१. वारंवार होणार्या गंभीर आजारांमुळे पत्नीला रुग्णालयात भरती करावे लागणे
‘वर्ष २०२३ च्या मार्चमध्ये माझी पत्नी सौ. मंगल हिला मूत्रमार्गामध्ये संसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) झाला होता. त्याविषयी आम्हाला फार उशिरा कळले. किडनीमध्ये पू झाला होता. त्यामुळे तिच्या मूत्रपिंडालाही संसर्ग होऊन तिला रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. तिच्यावर उपचार केल्यावर ती बरी झाली. वर्ष २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये तिच्या मूत्राशयात खडा झाला. तेव्हा उपचारासाठी तिला पुन्हा रुग्णालयात भरती करावे लागले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिला अकस्मात् दिसणे बंद होऊन पक्षाघाताचा सौम्य झटका आला आणि तिला पुन्हा रुग्णालयात भरती करावे लागले.’ असे सतत चालले होते.
२. प्रकृती गंभीर झाल्याने पत्नीला अतीदक्षता विभागात ठेवणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पत्नीसाठी नामजपादी उपाय सांगणे
जानेवारी २०२४ मध्ये पत्नी अकस्मात् पुन्हा आजारी पडली आणि तिला अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. हे तिचे शेवटचे आजारपण ठरले. तेव्हा आम्हाला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या; मात्र देवाच्या कृपेने याही अडचणी दूर झाल्या. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पत्नीसाठी नामजपादी उपाय सांगितले. त्यामुळे पत्नीच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होऊन तिला अतीदक्षता विभागातून बाहेर येता आले.
३. पत्नीला नातेवाइकांच्या रुग्णालयात भरती करणे, आधुनिक वैद्यांनी ‘पत्नीची स्थिती गंभीर असून त्या ३ – ४ दिवस जगतील’, असे सांगणे
त्यानंतर आम्ही तिला तिच्या भाच्याच्या (मंगल रेपाळकाकू यांच्या मावसभावाचा मुलगा डॉ. दुर्गानंद भागवत यांच्या) रुग्णालयात ठेवले. ‘पत्नीची प्रकृती चांगली झाली, तर देवाची कृपा आिण दुर्दैवाने चांगली नाही झाली, तरी तिच्या शेवटच्या आजारपणामध्ये औषधोपचार वेळच्या वेळी मिळून तिला तेथे घरच्यासारखे वाटायला हवे’, या उद्देशाने हा निर्णय घेतला. तेथेही तिच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘त्यांची स्थिती गंभीर असून त्या ३ – ४ दिवस जगतील’, असे सांगितले.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या दुसर्या नामजपामुळे अवघ्या पंधरा मिनिटांतच पत्नीच्या प्रकृतीमध्ये पुष्कळ सुधारणा दिसणे
आम्ही आमचे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना तिला भेटण्यासाठी बोलवायचे ठरवले. त्या दिवशी सकाळी परत एकदा सद्गुरु गाडगीळकाका यांच्याकडून दुसरा नामजप मिळाला. तो नामजप आम्ही केला. नामजप चालू केल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच तिच्या प्रकृतीमध्ये पुष्कळ सुधारणा दिसू लागली.
५. रुग्णालयात नातेवाईक आणि जिवलग मैत्रिणी यांना भेटल्यामुळे अन् त्यांनी आणलेले आवडीचे पदार्थ खाल्ल्याने पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण होणे
आम्ही आमचे नातेवाईक आणि पत्नीच्या जिवलग मैत्रिणी यांना रुग्णालयात भेटायला बोलावले. तिचे नातेवाइकांशी आनंदाने बोलणे झाले. तिने नातेवाइकांनी आणलेले खाद्यपदार्थ थोडे खाल्ले. तिला हवे असलेले खाद्यपदार्थ तिने मागून घेऊन खाल्ले. दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलली. या कालावधीत ‘पत्नीच्या खाण्या-पिण्याच्या आणि जवळच्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोलण्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या’, असे माझ्या लक्षात आले.
६. कौटुंबिक मतभेद विसरणे
माझी पत्नी आणि सून (सौ. शर्वरी रेपाळ) यांच्यामध्ये वादविवाद होत असत. पत्नीने सुनेला वेगळे रहाण्यास सांगितले होते. आम्ही पत्नीच्या शेवटच्या भेटीसाठी सुनेला रुग्णालयात बोलावले. मी सुनेविषयी पत्नीला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मी सुनेला क्षमा केली आहे.’’ सुनेनेही सासूबाईंची क्षमा मागितली. त्यामुळे आमच्या समोर असलेली मोठी अडचण दूर झाली. यांमुळे दोघींच्या मनात एकमेकींविषयी पूर्वग्रह राहिला नाही.
