दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अर्ज सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार !; मुंबईत लहान मुलीला मुलींकडूनच मारहाण !…

‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना’ अर्ज सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार !

यवतमाळ – ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजने’त सव्वालाख पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी ३ सहस्र रुपये जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज करणार्‍या महिलांचीही संख्या वाढली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना ३ महिन्यांचे पैसे मिळतील. सप्टेंबरमध्येही अर्ज घेऊ, जोपर्यंत शेवटचा अर्ज येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथे केले.


मुंबईत लहान मुलीला मुलींकडूनच मारहाण !

  • गुंड मुलांप्रमाणे मुलींनीही शाळेत मारामारी करणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम !
  • मुलींना मारहाण करायला लावणारे कोण आहेत ? हे शोधणे आवश्यक !

मुंबई – वर्साेवा (मुंबई) येथे यारी रोड परिसरात शाळेचा गणवेश घातलेल्या एका लहान मुलीला मुलींकडून निर्दयीपणे मारहाण आणि शिवीगाळ केली गेली. तिने यातून सुटका करून घेतली, तरी मुलींनी तिला पकडून खराब पाण्यात टाकून तिला मारहाण केली. याचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. या घटनेत आजूबाजूला असलेल्यांपैकी एकही जण मुलीला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. (असंवेदनशील जनता ! – संपादक) २ मुलांनी तिची सुटका केली. मुलीला मारणार्‍या मुलींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


बाळकुम (ठाणे) येथील इस्कॉन मंदिरात गर्दी होण्याची शक्यता

बाळकुम (ठाणे) – येथे काही महिन्यांपूर्वी नव्याने उभारलेल्या इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ५० सहस्रांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील बाळकुम, कापूरबावडी, कोलशेत, ढोकाळी भागांत मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी २५ आणि २६ ऑगस्ट साठी वाहतुकीच्या मार्गांत पालट केले आहेत.


अमरावती-नागपूर महामार्गावर अपघात १ दगावला, २५ घायाळ

अमरावती – अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत. गाय वाटेत आल्याने तिला वाचवतांना बस रस्त्यावरून खाली उतरली. त्यानंतर ती पलटी झाली. ३ प्रवासी उशिरापर्यंत आत अडकले होते.