पंधरा दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म दृष्ट्या पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम !

वर्ष २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण झाले आणि २ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणारी नाहीत; परंतु त्यांचा परिणाम पृथ्वीवर होणार आहे. त्या दृष्टीने आपण ग्रहण, पंधरा दिवसांच्या कालावधीत येणारी ग्रहणे आणि पितृपक्षात येणारे ग्रहण, या सूत्रांविषयी येथे जाणून घेणार आहोत.

सूर्यग्रहणाचे संग्रहित छायाचित्र

१. ग्रहण

‘मुळात ‘ग्रहण’ लागणे, ही घटना तमप्रधान आहे. या कालावधीमध्ये नवग्रहांपैकी राहु आणि केतु हे सक्रीय होऊन ते सूर्य किंवा चंद्र यांना ग्रासतात. त्यामुळे सूर्य आणि चंद्र यांच्याकडून त्रासदायक स्पंदने संपूर्ण सौरमंडलात प्रक्षेपित होऊन सौरमंडलाचे वातावरण रज-तमात्मक लहरींनी भारित होते. त्यामुळे ग्रहणकाळाचा स्थूल आणि सूक्ष्म परिणाम भूलोकावर, म्हणजे पृथ्वीवरही होतो.

२. पंधरा दिवसांच्या कालावधीत ग्रहणे येणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

पृथ्वीला दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र यांच्यापासून आध्यात्मिक ऊर्जा मिळत असते. पंधरा दिवसांमध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आले, तर पृथ्वीला पूर्ववत् स्थितीला येण्यासाठी कालावधी न मिळाल्याने पृथ्वीच्या भोवतालचे वायूमंडल संपूर्ण महिनाभर दूषित रहाते. त्यामुळे पृथ्वीवर विविध दुष्परिणाम होतात.

२ अ. ग्रहणांमुळे होणारे दुष्परिणाम : समुद्र खवळल्यामुळे समुद्र प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्याचप्रमाणे वादळी वारा, उष्माघात, अरण्यांत (जंगलात) आग लागणे, अतीवृष्टी किंवा अनावृष्टी, भूकंप, पूर, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवरचे वातावरण प्रफुल्लित आणि उत्साही न वाटता जड अन् निरुत्साही होते. त्याचप्रमाणे पृथ्वीवर वाईट शक्तींचा संचार वाढल्यामुळे मनुष्यांमध्ये मारामारी होणे, दंगल उसळणे, जाळपोळ होणे, युद्ध होणे यांसारख्या मानवनिर्मित आपत्ती वाढू शकतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी राजकीयदृष्ट्या सत्ता उलटून अराजकता पसरू शकते.

२ आ. ग्रहणांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करायचे उपाय

२ आ १. वास्तूशी संबंधित उपाय करणे : घरामध्ये अष्टदेवतांच्या नामपट्ट्यांचे वास्तूछत लावणे; देवघरात तेल  किंवा तूप यांचा दिवा लावून सकाळ, दुपार आणि सायंकाळ उदबत्ती लावणे अन् धूप दाखवणे; वास्तूमध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडून वास्तूची शुद्धी करणे; वास्तूचे वाईट शक्तींपासून रक्षण होऊन वास्तूभोवती दैवी चैतन्य निर्माण होण्यासाठी सूर्यग्रहणाच्या वेळी ‘ॐ’ आणि चंद्रगहणाच्या वेळी ‘महाशून्य’ हे नामजप लावून ठेवणे अन् स्वत: ऐकणे इत्यादी उपाय करू शकतो.

२ आ २. व्यक्तीशी संबंधित उपाय करणे : या कालावधीत सकाळी, दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून उपाय करणे, वास्तूशी संबंधित उपायांप्रमाणे ‘ॐ’ किंवा ‘महाशून्य’ हे नामजप अधिकाधिक करणे, स्वत:भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण किंवा उपास्य वा आराध्य देवता यांना प्रत्येक १५ मिनिटांनी प्रार्थना करणे इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतो.

३. पितृपक्षात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आल्यामुळे होणारे दुष्परिणाम

पौर्णिमा चंद्राशी आणि अमावास्या पितरांशी संबंधित आहे. पितरांची स्पंदने मुळात रजप्रधान असतात. त्यामुळे पितृपक्षात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आल्याने भुवलोकात वास करणार्‍या पितृगणांवर ग्रहणाचा विपरीत परिणाम होतो. त्यांचे नियंत्रण राहु आणि केतु यांच्यासारख्या बलाढ्य राक्षसांनी घेतल्यामुळे पृथ्वीवरील मनुष्याला होणारा अतृप्त पितरांचा त्रास संपूर्ण मास ३० टक्क्यांनी वाढणार आहे. त्याचे पडसाद पृथ्वीवर वास करणार्‍या सामान्य मनुष्यावर होऊन मनुष्याला पुढील विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात.

३ अ. शारीरिक त्रास : दिवसा झोप येणे, रात्रीची झोप न्यून होणे, भयंकर स्वप्न पडणे, भूक न लागणे किंवा अतीभूक लागणे, डोके दुखणे, चांगल्या कार्यात विघ्न निर्माण होणे, अपघातांचे प्रमाण वाढणे इत्यादी.

३ आ. मानसिक त्रास : मनाची चिडचिड होणे, घरात लहान-सहान कारणांवारून वादविवाद होऊन भांडणे होणे, निराशा येऊन आत्महत्येचे विचार प्रबळ होणे इत्यादी.

३ इ. बौद्धिक त्रास : बुद्धीवर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण आल्यामुळे काहीही न सुचणे, विषयाचे आकलन न होणे, स्मरणशक्ती उणावणे, आकलनक्षमता न्यून होणे, आत्मविश्वास अल्प झाल्याने योग्य निर्णय घेता न येणे इत्यादी.

३ ई. आध्यात्मिक त्रास : पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबात अतृप्त पितरांचा संचार होऊन सर्वसामान्य मनुष्याला पितरांचा होणारा त्रास ३० टक्क्यांनी वाढणार आहे.

३ उ. पितृपक्षातील ग्रहणांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करायचे उपाय : प्रत्येकाने ‘ॐ’ हा जप अर्धा घंटा, ‘महाशून्य’ हा जप अर्धा घंटा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अर्धा घंटा १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत प्रतिदिन करावा. त्याचप्रमाणे त्रास वाढल्याचे जाणवल्यास व्यक्तीची दृष्ट मीठ, कापूर, तुरटी, लिंबू किंवा नारळ यांपैकी जे उपलब्ध असेल, त्याने सकाळी आणि सायंकाळी काढावी.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ आणि टंकलेखन करण्याची वेळ १७.९.२०२४ दुपारी ४.५५ ते ५.२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक