देवाने या वर्षी अनेक साधकांची आध्यात्मिक पातळी तेवढीच ठेवण्यामागील उलगडलेली श्री गुरुमाऊलीची कृपामय लीला !

‘प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आत्मोन्नतीदर्शक सारणी प्रसिद्ध होते. या सारणीत ‘६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांची आध्यात्मिक पातळी किती टक्के आहे ?’, याचे गुरुमाऊली सूक्ष्मातून अवलोकन करून सांगते. प्रतिवर्षी काही साधकांची पातळी न्यून होते, काही जणांची तेवढीच रहाते, तर काही जणांची वाढलेली असते. वर्ष २०२४ मध्ये काही साधकांची पातळी वाढली, तर बर्‍याच साधकांची पातळी तेवढीच राहिली. हे सूत्र मला समजल्यावर माझ्या मनात ‘आम्ही साधक साधनेत कुठे न्यून पडलो; म्हणून गुरुदेवांच्या अनेक साधकांची पातळी तेवढीच राहिली’, असा विचार येऊ लागला. त्यावर देवाने साधकांची आध्यात्मिक पातळी न वाढता ती तेवढीच रहाण्यामागील सांगितलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव सांगतांना मला पुढील दृष्टीकोन दिले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. आपत्काळाला सामोरे जाण्यामध्ये साधकांच्या साधनेचा व्यय झालेला असणे

साधकांचे प्रयत्न अल्प झाले नसून सध्या चालू असलेल्या आपत्काळाला सामोरे जाण्यामध्ये साधकांची ३० टक्के साधना व्यय झाली.

२. भीषण देवासुर संग्रामात साधकांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या साधनेचा व्यय होणे

सध्या देवासुरांचे सूक्ष्मातील घनघोर युद्ध चालू आहे. त्यामुळे सूक्ष्मातील वाईट शक्ती सूक्ष्मातून साधकांवर जीवघेणी आक्रमणे करत आहेत. त्यामुळे साधकांना विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वरूपांचे त्रास होत आहेत. अशा या भीषण देवासुर संग्रामात साधकांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या साधनेचा व्यय होत आहे.

३. केवळ आध्यात्मिक पातळीच्या स्वरूपातच नव्हे, तर अन्य अनेक प्रसंगांमध्ये स्वतःची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे दिसून येणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘आध्यात्मिक पातळीमध्ये वृद्धी होणे, म्हणजे प्रगती’, असे नसून कार्यकर्त्याचे रूपांतर साधकात होणे आणि साधकाचे रूपांतर शिष्यात होणे, स्वतःच्या साधनेच्या संदर्भात अंतर्मुखता वाढणे, व्यष्टी अन् समष्टी साधना अधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण होणे, समष्टीतील उत्तरदायित्व घेऊन समष्टी साधना करणे, ईश्वराशी अनुसंधान वाढणे, भावस्थितीत वृद्धी होणे, अनेक प्रतिकूल प्रसंगांमध्ये स्थिर राहून धैर्याने तोंड देता येणे इत्यादी सर्व गुरुकृपेमुळे झालेल्या प्रगतीचेच लक्षण आहे. त्यामुळे साधकांनी ‘पातळी वाढली नाही’, हा विचार न करता ‘वरीलप्रमाणे स्वतःमध्ये कोणते सकारात्मक पालट झाले ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार केला, तर अनेक प्रसंगांमध्ये स्वतःची प्रगती झाल्याचे दिसून येते.

४. साधकांकडून सकाम साधना न होता त्यांची निष्काम साधना होण्यासाठी गुरुमाऊलीने केलेली कृपाच असणे

साधकांच्या मनात ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढण्यासाठी साधना करणे’, हा सकाम उद्देश निर्माण झालेला आहे. गुरुतत्त्व सतत ‘साधकांना मोक्षप्राप्ती व्हावी’, यासाठी कार्यरत असते. साधकांकडून सकाम साधना न होता त्यांची निष्काम साधना होण्यासाठी देवाने त्यांच्याकडून या वर्षी साधना करवून घेतली; परंतु त्यांची आध्यात्मिक पातळी सांगितली नाही. त्यामुळे साधकांच्या मनातील सकाम साधनेचा संस्कार क्षीण होऊन निष्काम साधना करण्याचा संस्कार दृढ होणार आहे.

५. ‘साधनेचे ध्येय आध्यात्मिक पातळी नसून चांगला साधक आणि शिष्य बनणे’, हा असल्याची जाणीव होणे

आपण जेव्हा साधनेत आलो, तेव्हा ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पातळी प्राप्त करण्यासाठी आलो नसून ‘चांगला साधक आणि शिष्य बनून श्री गुरूंची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आलो आहोत’, या ध्येयाचा साधकांना विसर पडला आहे. त्याची जाणीव होण्यासाठी गुरुमाऊलीने या वर्षी अनेकांची आध्यात्मिक पातळी सांगितली नाही.

६. या वर्षभरात साधकांनी ‘कोणकोणत्या प्रसंगी गुरुकृपा अनुभवली’, याचे चिंतन करण्यासाठी गुरुमाऊलीने केलेली ही लीलाच असणे

साधकांच्या मनात ‘आध्यात्मिक पातळी वाढणे म्हणजे गुरुकृपा होणे’, असे समीकरण नकळत निर्माण झाले आहे. याउलट साधकांना ‘प्रारब्ध भोग भोगण्यासाठी शक्ती मिळणे, जीवघेणे अरिष्ट टळणे, कुटुंबियांशी असलेला देवाण-घेवाण हिशोब संपणे, महामृत्यूयोग टळणे इत्यादी विविध घटकांच्या पाठीमागे गुरुकृपाच कार्यरत असते’, याची जाणीव होऊन श्री गुरूंविषयी कृतज्ञताभाव वाढण्यासाठी साधकांची वृत्ती अंतर्मुख होणे आवश्यक असते. या वर्षी साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित न झाल्यामुळे साधकांची वृत्ती अंतर्मुख होऊन त्यांच्या मनाची नेमकी हीच प्रक्रिया घडून ‘या वर्षभरात त्यांनी गुरुकृपा कोणकोणत्या प्रसंगी अनुभवली ?’, याचे चिंतन करण्यासाठी गुरुमाऊलीने केलेली लीलाच आहे. त्यामुळे त्यांना गुरुकृपेचा आनंद अनुभवण्यास मिळून त्यांच्या हृदयात श्री गुरुमाऊलीप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होऊन भावाच्या स्थितीत वृद्धी होणार आहे.

श्री गुरुचरणी एका निनावी साधकाने व्यक्त केलेली भावमय कृतज्ञता !

आम्हा सर्वांचे परम पूजनीय गुरुदेव म्हणजे…
कोळशाच्या खाणीतून साधकरूपी हिरे शोधणारे,
तुम्ही दैवी रत्नपारखी आहात ।

चिखलापासून साधकरूपी मूर्ती घडवणारे,
तुम्ही दैवी मूर्तीकार आहात ।

दगडातून साधकरूपी सुंदर शिल्प घडवणारे,
तुम्ही दैवी शिल्पकार आहात ।

वेळप्रसंगी आई-वडील-बंधु-सखा यांची भूमिका करून,
साधकांना आधार देणारे, तुम्ही श्रेष्ठतम कलाकार आहात ।

साधकांवरील मायेचे आवरण दूर करून
त्यांना साधनेतील निखळ आनंद, अनुभवण्यास देणारे
आमची
प्रिय गुरुमाऊली तुम्ही आहात ।

– एक साधक

७. कृतज्ञता

देवाच्या कृपेने मला ‘गुरुमाऊलीप्रती निष्काम भाव ठेवून अखंड साधनारत आणि सेवारत रहाणे त्यांना अपेक्षित आहे’, याचा आत्मबोध झाला. गुरुमाऊली, देवाने तुमची दिव्य लीला उलगडून दाखवली, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याचा दिनांक २.८.२०२४ दुपारी ४.२५ ते ४.५०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक