‘माझ्याकडे काही वेळा देवद (पनवेल) येथील आश्रमात स्वयंपाक घरातील पोळी करण्याच्या यंत्रावर पोळ्या करण्याची सेवा असते. ही सेवा करतांना ‘माझ्या मनाची होणारी विचारप्रक्रिया आणि देव मला करत असलेले साहाय्य’ यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
१. मनातील अयोग्य विचारांचे प्रतिबिंब पोळीवर उमटून ती करपणे आणि देवाची क्षमायाचना केल्यावर पोळी न करपणे
पोळ्या करतांना माझ्या मनात ‘एखादा अनावश्यक विचार किंवा एखाद्या स्वभावदोष-अहं यांच्याशी निगडीत विचार असेल, तर त्या वेळी लगेच एखादी पोळी करपते’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मी लगेचच देवाची क्षमायाचना करून सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर तव्यावरील पोळी करपत नाही.
२. मन ईश्वरी अनुसंधानात असल्यास पोळ्या करण्याची सेवा अगदी सहजस्थितीत होणे
माझे मन ईश्वरी अनुसंधानात असेल किंवा भावाच्या स्तरावर प्रयत्न होत असतील, तर सेवेतील गतीही टिकून रहाते. त्या वेळी ‘पोळ्या बनवण्याची सेवा अगदी सहजस्थितीत होत आहे’, असे मला जाणवते. तेव्हा पोळ्या चांगल्या फुगतातही ! जणू काही ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायानुसार देव सेवा करून घेत आहे’, असे मला जाणवते.
३. सेवेत नामजप करतांना मन भरकटल्यास चटका बसणे आणि ‘देवच सतर्क करत आहे’, असे जाणवणे
एखाद्या वेळी नामजप करतांना मध्येच मन भरकटले की, माझ्या हाताला यंत्राचा थोडासा स्पर्श होऊन चटका बसतो. त्या वेळी माझ्या लक्षात येते की, ‘देवच मला माझ्या अयाेग्य विचारांची जाणीव करून देऊन पुन्हा ईश्वरी अनुसंधानात आणत आहे. तोच मला सतर्क करत आहे.’
यंत्राच्या माध्यमातून देव मला माझ्या मनाची योग्य-अयोग्य स्थिती लक्षात आणून देतो आणि साधनेत साहाय्य करतो. पोळ्यांची सेवा साधारणतः एक ते दीड घंट्याची असते. त्या कालावधीत वेगळ्या स्वरूपाचे ईश्वरी अनुसंधान अनुभवण्यास मिळते; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
४. ‘पोळ्यांचे यंत्र म्हणजे गुरुसेवक’ असून त्याच्या समवेत साधकांसाठी पोळ्या करत आहे’, असे वाटून आनंद होणे
वास्तविक ‘पोळ्यांचे यंत्र’ म्हणजे एक निर्जीव वस्तू आहे; पण सनातनच्या आश्रमांतील कोणतीही वस्तू ही निर्जीव नसून सजिवाप्रमाणेच भासते; कारण ती केवळ वस्तू नसून ‘माझ्या सेवेत साहाय्य करणारा गुरुसेवक आहे’, असा सर्व साधकांचा भाव असतो. ‘ते यंत्र म्हणजे गुरुसेवक आहे’, असेच मला वाटते. ‘ते यंत्र आणि मी असे आम्ही दोघे मिळून साधकांसाठी पोळ्या करत आहोत’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळतो.
५. पोळ्या करतांना केलेले भावाच्या स्तरावरील प्रयत्न
अ. प.पू. भक्तराज महाराज यांचा मोठा भंडारा असून त्या भंडार्यात साधकांच्या महाप्रसादासाठी मी पोळ्या करण्याची सेवा करत आहे.
आ. यातील पोळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ग्रहण करणार आहेत.
इ. साधकांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच महाप्रसाद घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पोळी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी प्रयत्न करणे
ई. या पोळीच्या माध्यमातून साधकांना सेवा आणि साधना करण्यासाठी बळ मिळणार आहे. त्यामुळे यंत्रामध्ये कणकेचा गोळा ठेवतांना नामजप करणे
उ. यंत्राचा आकार विशाल असून ‘त्याचा आतील भाग म्हणजे पोकळी आहे आणि त्यासमोर मी शून्य आहे’, असे मला वाटते.
६. पोळ्या करतांना होत असलेल्या प्रार्थना
अ. ‘हे गुरुदेवा, ‘शबरीचा जसा श्रीरामाप्रती भाव होता, तसा भाव माझ्यातही निर्माण होऊ दे.’
आ. पोळी सिद्ध होतांना तिला गॅसची धग सहन करावीच लागते. त्याच प्रकारे देवाला अपेक्षित असे घडण्यासाठी मला स्वभावदोष आणि अहं यांच्याशी संघर्ष करावाच लागणार आहे. त्यासाठी देवा, ‘तू मला बळ दे.’
इ. पोळी गोलाकार झाल्यासच ती परिपूर्ण होते. त्याप्रमाणे मलाही माझी सेवा आणि साधना यांच्या प्रयत्नांत परिपूर्णता आणता येऊ दे.
ई. पोळ्यांचे यंत्र जसे गतीमान आहे, त्याप्रमाणे देवा, ‘मलाही साधनेच्या प्रवासात गतीमान रहाण्यास शिकव.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, ‘माझ्याकडून सेवा आणि साधना व्हावी, यासाठी आपणच आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न करून घ्यावेत’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.’
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.७.२०२४)