पालखी मिरवणुकीने श्री क्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’चा जन्मोत्सव सोहळा प्रारंभ : पहिला पूर्वद्वार सोहळा !

ओझर येथील विघ्नेश्वर

श्री क्षेत्र ओझर (जिल्हा पुणे) – अष्टविनायकांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र ओझर येथील देवस्थानचा श्री गणेशचतुर्थीचा सोहळा पहिला पूर्वद्वार उंब्रज लक्ष्मीनारायण पूजा करून पार पडला. हा सोहळा ४ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडला. या उत्सवामध्ये ‘द्वारयात्रे’ला विशेष महत्त्व असून ‘श्री’ त्यांच्या बहिणीला आणण्यासाठी ४ गावांमध्ये असणार्‍या मंदिरामध्ये पालखी घेऊन जातात, अशी आख्यायिका आहे. या पालखी सोहळ्यात सहस्रो भाविक अनवाणी ‘श्रीं’च्या पालखीसमवेत चालतात. या प्रसंगी ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे, विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री क्षेत्र ओझर येथे निघालेली पालखी मिरवणूक

या पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रासादिक भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ यांच्यासह १० सहस्रांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रांगोळ्या काढून श्री विघ्नहर्त्याच्या पालखीचे स्वागत फुलांची उधळण करून ग्रामस्थांनी केले. यात स्थानिक मंडळे, शेतकरीवर्ग यांनी ‘द्वार यात्रे’त सहभागी झालेल्या भाविकांना अल्पाहार, पाणीव्यवस्था पालखी मार्गात उपलब्ध केली होती.

दुपारी १२ वाजता श्री विघ्नहर्त्याच्या पालखीचे प्रस्थान महालक्ष्मी मंदिरात झाले. मंदिरामध्ये गेल्यानंतर धार्मिक विधी पार पडून तेथील ग्रामदेवता ट्रस्ट उंब्रज यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे आणि विश्वस्त मंडळाचा सत्कार केला. श्री. बाळकृष्ण कवडे यांनी उंब्रजमधील ग्रामस्थांना श्री विघ्नहर्त्याच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आमंत्रण दिले. दुपारी ३.३० वाजता पालखीचे ओझर येथील मंदिरात आगमन झाले. मंदिरात मोरया गोसावींच्या पदांचे गायन होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. द्वारयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादालयात खिचडीचे वाटप करण्यात येऊन पहिल्या द्वारयात्रेची सांगता झाली.