गुरुगीतेत स्पष्ट केले आहे, ‘श्री गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ‘ब्रह्म’ आहेत.’ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्त, साधक अथवा शिष्य आचरण करील, त्याची साधना श्री गुरुच करवून घेतात. गुरु त्याला अनुभूती आणि प्रत्यक्ष स्वरूपात ज्ञान देऊन त्याचे अज्ञान दूर करतात. श्री गुरूंचे सर्व लक्ष त्यांचे भक्त, साधक अथवा शिष्य यांच्या आध्यात्मिक उन्नतीकडे केंद्रित झालेले असते. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाच्या संपर्कात आलेला असतो आणि कालांतराने तो शिवाशी जोडला जातो. (‘जीव शिवाशी जोडला जातो’, म्हणजे जिवाने पूर्ण शरणागती पत्करल्यावर त्याचे अस्तित्व लयास जाऊन तो गुरूंशी एकरूप होतो.) ‘शिष्याची आध्यात्मिक प्रगती होवो’, असा गुरूंचा संकल्प झाला की, त्याची खरी प्रगती होते. यालाच ‘गुरुकृपा’ म्हणतात. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ : ‘गुरु-शिष्य’)