काही दिवसांपूर्वी स्पेनच्या बार्सिलोनामधील शेकडो स्थानिकांनी पर्यटकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवून प्रमाणाबाहेर होत असलेल्या पर्यटनाचा निषेध नोंदवला. आदरातिथ्याची परंपरा असलेले आणि आईच्या मायेने साळीचा भात वाढणारे सोनकेवड्याचे हात असलेल्या पाहुण्यांवर पाणी फवारून निषेध व्यक्त करणार नाहीत. बार्सिलोनातील नागरिकांना हे का करावे लागले ? बार्सिलोनाने जे भोगले त्या वाटेने गोवा जात आहे का ? याचे चिंतन होणे आवश्यक आहे.
७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘निसर्गसौंदर्याने नटलेले स्पेनमधील बार्सिलोना शहर’, याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/841532.html
२. गोव्याची प्रतिमा होत आहे ‘ड्रग्ज आणि मुली पुरवणारे राज्य’ !
पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झालेल्या गोव्याची प्रतिमा ‘चर्च आणि समुद्रकिनारे असलेले राज्य’ अशी होती. नंतर ‘दारुडे आणि आळशी (खरे म्हणजे ‘सुशेगाद’ याचा अर्थ आळशी असा नव्हे, तर समाधानी असा होतो)’, अशी गोमंतकियांची प्रतिमा झाली होती. गोमंतकियांच्या ओळखीचे पतन मुक्तीनंतर मोठ्या प्रमाणावर झाले आणि आता तर त्याची परिसीमा गाठली गेली आहे. फार मनाला लावून घेऊ नका; पण आपली ओळख ‘ड्रग्ज आणि मुली पुरवणारे राज्य’, अशी होत आहे.
२ अ. पर्यटनाच्या अतिरेकामुळे ढासळत चाललेली गोव्याची स्थिती
२ अ १. परप्रांतियांना भूमी विकण्याकडे कल : गोव्यातील शहरांत, शहरांलगतच्या गावांत भूमी घेणे सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहे. भूमी परप्रांतियांना विकण्याकडे कल वाढला आहे. उर्वरित भारतातील गर्भश्रीमंत गोव्याला आपले ‘सेकंड होम’ (दुसरे घर) बनवत आहेत. त्यामुळे भूमी रास्त किमतीपेक्षाही कितीतरी पट अधिक दराने विक्रीस जात आहेत. गोमंतकियाला विकणे सोपे आणि विकत घेणे कठीण झाले आहे. ज्यांनी भूमीचे नियंत्रण आणि रक्षण करायचे तेच मोठमोठे गोमंतकीय अधिकारी गोमंतकियांच्याच भूमी लाटू लागले आहेत. भू-माफियांचा दबदबा आणि दबाव वाढत आहे. ‘बाउन्सर’ (खासगी रक्षक) आणून घरे पाडली जात आहेत.
२ अ २. राजरोसपणे चालतो ‘ड्रग्ज’चा (अमली पदार्थांचा) व्यापार ! : समुद्रकिनार्यांवर ड्रग्ज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ‘गोव्यात अमली पदार्थांचे ‘पार्किंग’ होते; इथे आणले जातात आणि परस्पर बाहेर नेले जातात’, असे अधिकारी काही वर्षांपूर्वी मुलाखतीत सांगायचे. आज स्थानिक लोक गाड्यांवर ड्रग्जची विक्री करत आहेत आणि सहावी-सातवीत शिकणारी गोमंतकीय पोरे चॉकलेट खावे, तसे ड्रग्जचे सेवन करत आहेत.
२ अ ३. डान्सबार आणि देहविक्रय व्यवसाय वाढला : देशोदेशीच्या कोवळ्या मुलींचा बाजार भरत आहे. बारचा परवाना मिळवून केलेल्या डान्सबारमध्ये या पोरी नाचवल्या जात आहेत आणि शरीरविक्रयही राजरोस सुरु आहे. ‘बाहेरून आणलेल्या मुली’, असे स्वतःचे समाधान करून घेण्यात काहीच अर्थ नाही. त्यांची जागा गोमंतकीय मुलींनी कधी घेतली, हे आम्हा परिटघडीच्या लोकांना कळणारही नाही.
