आज संयुक्त राष्ट्र घोषित प्रथम ‘जागतिक ध्यान दिवस’ आहे. त्या निमित्ताने….
‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।’ (पातञ्जलयोगदर्शन, विभूतिपाद, सूत्र २), म्हणजे ‘तेथे (जेथे ध्यानाचा अभ्यास केला आहे तेथे) प्रत्ययाशी (ज्ञानाची, विचारांची किंवा चित्तवृत्तीची) एकतानता (एकरूपता) साधणे म्हणजे ध्यान होय.’
आपण ध्यान, धारणा, समाधी असे म्हणतो. यात धारणा साधली आहे, म्हणजेच आपले चित्त धारणेच्या विषयावर स्थिरावत आहे, अशा वेळी काय करावे ? त्या विषयापासून जो ‘प्रत्यय’ येत असतो, त्याच्याशी ‘एकतानता’ साधावी, या क्रियेलाच ‘ध्यान’ असे म्हणतात. या लेखातून प्रत्यय, ध्यान यांविषयीची माहिती येथे देत आहोत.
१. प्रत्यय म्हणजे काय ?
प्रत्यय या शब्दाची फोड ‘प्रति+अय्’, म्हणून ‘च्या दिशेने येणे’, असा त्याचा अर्थ होतो. आपण एखादी गोष्ट बघतो, तेव्हा त्या वस्तूपासून काही प्रकाशकिरणे आपल्या डोळ्यात येतात. आपल्या नेत्रपटलावर एक प्रतिबिंब उमटते. ते तेजाचे असल्याने त्या तेजामुळे तेथील नसा चेतवल्या जातात आणि त्या संवेदना मेंदूकडे जातात. हा मेंदूचा प्रत्ययच आहे. मेंदूने त्या संवेदनांचा अर्थ लावला की, आपणास ज्ञान होते. ते ज्ञान झाले की, ‘प्रत्यय आला’, असे आपण म्हणतो.
एखाद्या माणसाविषयी आपला मित्र आपणास सांगतो, ‘तो माणूस फसवणारा आहे.’ आपण दुर्लक्ष करतो; पण एक दिवस असा उजाडतो की, तो माणूस आपणासच फसवतो. आपली फसवणूक झाली की, आपण मित्राला म्हणतो, ‘तुझ्या सांगण्याप्रमाणे त्या माणसाचा प्रत्यय आला.’ यावरून एक लक्षात येईल, ‘ज्ञान होणे, अनुभव येणे म्हणजेच प्रत्यय होय.’
डोळ्यांद्वारे प्रकाशकिरणांच्या माध्यमातून आपणास प्रत्यय येतात आणि आपले मन त्या प्रत्ययाला स्वीकारते. कानांमधून ध्वनीलहरींद्वारेही आपणास प्रत्यय येतात आणि आपले मन त्या प्रत्ययांना स्वीकारते. सुवास हा नाकावाटे येणारा प्रत्यय आहे, चव हा जीभेतून येणारा प्रत्यय आहे आणि स्पर्श हा त्वचेतून येणारा प्रत्यय आहे. या सर्व प्रत्ययांना मन स्वीकारते आणि त्या प्रत्ययांचा विचार करू लागते.
२. एकतानता म्हणजे काय ?
नेहमी घडणार्या या घटनांचाच महर्षि पतंजलींनी येथे उपयोग करून घेतला आहे. पंचज्ञानेंद्रिये आणि मन तेथे स्थिर झाली आहेत, त्या अर्थी धारणाविषयातून प्रत्यय येत असले पाहिजेत आणि मन त्याचा विचार करत असले पाहिजे, हे नक्की; परंतु मन चंचल असल्याने मध्येच तो विचार सोडून ते भलते विचार करू लागते. उदाहरणार्थ आपण सिनेमा बघत असतो, म्हणजे प्रत्यय येत असतो. मन त्या सिनेमाचा विचार करत असते; पण मध्येच आपणास परीक्षेची आठवण येते. ती आली की, भीती वाटते आणि परीक्षेचा विचार चालू होतो. सिनेमाकडे दुर्लक्ष होते. थोडा वेळ का होईना; पण असे घडते, धारणेच्या वेळी असेच घडते. ते घडू देऊ नये म्हणून पतंजली सांगत आहेत, ‘त्या प्रत्ययाशी एकतानता साधा.’
