नवी मुंबई, १४ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची मागणी बजरंग दलाच्या वतीने वाशी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानेश महाराव यांनी हिंदु धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि उर्मिला माता, तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा जाणीवपूर्वक अपमान करून समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी ज्ञानेश महाराव आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ज्ञानेश महाराव हे समाजात जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून यावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
‘यापुढे हिंदु धर्माच्या विरोधात कुणी टीका केल्यास त्याला चप्पल मारून धडा शिकवला जाईल’, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषद मातृशक्ति कोकण प्रांत संयोजिका मनिषाताई भोईर यांनी दिली, तसेच आरोपीस लवकरात लवकर अटक न झाल्यास विश्व हिंदु परिषद पुन्हा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करेल, असे विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री सरूप पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
या वेळी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील, जिल्हा सहसंयोजक शंकर संगपाळ, मातृ शक्ति जिल्हा संयोजिका माया परमार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि श्री स्वामी समर्थ कोपरखैरणे केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद
नवी मुंबई, १४ सप्टेंबर (वार्ता.) – ‘साप्ताहिक चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पनवेल येथे रहाणारे अधिवक्ता चिन्मय समेळ यांनी या संदर्भात तक्रार प्रविष्ट केली होती.
महाराव यांनी वाशीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभु श्रीराम आणि हिंदु संतांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे हिंदु संघटनांनी महाराव यांच्या वादग्रस्त विधानावर आक्षेप घेतला आहे. ज्ञानेश महाराव यांच्या याच वक्तव्यावर पनवेल येथे रहाणारे अधिवक्ता चिन्मय समेळ यांनी आक्षेप घेत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्यांनी ज्ञानेश महाराव यांनी समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी या हेतूने जाणीवपूर्वक प्रभु श्रीराम आणि हिंदु संत यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याचे, तसेच त्यांनी श्री स्वामी समर्थांची टिंगल करून हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणले. अधिवक्ता समेळ यांनी महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. अधिवक्ता समेळ यांचा तक्रार अर्ज १२ सप्टेंबर या दिवशी वाशी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर वाशी पोलिसांनी सायंकाळी समेळ यांचा जबाब नोंदवून ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भा.न्या.सं. कलम २९९, ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाज्ञानेश महाराव यांना कठोर शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे लढा देत रहाणे आवश्यक ! |