Golden Temple  Pictures Of  Khalistanis : सुवर्ण मंदिरात ३ खलिस्तानी आतंकवाद्यांची छायाचित्रे लावण्याची अकाल तख्तच्या प्रमुखाची राष्ट्रघातकी मागणी !

सुवर्ण मंदिर

अमृतसर – शिखांच्या ‘अकाल तख्त’चे जथेदार (प्रमुख) ग्यानी रघबीर सिंह यांनी  ‘शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती’कडे (एस्.जी.पी.सी.कडे) सुवर्ण मंदिराच्या परिसरात असलेल्या केंद्रीय शीख संग्रहालयात मृत झालेले खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर, परमजीतसिंह पंजवार आणि गजिंदर सिंह यांची छायाचित्रे लावण्याची मागणी केली. एस्.जी.पी.सी. आणि दल खालसा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जथेदार ग्यानी रघबीर सिंह यांनी ही मागणी केली. ‘अकाल तख्त’ने या ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना ‘शहीद’ म्हणून संबोधले आहे.

‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंह

पंजवार हा ‘खलिस्तानी कमांडो फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख होता. तो ६ मे २०२३ या दिवशी पाकिस्तानातील लाहोर येथे मारला गेला. भारत सरकारने आतंकवादी घोषित केलेल्या हरदीपसिंह निज्जर याची कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया येथील सरे येथे हत्या करण्यात आली. यासाठी कॅनडाने भारतावर आरोप केला होता.

खलिस्तानी आतंकवादी गजिंदर सिंह याला वाहण्यात आली श्रद्धांजली !

‘गुरुद्वारा शहीद गंज बाबा गुरबक्ष सिंह’ येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे ग्यानी रघबीर सिंह उपस्थित होते. या सभेत खलिस्तानी आतंकवादी गजिंदर सिंह याला श्रद्धांजली वाहण्यात आली. गजिंदर सिंह याच्या नेतृत्वाखाली खलिस्तानी आतंकवाद्यांनी वर्ष १९८१ मध्ये ‘इंडियन एअरलाइन्स’च्या विमानाचे अपहरण केले होते. अपहरणानंतर विमान पाकिस्तानच्या लाहोरला नेण्यात आले. खलिस्तानी आतंकवादी जरनैल सिंह बिंद्रनवाले याच्या सुटकेसाठी त्याने हे कृत्य केले होते. गजिंदर सिंह याचे ३ जुलै २०२४ या दिवशी पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले.

गजिंदर सिंग यांच्याविषयी ग्यानी रघबीर सिंह म्हणाले की, त्याने कधीही शीख तत्त्वांशी तडजोड केली नाही, तसेच तो सरकारपुढे झुकला नाही. वर्ष १९९५ मध्ये पाकिस्तानच्या कारागृहातून सुटल्यापासून तो भटकत होता.

संपादकीय भूमिका

शिखांच्या काही धार्मिक संघटना आणि त्यांचे नेते हे खलिस्तानधार्जिणे आहेत. त्यामुळे खलिस्तानवाद संपावायचा असेल, तर प्रथम अशा संघटनांच्या नेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे !