सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवल्यावर दोन्ही डोळ्यांतील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म सहजतेने होणे

श्री. नंदकिशोर नारकर

१. नेत्ररोगतज्ञांनी ‘मोतीबिंदू होण्यास आरंभ झाला आहे’, असे सांगितल्यावर मनाची घालमेल होणे

‘मी माझे डोळे तपासण्यासाठी नेत्र रुग्णालयात गेलो होतो. नेत्ररोगतज्ञानीं सांगितले, ‘‘मोतीबिंदू होण्यास आरंभ झाला आहे.’’ ते ऐकून माझ्या मनाची घालमेल चालू झाली; कारण आतापर्यंत माझे कसलेही शस्त्रकर्म झालेले नाही. नेत्ररोगतज्ञ मला म्हणाले, ‘‘१५ दिवसांनंतर शस्त्रकर्म करूया’’; पण नंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘९.६.२०२३ या दिवशी तुमचे शस्त्रकर्म करूया.’’ त्यामुळे शस्त्रकर्माला अजून २ मास अवधी होता. मधल्या कालावधीत मी हा विषय विसरून गेलो.

२. नेत्र रुग्णालयातून शस्त्रकर्माविषयी निरोप आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवणे

२.६.२०२३ या दिवशी मला नेत्र रुग्णालयातून शस्त्रकर्माविषयी निरोप आला आणि माझ्या मनात पुन्हा हूरहूर चालू झाली. मी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना आळवायला आरंभ केला. रात्री स्वप्नातही मला ‘प. पू. डॉक्टरच माझे शस्त्रकर्म करत आहेत’, असे दिसत होते.

३. पहिल्या डोळ्याच्या शस्त्रकर्माच्या वेळी आलेल्या अनुभूती

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखेच दिसणारे नेत्र शल्यकर्मतज्ञ पाहून देहभान हरपणे : ९.६.२०२३ या दिवशी ‘प.पू. डॉक्टरच माझा हात धरून मला शस्त्रकर्मकक्षात घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. शस्त्रकर्मकक्षात प.पू. डॉक्टरांसारखेच उंच आणि त्यांच्यासारखेच दिसणारे नेत्र शल्यकर्मतज्ञ पाहून मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांना पहातांना मी माझे देहभान विसरलो.

३ आ. शस्त्रकर्म चालू असतांना ‘डोळ्यांवरून मोरपीस फिरत आहे’, असे जाणवणे : माझ्या डोळ्याचे शस्त्रकर्म चालू असतांना मला ‘माझे डोळे आणि अंग यांवरून मोरपिस फिरत आहे’, असे वाटत होते. त्यामुळे ‘शस्त्रकर्म कधी झाले ?’, हे मला कळलेही नाही.

४. दुसर्‍या डोळ्याच्या शस्त्रकर्माच्या वेळी आलेल्या अनुभूती

४ अ. पांढर्‍या वेशातील नेत्र शल्यकर्मतज्ञ आणि त्यांचे साहाय्यक ‘वारकरी आहेत’, असे दिसणे अन् शस्त्रकर्मकक्षात भक्तीगीते ऐकू येणे : ‘५.७.२०२३ या दिवशी माझ्या दुसर्‍या डोळ्याचे शस्त्रकर्म झाले. मला पांढर्‍या वेशातील नेत्र शल्यकर्मतज्ञ आणि त्यांचे सर्व साहाय्यक वारकर्‍यांप्रमाणे भासत होते. मला तिथे भक्तीगीते आणि अभंग ऐकू येत होते. त्यामुळे शस्त्रकर्माच्या वेळी ‘मी शस्त्रकर्मकक्षात नसून देवळात आहे’, असे मला वाटले. त्या मंगलमय वातावरणात ‘माझे शस्त्रकर्म कधी पूर्ण झाले’, हे मला कळलेही नाही.

५. शस्त्रकर्मानंतर मला कुठलाही त्रास झाला नाही.

‘मला डोळ्यांच्या शस्त्रकर्माच्या वेळी अशा आनंददायक अनुभूती दिल्या’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रय नारकर (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक