DGP Swain On J&K Terrorism : जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांमुळे आतंकवाद वाढला !

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन यांचा दावा !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या प्रादेशिक राजकारणामुळे पाकिस्तान येथील लोकांमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झाला. आतंकवादी ठार होतात, तेव्हा राजकारण्यांकडून आतंकवाद्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांविषयी सहानुभूती दाखवणे, हा तर सामान्य भाग झाला आहे, अशा शब्दांत जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन यांनी काश्मीरमधील आतंकवादासाठी स्थानिक राजकारण्यांना उत्तरदायी ठरवले आहे.

ते एका कार्यक्रमात बोलत होते. स्वेन यांनी त्यांच्या भाषणात ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेचा उल्लेख करत ‘ही संघटना आतंकवाद्यांना धार्मिक पाठबळ पुरवते’, असे सांगितले.

पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन

पोलीस महासंचालक स्वेन पुढे म्हणाले की,

१. प्रादेशिक राजकारणामुळे पाकिस्तानने काश्मीर खोर्‍यातील नागरी समाजातील सर्व महत्त्वाच्या पैलूंमध्ये यशस्वीपणे घुसखोरी केली आहे. याविषयी पुरेसे पुरावेदेखील आहेत. त्यांनी धूर्तपणे सामान्य लोक आणि सुरक्षा कर्मचारी यांना घाबरवले.

२. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना कधीही न केलेल्या गुन्ह्यांसाठी आतंकवाद्यांसमवेत अटक करून कारागृहात टाकण्यात आले.

३. वर्ष २०१४ मध्ये २ मुलींचा बुडून झालेला मृत्यूची घटना वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आली होती. त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे घोषित करून काश्मीर खोर्‍यात संप आणि दंगली करण्यात आल्या. नंतर सीबीआय आणि एम्स फॉरेन्सिक (न्यायवैद्यक प्रयोगशाळा) यांच्या तपासात त्या मुलींचा मृत्यू, हा अपघात असल्याचे सिद्ध झाले.

संपादकीय भूमिका

गेली ३५ वर्षे जे कोणत्याच पोलीस अधिकार्‍याने सांगण्याचे धाडस केले नाही, ते  आर्.आर्. स्वेन यांनी केले आहे. आता अशा राजकारण्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईही करणे आवश्यक आहे !