एकतानता म्हणजे काय ? ‘तन्’ हा धातू या शब्दात आहे. त्याचा अर्थ ताणणे. सोन्यापासून ताणून तार काढणे, ही क्रिया ‘तन्’ हा धातू दर्शवतो. सोन्याची चीप आणि त्यापासून निघणारी तार यांत जसे सातत्य अन् अखंडपणा असतो, तसे विचारांचे सातत्य, तसेच अखंडपणा धारणेविषयी असेल, तर त्याला ‘एकतानता’ म्हणावयाचे. धारणा विषयाशी अशी एकतानता साधली, तरच ध्यान झाले असे म्हणावे.
३. ध्यान म्हणजे नेमके काय ? ते कसे लागते ?
ध्यान या शब्दात ‘ध्यै’ विचार करणे, हा धातू आहे. ‘ध्यान या शब्दाचा अर्थ चिंतन करणे, विचार करणे’, असाच आहे; पण हे चिंतन किंवा विचार धारणे संबंधीच पाहिजे, तरच त्याला ‘ध्यान’ म्हणता येईल, अन्यथा आपले मन नेहमी कसला ना कसला तरी विचार करतच असते. त्यामुळे त्याला ध्यान म्हणता येत नाही; कारण ते विचार स्थिर नसून भरकटत असतात, वाटेल त्या विषयावर विचार चालू असतात. ‘ध्यान याचा अर्थ धारणेच्या विषयाचे एकतान होऊन चिंतन करणे.’
काही मार्ग सांगतात की, नुसते अर्धा घंटा बसणे म्हणजे ध्यान; पण ही व्याख्या चुकीची आहे. नुसते बसणे ही क्रिया बहुतेक सगळे लोक नेहमीच करतात. बहुसंख्य लोक आळसातच वेळ काढतात; पण ध्यान होत नाही. नुसते बसले की, विचार भरकटत जातात आणि त्यात मनाची शक्ती खर्ची होते. त्या शक्तीपाताचा परिणाम शरिरावर होतो आणि शरीरसुद्धा विकृत होते; पण एकाच विषयाचे ध्यान केले, तर मन एकाच विषयावर स्थिर होते. इकडे तिकडे फिरण्यातील त्याची शक्ती वाचते आणि शक्तीसंचय होतो. मन शक्तीसंपन्न झाले की, शरीरही बलसंपन्न होते.
एकाच विषयाचे चिंतन करण्याची सवय एकदा लागली की, नेहमीच्या व्यवहारात तसेच घडते. मग आपल्यापुढे जो प्रश्न असतो त्याचाच विचार आपण करतो आणि तो प्रश्न चटकन सुटतो. एकाच विषयावर मन स्थिर करण्याची सवय नसेल, तर समोरचा गंभीर प्रश्न बाजूला राहून भलतेच विचार मनात येतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर लवकर सापडत नाही. विचार पक्का होत नाही. निर्णय करता येत नाही. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की, निर्णय शक्ती चांगली प्राप्त होते.
काही मार्ग सांगतात की, काहीच करू नका; पण काहीच न करणे, हे अशक्य आहे. काही न करणे, म्हणजे आळसात वेळ घालवणे आणि स्वस्थ बसणे. भारतातील लोकांना हे सांगायला नकोच; कारण बहुसंख्य भारतियांना हीच सवय असते. याखेरीज आळसात स्वस्थ बसणे, ही क्रिया घडत असल्याने ‘काहीच करू नका’, हा आदेश पाळला जात नाही तो नाहीच.
