कीव – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे तो उद्ध्वस्त झाला आहे. युद्ध चालू ठेवण्यासाठी युक्रेनला पैशांची आवश्यकता भासू लागली आहे. ती भागवण्यासाठी युक्रेनने सरकारी मालमत्ता विकण्याचे ठरवले आहे. देशातील ऐतिहासिक हॉटेल्स, मॉल (व्यापारी संकुल), खाण, रासायनिक इत्यादी सरकारी कारखान्यांची विक्री केली जाणार आहे. त्याचा लिलाव लवकरच होणार आहे. देशातील १४ मजली हॉटेलसाठी सर्वांत आधी २०९ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. युक्रेनला युद्ध चालू ठेवण्यासाठी ४१ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.
युक्रेन ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत !
‘सरकारी मालमत्तांच्या विक्रीतून युद्धासाठी लागणारा खर्च भागवता येईल’, असे युक्रेनला वाटते. युक्रेनच्या उपअर्थमंत्री ओलेक्सी सोबोलेव्ह म्हणाल्या, ‘‘देशाची आर्थिक स्थिती चांगली राखणे आणि रशियाविरुद्धचे युद्ध जिंकणे, या दोन्ही गोष्टींसाठी मोठा निधी लागणार आहे. त्यासाठी आम्हाला इतर पर्यायही शोधावे लागतील. युक्रेन यावर्षी ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत आहे. परदेशी गुंतवणूक आणण्याचीही आमची योजना आहे.’’
अमेरिकेपेक्षा जर्मनीकडून युक्रेनला अधिक साहाय्य !
रशियाच्या विरोधातील गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत युक्रेनला जगभरातून सर्वाधिक साहाय्य जर्मनीने केली आहे. जर्मनीने आतापर्यंत अनुमाने ३ अब्ज युरोचे साहाय्य युक्रेनला दिले आहे. अमेरिकेने आतापर्यंत २.५३ अब्ज युरोचे सहाय्य केले आहे. अमेरिकेने युक्रेनला ४३ अब्ज युरोची शस्त्रास्त्रे पुरवली आहेत.
शहरांच्या सुरक्षेसाठी अमेरिका युक्रेनला देणार हवाई प्रतिबंधक प्रणाली !
रशियाच्या हवाई आक्रमणांपासून शहरांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका युक्रेनला हवाई प्रतिबंधक प्रणाली देणार आहे. उभय देशांतील उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ही प्रणाली पोलंडमार्गे युक्रेनपर्यंत पोहोचवली जाईल.