‘तस्मै श्री गुरवे नमः ।’ म्हणजे ‘त्या श्री गुरूंना मी नमस्कार करतो.’
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ।।
अर्थ : पूर्ण फुललेल्या कमळाच्या पाकळीसारखे टपोरे डोळे असलेले विशाल बुद्धीचे व्यास, ज्यांनी महाभारतरूपी तेलाने पूर्ण असा ज्ञानमय दीप प्रज्वलित केला, त्या तुम्हाला नमस्कार असो.
ज्ञानमयः प्रदीपः ।
अत्यंत विशालबुद्धी आणि फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात ज्ञानाचा दीप लावून अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्यास साहाय्य केले, त्या महर्षि व्यासांना नमस्कार ! ज्ञानदान, हे महर्षि व्यासांचे कार्य इतके प्रधान आणि लक्षणीय आहे की, त्यांचा स्मृतीदिन आपण ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा करतो. त्यांची शिकवण संस्कृती घडवणारी आहे. व्यासः महर्षि हे मत्स्यकन्या सत्यवती आणि ऋषिवर्य पराशर यांचे सुपुत्र ! हे महान ज्ञानी होते. वेगवेगळ्या ऋषींकडे विखरून राहिलेल्या वेदांच्या ऋचा एकत्र करून, त्यांचे वर्गीकरण करून ४ वेद बनवण्याचे काम व्यासांनी केले; म्हणून त्यांना वेदव्यास असेसुद्धा म्हणतात.
महर्षि व्यास, म्हणजे ३ वदन नसलेले ब्रह्मा, दोनच हात असलेला हरि आणि तिसरे नेत्र नसलेले भगवान शंकर आहेत. सनातन भारतीय धर्माचा पाया असलेल्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य करण्याचा मोह पुढे अनेक विद्वानांनासुद्धा आवरता आला नाही. अगदी आद्य शंकराचार्यांनीही त्यावर भाष्य केले, हे त्या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे.
कुरुक्षेत्रावर महायुद्धाच्या वेळी अर्जुनाच्या निमित्ताने कलियुगातील लोकांसाठी हेच तत्त्वज्ञान भगवंतांनी स्वतः सुगम करून सांगितले. भगवद्गीता या नावाने त्या उपदेशाचे शब्दांकन करण्याचे महान कार्य महर्षि व्यासांनी केले. आजही जीवनाच्या कुरुक्षेत्रावर गीता पदोपदी मार्ग दाखवते. ती उपलब्ध करून दिली, हे महर्षि व्यासांचे संपूर्ण विश्वावर अनंत उपकार आहेत. महाभारत या १ लाख श्लोकांच्या महाकाव्याची रचनासुद्धा व्यासांचीच ! सर्व मनुष्यांची बुद्धी समान नसते, तसेच भारंभार तत्त्वज्ञानापेक्षा रंजक गोष्टी अधिक परिणामकारक असतात, हे ते जाणत होते. मूर्ख आणि पंडित यांची बुद्धी जिथे सारखी चालते, अशी गोष्ट म्हणजे दृष्टांत किंवा कथा होय ! अगदी अल्पमती मनुष्याचीसुद्धा भवसागर तरण्याची वाट त्यांनी सोपी केली आहे.
ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते ।।
– महाभारत, पर्व १८, अध्याय ५, श्लोक ६२
अर्थ : (महर्षि व्यास म्हणतात) मी बाहू उभारून मोठ्याने ओरडून सांगतो आहे; पण कुणीच माझे ऐकत नाही. धर्मापासूनच अर्थ आणि काम प्राप्त होतात, त्या धर्माचे आचरण लोक का करत नाहीत ?
माझे दोन्ही हात वर करून मी जगाला कंठशोष करून मानवी जीवनाचे सार सांगतो; पण कुणी ऐकत नाही. ‘अर्थ आणि काम यांची प्राप्ती खरेतर धर्माच्या पालनानेच होते. तरी लोक धर्माचे पालन का बरे करत नाहीत ?’, असे विचार व्यासांना अस्वस्थ करत होते. अशा मनःस्थितीत असतांना त्यांना नारद भेटले. त्यांनी देवर्षि नारदांना व्यथा सांगितली. नारद म्हणाले, ‘अलंकार शब्द, रस आणि भाव यांनी समृद्ध असे कितीही साहित्य लिहिले, तरी जोपर्यंत श्रीकृष्णकथा कथन केली जात नाही, तोपर्यंत सर्वकाही व्यर्थ आहे. असुंदर रचना, दूषित शब्द, अलंकारहीन भाषा, रसोत्पत्तीचा अभाव असे असूनही प्रत्येक शब्दात श्रीकृष्णस्तुती वा श्रीकृष्ण भक्तीचे वर्णन असेल, तर ती रचना श्रेष्ठ ठरते.’
आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् ।
बुद्धिर्हि तेषामधिको विशेषो बुद्ध्या विहीनः पशुभिः समानः ।।
अर्थ : आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू आणि मानव यांच्यात समान आहेत. बुद्धी ही त्यांच्यातील अधिकची विशेष गोष्ट आहे. बुद्धी नसलेला (माणूस) पशूंसमान आहे.
गुरु असावा कसा ? सांगायचे, तर समर्थांच्या शब्दांत
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी । कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ।।
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगे समाधान बाणे ।।
– मनाचे श्लोक, श्लोक १८३
अर्थ : जो ज्ञानी असूनही भक्त, विवेकी, विरक्त, कृपाळू, उदार मनाचा, क्षमाशील, स्थितप्रज्ञ असतो तो जणू भगवंताचेच दुसरे रूप भासतो. नित्य सावध, विद्वान, चातुर्याने शिष्यांचे प्रबोधन करणार्या अशा त्याच्या प्रसन्न दर्शनाने समाधान प्राप्त होते.
अशा गुरूंजवळ समाधान प्राप्त होते. समर्थांनी सांगितलेले सारे गुण एकवटलेल्या वेदव्यासांना म्हणून जगदगुरु म्हणतो. स्वतः व्यास त्यांच्या शिष्यांना त्यांच्या नावाचा जप करायला सांगत नाहीत कि त्यांची पूजा करायला सांगत नाहीत. उलट भागवतपुराणात ते स्पष्ट सांगतात ‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’ म्हणजे ‘जगद्गुरु श्रीकृष्णाला मी वंदन करतो.’
– सौ. ललिता सुनील मोदी, पेण, रायगड. (साभार : ‘वैष्णव जागृती’)