काही मार्ग सांगतात, ‘सतत जप करा, ध्यानाची आवश्यकता नाही’; पण ‘जप करा’, हे सांगण्यातच ध्यान अनुस्यूत आहे. ज्याचा जप करायचा, तो विचार सतत मनात रहातो, निदान तसा रहावा म्हणूनच जप सांगितला आहे. समोर श्रीरामाची मूर्ती आहे, त्यावर धारणा झाली आहे, आता श्रीरामाचे ध्यान करावयास हवे. पंचज्ञानेंद्रिये श्रीरामावर गुंफून ठेवली, तरी मन मोकळे रहाते; म्हणून ‘रामाचा जप करा’, असे सांगतात. जीभ ही रामाची चव घेऊ शकत नाही; म्हणून जिभेचे दुसरे कार्य, म्हणजे ‘वाणी, तिला राममय होऊ द्यावे’, म्हणून जप सांगितला आहे. ध्यानासाठीच जप सांगितला आहे; पण नुसताच जप केला आणि ध्यानाचा प्रयत्नच केला नाही, तर जिभेवर रामनाम राहील आणि मनात भलतेच विचार चालू होतील. त्यामुळे जपाचाही परिणाम घडणार नाही आणि ध्यानाचा तर नाहीच नाही. म्हणून नुसता जप उपयोगी नाही. ज्याचा जप करायचा, त्याचे चिंतन मनात सतत हवे, तरच उपयोग होईल.
मनापासून जप केला, तर जपाच्या विषयावर मन चिंतन करू लागेल आणि आपोआप केव्हा तरी ध्यान चालू होईल, हे खरे; परंतु आपोआप घडेल, या आशेने वेळ काढणे योग्य नव्हे. आपोआप जे घडणार आहे, ते प्रयत्नाने लवकर साधते. म्हणून जप नुसता जिभेवर न ठेवता मनातूनच केला पाहिजे.
३ अ. जप कसा करावा ? आणि तो मनात कसा ठसवावा ? : मनातून जप करण्याचा प्रयत्न प्रारंभीपासून करू नये; कारण ते लक्षात रहात नाही. प्रथम मोठ्याने जप करावा, म्हणजे ‘आपण जप करतो आहोत’, याची खात्री पटते. मोठ्याने जप केला की, तो तोंडात बसतो, जिभेवर बसतो आणि नंतर मनात ठसतो. जप मनात ठसल्यानंतर मोठ्याने जप करणे बंद करावे आणि मनात जप चालू ठेवावा. मनात जप २४ घंटे चालू ठेवावा. निदान तसा प्रयत्न हवा. त्यामुळे मन जपावर स्थिर रहाते, मनात काहीही दुसरा विषय आला, तरी त्याचा विचार झाल्याक्षणी मन पुन्हा जपावर स्थिर होते. त्यामुळे मनाला एक प्रकारची आधार रेषा (बेसलाईन), स्वास्थ्य रेषा मिळते. विचार आला की, मन त्या स्वास्थ्य रेषेपासून वर किंवा खाली ढळते; पण लगेच पुन्हा स्वास्थ्य रेषेवर येते. पुन्हा दुसरा विषय आला की, पुन्हा रेषेपासून वर-खाली होईल; परंतु पुन्हा स्वास्थ्य रेषेवर स्थिर होईल. जपामुळे ही स्थिर रेषा मिळते. इतर वेळी काय घडते ? मनात एक विचार येतो. मन एका बाजूला ढळते; पुन्हा विचार येतो, दुसरीकडे ढळते; तेथून तिसरीकडे, चौथीकडे असे ते मन भरकटत जाते. त्यामुळे त्या मनाला स्थिरता, स्वास्थ्य इत्यादी काहीच लाभत नाही. त्यामुळे ते थकते. मन थकण्याची ही घटना ध्यानामुळे आणि जपामुळे नाहीशी होते. मन बळकट होते.
अध्यात्ममार्गाचा माझा अभ्यास वर्ष १९५६ पासून चालू आहे. आतापर्यंत मला अनेक लोक भेटले. त्यांच्या बोलण्यावरून मला कळून चुकले आहे की, ध्यान म्हणजे काय ? याविषयी लोकांच्या मनात फारच अपसमज आहेत. तेवढ्यासाठी वर मी विस्तृत विवरण केले आहे.
३ आ. ध्यान आणि समाधी कशाला म्हणतात ? : ध्यान याचा अर्थ ‘धारणा विषयाशी ‘एकतान’ होऊन विचार करणे.’ धारणा विषयापासून जरासुद्धा धागा निसटता कामा नये. सोन्याच्या चिपेतून तार काढावी तसे चिंतन हवे. सोन्याची चीप, म्हणजे धारणेचा विषय आणि सोन्याची तार म्हणजे धारणा विषयाचे चिंतन. ही तार चिपेपासून किंवा मध्येच कुठेही तुटता कामा नये. असे चिंतन करणे म्हणजे ‘ध्यान’ होय. अशी तार लागली, म्हणजे केव्हा तरी आपण स्वतःला विसरतो आणि ध्यानाचा विषयही पूर्ण विसरतो. आपण आणि ध्यान विषय वेगळे आहोत, हा भावच तेथे उरत नाही. यालाच ‘समाधी’ म्हणायचे.