२ अ ४. गोमंतकीय संस्कृतीचा र्हास : ‘गोमंतकीय’, अशी ओळख पटवणारे खास खाद्यपदार्थ आमच्या ताटातून कधीच गायब झाले आहेत. व्यवसायही आपल्या हाती उरले नाहीत. महोत्सवांत नाचून दाखवण्याइतपत संस्कृती आहे आणि एकमेकांना शिव्या घालण्यासाठी का होईना, ती जिवंत आहे. जे बार्सिलोना भोगत आहे, त्याच भोगावळीच्या वाटेवर गोव्याने चालायला प्रारंभ केला आहे.
३. एका वेळी किती पर्यटकांनी यावे, याचा विचार आवश्यक !
अतीपर्यटन, म्हणजे पर्यटकांचे प्रमाणाबाहेर येणे एवढाच मर्यादित अर्थ घेणे चुकीचे ठरेल. व्यवस्थेच्या, स्थानिकांच्या क्षमतेबाहेर एकाच वेळी, एकाच जागी पर्यटकांचे एकत्र येणे म्हणजे अतीपर्यटन. आपल्या घरी एखाद्या कार्यक्रमास निमंत्रण द्यायचे, तरी आपण किती विचार करतो ! वेळ, जागा, खर्चाचे परवडणे, अशा असंख्य गोष्टींचा सखोल विचार करतो आणि त्या प्रमाणातच निमंत्रण देतो. केवळ किती पर्यटक आले, या संख्येवर पर्यटनाची मोजमापे मिरवण्यात काहीच अर्थ नाही. किती पर्यटक, कुठल्या वेळेत, कुठल्या मोसमात, कुठल्या स्थानी, किती काळासाठी आले, याचा तरी निदान सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
४. अतीपर्यटनातून खरेच सरकारी तिजोरीत महसूल जमा होतो का ?
महत्त्वाचे म्हणजे त्यातून सरकारी तिजोरीत जमा होणारा महसूल. जेव्हा पर्यटन अनिर्बंध, अनियोजित आणि अती होते, तेव्हा सरकारच्या महसुलात वाढ होत नाही. पर्यटन आणि त्याच्याशी संलग्न अन्य व्यवसाय करणार्या लोकांच्या खिशात हा पैसा जातो. त्याचबरोबर अशा बांडगुळांनी पोसलेली गुंडगिरी, वेश्या व्यवसाय आणि अन्य उद्योगधंदे यांनी केलेली सामाजिक, सांस्कृतिक हानी ही कितीही पैसे मोजले, तरी भरून निघत नाही. पर्यटनाकडे अर्थकारण म्हणून पहातांना त्यातून निर्माण होणारे अनर्थ आणि हानी जमेस धरूनच विचार करणे योग्य ठरते. तसे केले नाही, तर पर्यटनावर पोट भरणार्यांना आणि स्थानिकांनाच ते नकोसे होते. बार्सिलोनात जे नकोसे झाले आहे, ते गोव्यातही नकोसेच होईल.
कुळागारात जसे आपण पाटाचे पाणी बांध घालून शिंपण्यासाठी वळवतो, तसे पर्यटकांना वळवणे अत्यंत आवश्यक आहे. ‘पर्यटनवृक्षा’ची सकस वाढ व्हावी, यासाठी त्यावर उगवलेली बांडगुळे मुळासकट निष्ठूरपणे उपटून काढणे आवश्यक आहे. ‘पर्यटन आणि पर्यटक नकोच’, असे म्हणणे ‘अतिथी देवो भव’ मानणार्या आतिथ्यशील गोमंतकीय माणसाच्या रक्तात नाही; पण रक्त ओकेपर्यंत त्यांना सोसणेही परवडणारे नाही. गोव्याचा बार्सिलोना होऊ नये, यासाठी योग्य पावले वेळेत उचलणे, हे सरकारचे, प्रशासनाचे आणि आपले प्रत्येकाचे दायित्व आहे.
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (सप्टेंबर २०२४)
(साभार : ‘प्रसन्नवदने’ या ब्लॉगवरून)