Tibet Name Change : भारत तिबेटमधील ३० भागांची नावे पालटून नवा नकाशा प्रसिद्ध करणार !

अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावे पालटणार्‍या चीनला भारताचे प्रत्युत्तर !

नवी देहली – भारत तिबेटमधील ३० हून अधिक भागांची नावे पालटणार आहे. भारतीय सैन्य लवकरच तिबेटमधील या ३० भागांच्या नावांच्या सूचीसह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा नकाशाही प्रसिद्ध करणार आहे. चीनने एप्रिलमध्ये अरुणाचल प्रदेशातील ३० भागांची नावे पालटली होती. याआधी चीनने वर्ष २०२१ मध्ये १५ आणि वर्ष २०१७ मध्ये ६ भागांची नावे पालटली होती. चीन सरकार या भागांवर त्याचा अधिकार सांगत आहे. चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय भाषेतील जुन्या नावांवर आधारित आहेत नवीन नावे !

तिबेटमधील क्षेत्रांची नावे पालण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. त्यानंतर भारतीय भाषेतील जुन्या नावांच्या आधारे या ठिकाणांना नवीन नावे देण्यात आली आहेत. भारतीय सैन्याच्या माहिती युद्ध विभागाकडे या ठिकाणांची नावे पालटण्याचे दायित्व आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशला कधीही ‘भारतीय राज्य’ म्हणून मान्यता दिली नाही. त्यांनी अरुणाचल प्रदेशचे वर्णन ‘दक्षिण तिबेटचा भाग’, असे केले आहे. भारताने तिबेटचा प्रदेश कह्यात घेऊन तो ‘अरुणाचल प्रदेश’ बनवल्याचा आरोप चीनने केला आहे.