Radical Bangladeshi Leader In India : बांगलादेशाचा कट्टरवादी नेता मुफ्‍ती झुबेर रहमानी भारतात पोचला !

रहमानी भारतात कसा पोचला, याचे अन्‍वेषण चालू

मुफ्‍ती झुबेर रहमानी

नवी देहली – बांगलादेशी कट्टरतावादी नेता मुफ्‍ती महमुदुल हसन झुबेर उपाख्‍य मुफ्‍ती झुबेर रहमानी नुकताच बंगालमधील हरिदासपूर सीमा चौकीतून भारतात पोचला आहे. रहमानी याचा भारतविरोधी कारवायांमध्‍ये सहभाग असल्‍याचा आणि ‘अन्‍सारुल्ला बांगला टीम’ या जिहादी संघटनेच्‍या प्रमुखांशी त्‍याचा संबंध असल्‍याचा संशय आहे. ‘तो भारतात कसा आला आणि तो येथे कोणकोणत्‍या कारवाया करतो ?’, याचे अन्‍वेषण भारतीय अधिकारी करत आहेत. रहमानी प्रकरणी सरकारच्‍या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रहमानी याने देहलीतील इस्‍लामी संस्‍था आणि उत्तरप्रदेशातील दारूल उलूम देवबंदला यांना भेट दिली. (भारतासाठी धोकादायक असणार्‍या रहमानी याच्‍या मुसक्‍या आवळून त्‍याच्‍यावर कारवाई करण्‍याचे धारिष्‍ट्य भारत सरकार दाखवेल का ? – संपादक)

रहमानी याची अलीकडेच कारागृहातून सुटका

रहमानी सामाजिक माध्‍यमांतून भारतविरोधी प्रचार करत आहे आणि भारतविरोधी घटक, आतंकवादी आणि भारतीय उत्‍पादने यांच्‍यावर बहिष्‍कार टाकणारे यांना पाठिंबा देत असल्‍याचा आरोप आहे. ईशान्‍येकडील राज्‍ये भारतापासून वेगळी करण्‍याच्‍या मागणीचे तो समर्थन करत असल्‍याचाही आरोप आहे.

गेल्‍या महिन्‍यात बांगलादेशातील महंमद युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखाली अंतरिम सरकारने स्‍थापन झाले. या सरकारने बंदी घालण्‍यात आलेला जमात-ए-इस्‍लामी या राजकीय पक्षाच्‍या दबावाखाली आतंकवादी नेत्‍यांना कारागृहांतून सोडले होते. त्‍या वेळी रहमानी याची काशिमपूर मध्‍यवर्ती कारागृहातून सुटका करण्‍यात आली होती. जमात-ए-इस्‍लामी या राजकीय संघटनेला मागील शेख हसीना सरकारने अवैध घोषित केले होते.

संपादकीय भूमिका 

रहमानी भारतात पोचल्‍यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेचे धिंडवडे निघाले आहेत, हे नक्‍की. भारताचा शत्रू म्‍हणून ओळखला जाणारा रहमानी भारतात पोचतो आणि भारतीय यंत्रणांना त्‍याची माहिती मिळत नाही, हे संतापजनक !