४. प्रवृत्ती आणि चित्त यांचे कार्य
‘प्रवृत्तिभेदे प्रयोजकं चित्तमेकमनेकेषाम् ।’ (पातञ्जलयोगदर्शन, कैवल्यपाद, सूत्र ५), म्हणजे ‘अनेक चित्तांमध्ये वेगवेगळ्या क्रियांचे वा वृत्तींचे संचालन करणारे एक चित्त असते’ किंवा ‘अनेक चित्तांना प्रवृत्तीभेदामध्ये योजणारे एक चित्त असते.’
प्रवृत्ती विविध असतात. प्रवृत्तींच्या या विविधतेमध्ये अनेक चित्तांना योजणारे एकच चित्त असते. थोडे बाजूचे उदाहरण देतो, म्हणजे लगेच पटेल. आपल्या देहात अनेक इंद्रिये असतात. या १० इंद्रियांना वेगवेगळ्या कार्यास जुंपणारे एकच चित्त असते. हे एक चित्त जसे विविध इंद्रियांना विविध कार्यास जुंपते, तसे ते एक चित्त विविध निर्माणचित्तांना (निर्माण झालेली चित्ते) विविध प्रवृत्तींमध्ये जुंपते. त्या श्रेष्ठ चित्ताला इतर चित्तांकडून अनेक तर्हेची कामे करून घ्यावयाची असतात; म्हणून विविध प्रवृत्ती निर्माण करून त्यात या विविध चित्तांना ते गुंतवून टाकते आणि त्यांच्याकडून आपले कार्य करवून घेते. काम करवून घेण्याची योजना तेथे असते; म्हणून त्याला ‘प्रयोजक’ म्हटले आहे.
या विश्वातला प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे; कारण त्या प्राण्याच्या चित्ताला विशिष्ट प्रवृत्तीमध्ये योजून ते श्रेष्ठ चित्त त्या प्राण्याकडून काही तरी कार्य करवून घेत असते. त्या ईश्वरी चित्ताच्या प्रेरणेमुळेच अनेक निर्माणचित्ते विविध प्रवृत्तींमध्ये अशी योजनाबद्धतेने गुंतवली जातात आणि त्यांच्याकडून त्या ईशाचे कार्य घडवले जाते.
येथे कुणी प्रश्न करील, ‘चोरीची प्रवृत्ती ते ईशचित्तच निर्माण करते का ?’, तर त्याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. चोरी करण्याची प्रवृत्ती त्यानेच निर्माण केली, निर्माणचित्ताला चोरीची प्रेरणा देण्याचे काम तोच करतो; पण त्याच वेळी चोरी करू नये, हे ज्ञानही तो देतो आणि परीक्षा बघतो. ‘हा मनुष्य ज्ञानाला अनुसरून चोरी करणे टाळतो कि मोहात पडून चोरी करतो ?’, हीच ती परीक्षा असते. बहुतेक जण या परीक्षेत नापास होतात. ईश्वरानेच प्रेरणा दिली म्हणून चोरी केली, अशी सबब ते सांगतात; पण त्यात तथ्य नसते; कारण ‘चोरी करू नये’, हे ज्ञानही ईश्वर देत असतो. असो. येथे मुद्दा एकच लक्षात घ्यावा की, जगातील जीवांचे आणि त्यांच्या चित्तांचे नियंत्रण करणारे एक प्रमुख चित्त असते, त्यालाच ‘नियती’ असे म्हणतात. पतंजलींचा ‘पुरुष’ तो हाच आणि ‘परब्रह्म’ही तेच.
लेखक : ब्रह्मर्षि डॉ.प.वि. वर्तक, पुणे. संकलन : गो.रा. सारंग
(साभार : ‘पातंजलयोग – विज्ञाननिष्ठ निरूपण’, या डॉ.प.वि. वर्तक लिखित ग्रंथातून)