‘अँजिओग्राफी’ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘रक्तवाहिन्यांमधील अडथळे शस्त्रकर्म न करता औषधाने बरे होतील’, असे निदान होणे

श्रीमती क्षमा राणे

१. छातीत दुखणे आणि आधुनिक वैद्यांच्या सांगण्यानुसार ‘अँजिओग्राफी’ करण्याचे ठरणे

‘काही दिवसांपासून माझ्या छातीत थोडे दुखत होते; म्हणून आधुनिक वैद्यांनी मला काही वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगितल्या. त्या केल्यानंतर ‘अँजिओग्राफी (टीप)’ करावी लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्याप्रमाणे १२.७.२०२४ या दिवशी अँजिओग्राफी करण्याचे ठरले.

टीप – अँजिओग्राफी म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्यासाठी करावयाची चाचणी.

२. काळजी वाटू लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना होणे

मी यापूर्वी कधी आजारी पडले नव्हते. त्यामुळे मला जरा काळजी वाटू लागली. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘कधी तरी आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचाच आहे, तसेच सर्वकाही ईश्वरेच्छेने होत असते. त्यामुळे काहीही झाले, तरी चांगलेच होणार आहे.’ त्यानंतर माझ्या मनातील भीती न्यून झाली आणि माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना होऊ लागली, ‘हे गुरुमाऊली, सर्वकाही तुझ्या इच्छेने होऊ दे.’

३.सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रसाद पाठवल्यावर भीती न्यून होऊन कृतज्ञताभाव वाढणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारल्यावर त्यांनी मला प्रतिदिन ३ घंटे ‘निर्गुण’ आणि १ घंटा ‘शून्य’, हे जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी नामजप करत होते; पण माझ्या मनात भीती होती, ‘पुढे एखादे मोठे शस्त्रकर्म करायला सांगतील कि काय ?’ ‘गुरुमाऊली आपल्या साधकांचे त्रास स्वतःवर घेते’, या विचाराने माझे मन अस्वस्थ होत होते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना याविषयी कळल्यावर त्यांनी मला प्रसाद आणि विभूती पाठवली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘परम पूज्यांपर्यंत माझ्या प्रार्थना पोचत आहेत. मला त्रास होऊ नये; म्हणून प्रत्यक्ष देवाने प्रसाद आणि विभूती पाठवली आहे. देव माझ्यासाठी किती करत आहे !’ त्या वेळी माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला.

४. ‘अँजिओग्राफी’च्या वेळी भीती वाटल्यावर लख्ख प्रकाशाचा झोत येत असल्याचे दिसणे आणि ‘प्रकाशाच्या रूपात गुरुमाऊली आली आहे’, असे जाणवून धीर येणे

ज्या दिवशी अँजिओग्राफी करणार होते, त्या दिवशी सकाळपासून माझ्या अंतरात पुष्कळ आनंद जाणवत होता. माझ्या मनात अधूनमधून विचार येत होते; पण मला भीती वाटत नव्हती. मला शस्त्रक्रियागारात घेऊन गेल्यावर तेथील सिद्धता पाहून मी घाबरले आणि परम पूज्यांना सूक्ष्मातून हाका मारल्या, ‘तुम्ही या आणि माझी अँजिओग्राफी करा.’ आधुनिक वैद्य माझ्या जवळ आले. तेव्हा मला एक लख्ख प्रकाशाचा झोत माझ्याकडे येतांना दिसला. त्या प्रकाशाने माझे डोळे दिपले. आधुनिक वैद्यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला भीती वाटत आहे का ? तुम्ही डोळे का मिटून घेतले ?’’ त्यानंतर मला त्यांचे बोलणे ऐकायला आले नाही. मला तो प्रकाश दिसत होता. प्रकाशाच्या रूपात माझी गुरुमाऊलीच आली होती. मला धीर आला. ‘पुढे अँजिओग्राफीचे काय झाले ?’, हे मला कळले नाही.

५. नंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अगदी थोडे अडथळे आहेत. ते औषधाने बरे होतील.’’

‘हे गुरुदेवा, ‘तुमची कृपा, सद्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पाठवलेला प्रसाद, यांमुळे माझ्या रक्तवाहिन्यांतील अडथळे विरघळून गेले. तुमच्या कृपेमुळे पुढील शस्त्रकर्म टळले. आता मी सेवा करू शकत आहे’, याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्रीमती क्षमा शशिकांत राणे (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक