गेल्या अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. तसे पाहिले, तर युक्रेनच्या खांद्यावर ‘नाटो’ देशांनी बंदूक ठेवून ते रशियावर शस्त्र उगारत आहेत. ५ सप्टेंबरला ‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले की, रशियाच्या युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझिल मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. यासाठी हे देश प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. युक्रेनची इच्छा असल्यास ते संवाद प्रक्रिया पुढे नेण्यास सिद्ध आहेत, असे सांगून त्यांनी युक्रेनशी चर्चेचे संकेत दिले आहेत, तसेच संभाव्य मध्यस्थ म्हणून त्यांनी भारताचे नाव सुचवल्यामुळे भारताने जगात वाढलेले राजकीय महत्त्व पुन्हा प्रत्ययास आले. युद्ध थांबवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पुतिन यांनी सांगितले आहे. अशातच ‘नाटो’चा महत्त्वपूर्ण सदस्य असलेल्या इटलीने हा संघर्ष थांबवण्यासाठी भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची ७ सप्टेंबरला भेट घेतल्यानंतर म्हटले की, रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात. येथे रशियासमवेत इटली या देशालाही ‘भारत हे युद्ध थांबवू शकतो’, असा विश्वास आहे.
जगात भारताचे महत्त्व अधोरेखित !
अमेरिका, जर्मनी, इंग्लड, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांसाररख्या देशांनी या युद्धात युक्रेनला साहाय्य केले आहे. त्यामुळे रशिया या देशांवर पुष्कळ अप्रसन्न असून पुतिन यांनी आण्विक युद्धाची धमकीही या देशांना दिली आहे. एकंदरीत या देशांवरील पुतिन यांचा विश्वास उडाला आहे. रशियाला भारत हा देश सर्वांत जवळचा वाटत असल्याने त्यांनी भारताविषयी हे विधान केले आहे. पुतिन यांनी केलेल्या विधानातून जगात भारताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. इतर वेळी कायम भारताला तुच्छतेने खालच्या स्तरावर पहाणार्या आणि प्रत्येक देशाच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप करून स्वतःचा स्वार्थ साधणार्या अमेरिकेला हा मोठा झटका आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही २ देशांचे युद्ध असेल, तर अमेरिका अधिकाधिक मध्यस्थी करत होती. पुतिन यांच्या वक्तव्यामुळे अडीच वर्षांपासून चालू असलेले युद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतावर रशिया आणि युक्रेन यांचा विश्वास !
यासमवेत एका पातळीवर रशियाची ही मागणी भारताच्या आतापर्यंतच्या स्वतंत्र आणि संतुलित दृष्टीकोनाची पुष्टी म्हणूनही पाहिले जाऊ शकते. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या प्रवक्त्याने हे तथ्य अधोरेखित केले की, भारत युद्धात सामील असलेल्या दोन्ही बाजूंच्या माहितीवर थेट प्रवेश करून प्रकियेचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. इतर कोणत्याही देशात ही स्थिती दिसत नाही. एकंदरीत दोन्ही देशांशी सहकार्याचे संबंध राखण्याचा भारताचा आग्रह, जागतिक नेत्यांसमवेत उत्कृष्ट वैयक्तिक संबंध, विकसित करण्याची पंतप्रधान मोदी यांची क्षमता आणि सर्व परिस्थितीत राष्ट्रीय हितावर आधारित स्वतंत्र अन् संतुलित धोरणावर टिकून रहाण्याची त्यांची वचनबद्धता यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. गेल्या २ मासांत रशिया आणि युक्रेन यांना भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव प्रमुख जागतिक नेते आहेत. पुतिन आणि व्लोदिमिर झेलेंस्की या दोघांच्या भेटीत त्यांनी भारताला शांततेचा समर्थक असल्याचे सांगून चर्चा चालू करण्याचे सुचवले होते. प्रारंभीपासून भारताचे स्पष्ट मत आहे की, शांततेचा मार्ग तेव्हाच उघडू शकतो, जेव्हा दोन्ही पक्ष त्यासाठी सिद्ध असतील आणि या प्रक्रियेत सहभागी होतील. