संशयिताच्या घरातून दीड लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा कह्यात
कुडाळ – शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट नोटा भरल्याच्या प्रकरणाचे मूळ या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुरेंद्र (सूर्या) रामचंद्र ठाकूर याच्या पलूस (जिल्हा सांगली) येथील घरी असल्याचे उघड झाले. ठाकूर याच्या घरातून १ लाख ३४ सहस्र ७०० रुपयांच्या बनावट नोटा कह्यात घेतल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या ‘कॅश डिपॉझिट मशीन’मध्ये ३ सहस्र २०० रुपये किमतीच्या भारतीय चलनासारख्या दिसणार्या १९ बनावट नोटा भरण्यात आल्याविषयी बँकेच्या शाखाधिकार्यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ठाकूर याच्यासह निशिगंधा कुडाळकर (पिंगुळी, कुडाळ) आणि विजय रविकांत शिंदे (मुळदे, कुडाळ) यांना अटक केली होती. हे तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून १४ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपणार आहे. या आरोपींकडून ३ कलर प्रिंटर, नोटांसाठीचे अन्य साहित्य, तसेच १ लाख ३४ सहस्र ७०० रुपयांच्या नोटा, असा एकूण १ लाख ७९ सहस्र ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. वर्ष २०२१ मध्ये कुडाळ शहरात ५ लाख २५ सहस्र रुपये किमतीच्या बनावट नोटांविषयीचा एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात उपरोक्त तिघांचा समावेश आहे का ? याची चौकशी करत असल्याचे पोलीस निरीक्षक मगदूम यांनी सांगितले.