मानधन घेऊन ५० सहस्र युवक शासकीय योजनांचा प्रसार करणार !

मुंबई, ८ ऑगस्ट (वार्ता.) – शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा, यासाठी प्रत्येक महिन्याला १० सहस्र रुपये इतके मानधन देऊन महाराष्ट्र सरकार ५० सहस्र युवकांची ‘योजनादूत’ म्हणून नियुक्ती करणार आहे. ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रमाच्या अंतर्गत हे युवक सरकारी योजनांचा प्रचार करणार आहेत.

प्रत्येक ग्रामपंचयातीमध्ये १, तसेच शहरात ५ सहस्र लोकसंख्येमागे १ अशा प्रकारे योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सरकार या युवकांशी ६ महिन्यांचा करार करणार आहे. यासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर, महाराष्ट्राचा अधिवासी, संगणक ज्ञान असलेला, स्मार्टफोन जवळ असलेला आदी निकष ठेवण्यात आले आहेत.