प.प. श्रीधरस्वामीजी यांनी भक्तांना दिलेले बोधामृत आणि आशीर्वचन !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

१. गुरुनिष्ठा आणि गुरुकृपा यांचे महत्त्व

अ. ‘गुरुनिष्ठा अजरामर असते. ‘या निष्ठेपायी देह आणि ममता विसरावी’, असे वाटते. ‘मान-अपमान यांची पर्वा करावी’, असे वाटत नाही. दया, क्षमा आणि शांती या भावना आपोआप जागृत होतात.

आ. श्री गुरूंचा आश्रय लाभल्यावर अखंड समाधान लाभते आणि निःस्वार्थ बुद्धी आपोआप स्थिरावते.

इ. सकल सद्गुणसंपन्न झाल्याने सर्वांचे प्रेम लाभते. वाणी कोमल होते. स्व-पर यांविषयी आपसूकच सम दृष्टीकोन निर्माण होतो. ‘आपण तसे जग’ ही भावना निर्माण झाल्याने ‘इतरांच्या त्रासांत सहभागी व्हावे’, असे वाटते.

ई. विषय आणि मोह यांपासून दूर जाण्याची इच्छा होते. काम-क्रोधांवर जय मिळवण्याची इच्छा जागृत होते. ब्रह्मरूपाचा सतत ध्यास लागतो. गुरुकृपाच आपल्याला ब्रह्मस्वरूप ज्ञान मिळवून देऊन जीवनमुक्त व्हायला साहाय्य करते.

२. गुरुकृपेने दैवी संपत्ती निश्चितपणे लाभणार असून आपले जीवन ब्रह्मस्वरूप होणार असणे

सार्‍या गुण-लक्षणांपैकी एखादे अल्प असले, तरी गुरुभक्ती वाढवून, मनापासून शुद्ध सेवा करून, गुरूंचे ध्यान हे जप आणि मोक्ष मिळवण्याच्या उत्कंठतेने, साधनेच्या उत्साहाने, विनय, आज्ञापालन, शुभ आचार-विचार, उपचार, शांती, समाधान, परोपकार आणि बोलाचालीत सत्यता राखून श्री गुरूंना मान्य होईल, असे प्रयत्न करून आपण वागावे. जशी त्याची कृपा होईल, तशी दैवी संपत्ती आपल्याला निश्चितपणे लाभेल आणि आपले जीवन ब्रह्मस्वरूप होईल.

३. ‘गुरुकृपा’ कशी कार्य करते ?

मला सूर्यप्रकाश नको आहे; म्हणून एखादा डोळे मिटून चालू लागला, तरी त्याच्या अंगावर ऊन पडणारच ! त्याचे डोळे उघडे नसल्याने त्याचे मार्गक्रमण चुकणार, तरीही ऊन त्याला ऊब देणे थांबवणार नाही. गुरुकृपा तशीच आहे. साधकाने डोळे न मिटता याचना केली, तरी ‘सर्वांचा उद्धार व्हावा’, अशी गुरु प्रार्थना करतात. तेव्हा त्या साधकाचाही उद्धार होतोच, याचे कारण गुरुकृपा सर्वांवर होत असते; पण तो म्हणत असेल, ‘मोक्षाची अपेक्षा ठेवूनही साधनेविना ते मिळायला हवे’, तर ते होणार नाही. त्याला मोक्षमार्ग सापडणारच नाही.

४. अखंड आत्मानुसंधानामुळे आत्मसूर्याच्या उजेडाचा साक्षात्कार होईल !

उन्हात चालतांना डोळे उघडे असतील, तेवढाच मार्ग दिसेल, तसेच आपले अवगुण ओळखून, त्यांना नाकारून, अहंकाराला थारा न देता सचेत होऊन अखंड आत्मानुसंधान जो करील, त्याला मोक्ष-मार्ग स्पष्टपणे दिसेल आणि आत्मसूर्याच्या उजेडाचा साक्षात्कार होईल.

५. उच्च कुळात जन्मलेली सुसंस्कृत आई स्वत:ची मुले चांगली व्हावीत; म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत असते, तसेच श्री गुरु शिष्यांसाठी करत असणे

ब्रह्मस्वरूप श्री गुरु शुद्ध आनंदस्वरूप असतो. त्यामुळे तो भेदभाव करत नाही. समुद्र जसा लाटा-फेसांनी व्यापलेला असतो, तसाच सद्गुरु हा स्थिर-चिर प्रपंचात एकाच रूपात व्यापलेला असतो. गुरुवात्सल्य तुम्हाला अपरिचित नाही. उच्च कुळात जन्मलेली सुसंस्कृत आई स्वत:ची मुले चांगली व्हावीत; म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत असते, तसेच श्री गुरु स्वत:च्या शिष्यांसाठी करत असतात. एक अस्सल वैद्य रोग्याला प्रभावी ठरणारी औषधे आणि ‘इंजेक्शन्स’ रोग न्यून होईपर्यंत सतत देतो, तसेच तेही ज्ञानी आणि विज्ञानात रुची असलेल्या शिष्यांचा उद्धार करण्यात, भवरोगी शिष्यांना ज्ञानौषधे अन् आपल्या दैवी शक्तीची ‘इंजेक्शन्स’ देऊन रोगाचा शक्तीपात करतात. त्यांची पूर्ण सिद्धता होईपर्यंत त्यांचे औषधोपचार चालूच असतात. याचाच अर्थ असा की, ते आपल्या बळाच्या जोरावर शिष्यांमध्ये पालट घडवून आणतात, त्यांची बाधा दूर करतात, विघ्नपरिहार करतात. त्यासाठी शिष्यानेही आपल्या देहस्थितीची जाणीव त्यांना द्यायला हवी, म्हणजे ते त्यावर उपाय सुचवू शकतात.

६. गुरुकृपा म्हणजे श्री गुरूंनी श्रुतिशास्त्रांचे मंथन करून आणि पुष्कळ साधना करून त्यांचे सार शिष्यांच्या अनुभवाला आणून देणे

शिष्यात मुमुक्षुत्वाची भावना तीव्र असेल, तर त्याने न चुकता साधना करावी. अहंकार, प्रतिष्ठा अशा दुर्गुणांना वाव न देता त्यांचा त्याग करावा. श्री गुरूंच्या उपदेशांचे पालन करून जेवढ्या लवकर वैराग्यसंपन्न होऊन ज्ञानोपासना करील, तेवढ्या लवकर त्याला आत्मसाक्षात्कार होईल. आई ताक घुसळल्यानंतर लोण्याचा गोळा काढून मुलांच्या हातात ठेवते, तसेच श्री गुरु श्रुतिशास्त्रांचे मंथन करून आणि पुष्कळ साधना करून त्यांचे सार शिष्यांच्या अनुभवाला आणून देतात. यालाच गुरुकृपा म्हणायचे नाही का ?

७. भगवान श्रीधरस्वामी यांचे आशीर्वचन !

माझा तुम्हाला हाच आशीर्वाद आहे की, ‘तुम्ही सारे जण मुक्तीसाधनरूप असलेल्या संपूर्ण गुरुकृपेला पात्र व्हा आणि शीघ्रातीशीघ्र जीवनमुक्ती मिळवून आपला पावन आदर्श असलेल्या सत्चारित्र्यात इतरांचा उद्धार करा, हा माझा हार्दिक आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी आहे.’

– प.प. श्रीधरस्वामी (संदर्भ : सद्गुरुबोधामृत)