१७.१.२०२४ या दिवशी दुपारी ३ वाजता पत्नीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचे निधन झाले.
७. पत्नीच्या निधनानंतर
७ अ. अंत्यविधी शास्त्रानुसार करणे : पत्नीचे पार्थिव नांदणी या गावाहून विटा येथे अंत्यविधीसाठी आणले. आम्ही अग्नीसंस्कार आणि सर्व विधी शास्त्रानुसार केले. सर्वजण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो. सद्गुरु स्वातीताईंनी वेळोवेळी भ्रमणभाष करून आम्हाला धीर दिला. विटा गावात आमच्या समाजामध्ये तिसर्या दिवशीच सर्व विधी करण्याची प्रथा आहे. आम्हाला धर्मशास्त्राप्रमाणे सर्व विधी करायचे होते. त्यासाठी आम्ही समाजाच्या प्रमुखांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आम्ही सर्व विधी तिसर्या दिवशी न करता त्या त्या दिवशी करणार आहोत.’’ त्यावर त्यांनी सांगितले, ‘तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सर्व विधी करा.’’ सर्व विधी होईपर्यंत आम्ही सगळ्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला. आम्ही सर्व स्थिर होतो.
७ आ. घरी भेटायला आलेल्या व्यक्तींना जाणवलेली सूत्रे
१. ‘इथे आम्हाला पुष्कळ शांत आणि स्थिर जाणवत आहे.
२. एरव्ही निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी भेटायला गेल्यानंतर जाणवणारे दुःख आणि दाब येथे काहीच जाणवत नाही.
३. इथे चांगले वाटत आहे.’
७ इ. कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
१. विटा येथे मंत्राग्नी देण्याची काहीच सोय नाही; कारण पुरोहित उपलब्ध होत नाहीत. सनातन संस्थेच्या साधकांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला पुरोहित उपलब्ध करून दिले. पुरोहित पंढरपूर येथून म्हणजे शंभर किलोमीटर अंतरावरून विटा गावात येऊन त्यांनी मंत्राग्नी दिला.
२. ‘विधी चालू असतांना आम्ही स्मशानात आहोत’, असे वाटत नव्हते.
३. पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे मंत्राग्नीसाठी खोबरे, तूप आणि सनातनचा भीमसेनी कापूर यांचा वापर केला. त्या वेळी ज्वाळा लगेचच पेटल्या आणि त्या पाच फूट एवढ्या उंच होत्या.
४. स्मशानात काम करणार्या कामगारांनी सांगितले, ‘‘आम्ही डिझेल घातले, तरी लाकडे पटकन पेट घेत नाहीत आणि ज्वाळाही इतक्या उंच नसतात. इथे तर पाचच मिनिटांत पुष्कळ मोठ्या ज्वाळा दिसत आहेत.
८. पत्नीच्या आजारपणातील कठीण प्रसंगाला सामोरे जातांना शिकायला मिळालेली सूत्रे
अ. साधना केल्यामुळे जीवनातील कोणत्याही दुःखद प्रसंगाला शांत आणि स्थिरपणे तोंड देता येते.
आ. आपल्या प्रत्येक प्रसंगामध्ये सनातन संस्थेचे संत आणि साधक पाठीशी असून ते मार्गदर्शन अन् साहाय्यही करतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाचा ताण येत नाही.
इ. ‘देव आपल्या समवेतच आहे’, याची अनुभूती घेता येते.
ई. जीवनामध्ये साधना हीच श्रेष्ठ आहे.
९. कुटुंबियांनी मोठी गुरुकृपा अनुभवल्याचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगणे
पत्नीच्या निधनानंतर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भ्रमणभाष करून आमची विचारपूस केली. त्या वेळी आम्ही त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काकूंना रुग्णालयातील अतीदक्षता विभागातून बाहेर येता आले. त्यांनी त्यांच्या नातेवाइकांना भेटणे आणि त्यांना हवे वाटणारे खाद्यपदार्थ खाता येणे यांमुळे त्यांच्या बर्याच इच्छा पूर्ण झाल्या; म्हणून त्यांच्या सूक्ष्म देहाला शांतपणे पुढे जाता आले. त्यांनी आणि तुम्ही कुटुंबियांनी मोठी गुरुकृपा अनुभवली आहे.’’
‘आमच्या कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर केवळ गुरुकृपा आणि साधकांनी केलेले साहाय्य यांमुळे आम्हाला सहजपणे पेलता आला’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राजाराम काशीनाथ रेपाळ (वय ७२ वर्षे) विटा, जिल्हा सांगली. (७.५.२०२४)
|