रशियाच्या अंतर्गत भागांमध्ये (ज्यात रशियाचे १५० तळ येतात) मारा करून विध्वंस घडवणारी क्षेपणास्त्रे युक्रेनला वापरू दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली आहे. युक्रेनने तशी अनुमती अमेरिका आणि ब्रिटन या ‘नाटो’चे सदस्य असणार्या देशांकडे मागितली होती. (नाटो देशांनीच ही शस्त्रे युक्रेनला दिली आहेत.) रशियावर क्षेपणास्त्रे वापरण्याच्या संदर्भात युक्रेन आणि अमेरिका, तसेच ब्रिटन यांच्या गुप्त बैठका झाल्या, तरी त्याची कुणकुण रशियाला लागलीच. ‘जर नाटो देशांनी रशियाच्या अंतर्गत भागांमध्ये युक्रेनला ही क्षेपणास्त्रे वापरण्यास अनुमती दिली, तर एक प्रकारे ‘नाटो’च्या देशांनीच रशियाशी हे युद्ध पुकारले, असा त्याचा अर्थ निघेल आणि त्यानुसार प्रतिसाद देण्यास आम्ही सिद्ध असू’, असे पुतिन यांनी घोषित केले. युक्रेनने अलगद ‘नाटो’च्या सदस्य देशांना यात सहभागी करून घेतल्याने आता हे युद्ध केवळ रशिया आणि युक्रेन यांच्यामधील राहिले नसून ते रशिया आणि ‘नाटो’चे सदस्य देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन आदींमधले होऊ शकते. असे झाले, तर ही तिसर्या महायुद्धाची ठिणगीही असू असते.
अमेरिका किंवा ब्रिटन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियाच्या अंतर्गत भागांत डागण्यास मूकअनुमती दिल्याचाही संशय वृत्तांकन करणार्या काही माध्यमांना होताच. नाटोच्या अध्यक्षांनी म्हटले, ‘शत्रूला बलहीन करण्यासाठी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याचा अधिकार युक्रेनला आहे.’ त्यामुळेच असे झालेच, तर रशियाने ब्रिटनला ‘समुद्रात बुडवून संपवून टाकू’ अशी धमकी दिली आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी घाईघाईत संरक्षणमंत्र्यांसह अमेरिकेत जाऊन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा केली. रशियाजवळ परमाणू बाँब आहे आणि त्याचा वापर तो अमेरिकेवर करू शकतो. त्यामुळे अमेरिकेनेही लगेच ‘युक्रेनने रशियाच्या अधिक आतपर्यंत आक्रमणे करू नयेत’ असे म्हटले. रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांच्याजवळच केवळ ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र आहे, जे सध्या तरी अमेरिकेकडे नाही. या क्षेपणास्त्राची गती ध्वनीच्या ५ पट असल्याने ती हवेतल्या हवेत निकामी केली जाऊ शकत नाहीत. अमेरिका सध्या ‘डार्क इगल’ नावाच्या तत्सम क्षेपणास्त्राची चाचणी करत आहे, ती जर यशस्वी झाली, तर ती या देशांच्या तुल्यबळ होईल.
रशिया ब्रिटनवर ‘हायपरसॉनिक’ क्षेत्रपणास्त्र डागू शकतो आणि त्याच्या मनात आले, तर तो त्याला अणूबाँबही जोडू शकतो, असे युद्धतज्ञांना वाटते. जर्मनीने म्हटले आहे की, युक्रेनने रशियाच्या आधिक आतपर्यंत जाता कामा नये. नाटोत आता थोडे नव्हे, तर २९ देश जोडले आहेत. थोडक्यात काय जर नाटो देशांनी दिलेल्या शस्त्रांनी युक्रेनने रशियावर आक्रमण केले, तर रशिया त्याला नाटोचा युद्धात सहभाग मानेल. त्यानंतर रशिया नाटोशी संबंधित सर्वच देशांशी एकप्रकारे शत्रूत्व घोषित करेल. अशा प्रकारे जगातील बहुसंख्य महत्त्वाचे देश या युद्धात अप्रत्यक्षपणे ओढले जाऊ शकतात. त्यामुळे ‘जगावर तिसर्या महायुद्धाचे ढग आले आहेत’, असे म्हणायला वाव आहे.