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे ताजे विधान नक्कीच सकारात्मक घडामोड आहे; मात्र हा केवळ प्रारंभ आहे. युक्रेनचा दृष्टीकोनही सकारात्मक असेल, तर दोन्ही पक्षांची सहमती ही गोष्ट पुढे नेण्यासाठी निश्चित ठोस आधार देऊ शकेल. सरत्या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वॉशिंग्टनमधील उपस्थितीने अमेरिकेशी भारताचे वाढणारे धोरणात्मक संबंध अधोरेखित केले, तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि झेलेंस्की यांच्याशी मोदी यांच्या जलद भेटींनी त्यांच्यावर प्रकाश टाकला. भारत आणि युक्रेनमधील संबंध भक्कम करणे, तसेच भारत अन् युक्रेन यांच्यामधील द्विपक्षीय संबंध पुनर्संचयित करणे या दृष्टीनेही मोदी यांचा युक्रेन दौरा महत्त्वाचा होता. आज ३ आघाड्यांवर दृष्टी आहे. पहिली गोष्ट म्हणजे युरोपच्या शांतता उपक्रमात भारताचा समावेश करणे. दुसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या जागतिक भू-राजकीय गोंधळात भारताचा सहभाग वाढवणे आणि तिसरे सूत्र म्हणजे सोव्हिएत काळापासून थंडावलेले युक्रेनसमवेतचे भारताचे राजनैतिक संबंध पुनरुज्जीवित करणे. मोदी यांच्या युक्रेन आणि पोलंड दौर्यानंतर अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांना खात्री पटली आहे की, भारत युक्रेनसमवेत एकत्र पुढे जात आहे. म्हणजे भारताचा कल ना रशियाकडे आहे, ना पाश्चात्त्य देशांकडे ! जागतिक राजकीय पटलावर भारत तोच मार्ग स्वीकारील, जो भारत आणि जग यांसाठी चांगला असेल, हे सर्व देशांना कळून चुकले आहे.
भारतातील विघातक कृत्यांकडे लक्ष देणे आवश्यक !
जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नावलौकिक मिळवून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांनी वाहन, व्यापार, शस्त्रनिर्मिती यातून अनेक देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यामुळे देशाची विकासाच्या दृष्टीने वाटचाल होत आहे. असे असले, तरी भारतातील अंतर्गत गोष्टींकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन देशातील प्रश्न सोडवले पाहिजेत. याचे कारण पाकिस्तान, बांगलादेश, चीन या देशांचा भारताला धोका आहेच, त्याखेरीज देशात चालू असलेले महिलांवरील अत्याचार, वाढत चाललेला शहरी नक्षलवाद, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांची घुसखोरी, वक्फ मंडळाचा देशविघातक कायदा, लव्ह जिहाद, लँड जिहाद, वाढती गुन्हेगारी, दंगली, असे अनेक प्रश्न देशासमोर उभे आहेत. केवळ श्रीराम मंदिर बांधून आणि ३७० कलम हटवून देशातील समस्या सुटणार नाहीत. देशातील कायद्याच्या रचनेत पालट करून, म्हणजे कडक कायदे करून तेवढ्याच चातुर्याने हे प्रश्न सोडवावे लागतील. हे करत असतांना भारतातील डाव्या आघाडीच्या मंडळींकडून मोदी यांना विरोध होणारच आहे. त्याला मोदी यांनी तोंड देऊन सडेतोडपणे त्यांचा विरोध मोडून काढणे आवश्यक आहे. देशाचे हे प्रश्न न सोडवल्यास देशाची बांगलादेश आणि पाकिस्तान यांसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही. देशातील हे प्रश्न सोडवून हिंदूंना न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी सर्व हिंदूंची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतीचा दूत म्हणून ओळख निर्माण होत असलेले पंतप्रधान मोदी यांनी देशातही शांततेसाठी कठोर निर्णय घ्यावेत ! |