घराबाहेर विनाअनुमती बांधकाम केल्याचे प्रकरण !
पुणे – बाणेर परिसरातील ‘नॅशनल हाऊसिंग सोसायटी’मधील प्लॉट क्र. ११२ मधील ‘रो-हाऊस’मध्ये वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पदपथावर (फूटपाथवर) ३ फूट रुंद, २ फूट उंच आणि ६० फूट लांबीचे विनाअनुमती बांधकाम केले आहे. हे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असून ते येत्या ७ दिवसांच्या आत स्वत:च्या व्ययाने काढून घ्यावे. न काढल्यास महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काढून टाकण्यात येईल, अशा आशयाची नोटीस महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकार्यांनी भिंतीवर चिकटवली आहे. मनोरमा खेडकर यांच्या विरोधात मुळशी तालुक्यातील शेतकर्यांच्या भूमीचा ताबा घेण्याच्या वेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण केल्याच्या प्रकरणी पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.