G7 Nations : ‘भारत-मध्यपूर्व-युरोप’, या व्यावसायिक मार्गिकेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध ! – ‘जी ७’ राष्ट्रे

रेल्वेमार्ग आणि बंदरे यांच्या माध्यमातून भारत पश्‍चिम आशिया अन् युरोप यांना जोडला जाणार !

अपुलिया (इटली) – भारत, पश्‍चिम आशिया आणि युरोप यांना जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक ‘आयमेक कॉरिडॉर’ या व्यावसायिक मार्गिकेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध असल्याचे ७ औद्याोगिक राष्ट्रांच्या (‘जी ७’च्या) समूहाने येथील शिखर परिषदेत सांगितले. ‘जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक यांना चालना देणारे उपक्रम विकसित करण्यासाठी पूरक प्रयत्नांना प्रोत्साहन देऊ’, असेही ‘जी-७’ राष्ट्रांनी या वेळी नमूद केले.

दक्षिण इटलीतील अपुलिया शहरात ‘जी-७’ परिषद नुकतीच पार पडली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विशेष निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेस उपस्थित राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये नवी देहलीत आयोजित केलेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

काय आहे ‘आयमेक कॉरिडॉर’ ?

‘आयमेक कॉरिडॉर’ म्हणजे इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (भारत-मध्यपूर्व-युरोप दळणवळण मार्गिका) होय ! या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्‍चिम आशिया आणि युरोप यांना रेल्वेमार्ग आणि बंदरे यांच्या माध्यमातून भारताला जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपीय महासंघ, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका या  देशांचा समावेश आहे. हा प्रकल्पाकडे तो कुख्यात चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’, तसेच ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’, या प्रकल्पांना शह देण्यासाठी चालू केल्याचे पाहिले जाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मधून इटली बाहेर पडल्याने चीनला तो धक्का असल्याचे म्हटले गेले.