसाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषत: सग्रादा फॅमिलियानजीक असलेल्या पर्यटनक्षेत्रात पदपथांवर चालण्यासाठी जागाच उरली नाही. लोकांचा पूर वहात आहे. भाड्याने खोली घेण्याच्या किंमती इतक्या वाढल्या की, त्या सामान्यांच्या हाताबाहेर जाऊ लागल्या. रहाण्याच्या साध्या खोलीचे भाडे दीड सहस्र युरो (१ लाख ३८ सहस्र रुपये) झाले आहे. पर्यटनाच्या वाढीमुळे घरांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे नंतर शहरात रहाणे परवडत नसलेल्या बहुतेक तरुण स्थानिकांना शहराने चक्क बाहेर हाकलले आहे. साध्या साध्या वस्तूही परवडेनाशा होऊ लागल्या. शहराच्या दैनंदिन कमाईमध्ये पर्यटनाचा वाटा जवळपास २ कोटी डॉलर (१६८ कोटी रुपये) आहे आणि १ लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो, तरीही वाढत्या राहणीमानाचा व्यय परवडेनासा झाला आहे.

१ अ ४.बार्सिलोनाने गमावली स्वत:ची ओळख आणि संस्कृती ! : दुसरी प्रमुख समस्या, म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये पर्यटनाच्या वाढीमुळे होत असलेला सांस्कृतिक र्‍हास ! बार्सिलोनाला एकेकाळी स्पॅनिश इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जात असे. शहरी भागातील पारंपरिक व्यवसायांची जागा फास्ट फूड रेस्टॉरंट्स आणि पर्यटन-मार्गदर्शक पुस्तिकांच्या दुकानांनी घेतली. बार आणि नाईट क्लब यांची रेलचेल चालू झाली. येथील उपाहारगृहांमध्ये स्पॅनिश खाद्यपदार्थांऐवजी ‘मेक्सिकन सोम्ब्रेरोस’ सर्वांत लोकप्रिय आहे. बार्सिलोनाची ओळख सर्व स्तरांवर पुसली जात आहे. ‘आमचा बार्सिलोना’ असे अभिमानाने मिरवणारे नागरिक खाली मान घालून फिरत आहेत. स्वत:ची ओळख, रुची आणि अभिरुचीही घालवून बसलेल्या बार्सिलोनातील स्थानिकांनी सोवळे सोडवून ठेवले आहे आणि त्यांना ओवळे सापडेनासे झाले आहे. ते रस्त्यावर आरामात फिरू शकत नाहीत किंवा त्यांच्या गावी त्यांच्या पारंपरिक जेवणाचा आणि खरेदीचा आनंद घेऊ शकत नाहीत.

१ आ. बार्सिलोनामध्ये अतीपर्यटनाच्या विरोधात झाले आंदोलन : वाढत्या महागाईविरोधात जवळपास १५० हून अधिक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहस्रो लोक सामील झाले होते. ‘मयोका बेट विक्रीसाठी नाही’, असे फलक दाखवत लोक रस्त्यावर उतरले होते. ही लहान आंदोलने, लोकांचा विरोध गेल्या १०-१५ वर्षांपासून हळूहळू तीव्र होत चालला आहे. बार्सिलोनामध्ये जवळपास २८०० लोकांनी आंदोलन करून देशातील अतीपर्यटनाच्या विरोधात निषेध नोंदवला. ‘आता पर्यटनावर मर्यादा आणा’, अशा आशयाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. गेल्या काही वर्षांमध्ये बार्सिलोना हे पूर्णपणे पर्यटकांचे शहर झाले आहे. यात स्थानिकांना वाव उरला नाही.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.

(क्रमशः)

(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉगवरून, सप्टेंबर २०२४)