कणकवलीमध्ये २ बांगलादेशी महिलांना घेतले कह्यात
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात दोडामार्ग शहर आणि कणकवली येथे बांगलादेशींच्या शोधासाठी पोलिसांनी शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) राबवली. दोडामार्ग येथे संशयास्पद असे काही आढळले नाही. असे असले, तरी येथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंविषयी २ दिवसांत पोलीस ठाण्यात माहिती न दिल्यास संबंधित घरमालकांच्या विरोधात थेट गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची चेतावणी पोलिसांनी दिली आहे. कणकवली रेल्वेस्थानकात जिल्हा आतंकवादविरोधी पथकाने २ बांगलादेशी महिलांना कह्यात घेतले आहे. येथील पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती
त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दोडामार्ग शहरात दिवसेंदिवस परप्रांतियांचे वास्तव्य वाढत असल्याच्या, तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलिसांनी शहरातील सर्व घरमालकांना त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून रहात असलेल्या व्यक्ती आणि विशेषत: परप्रांतीय व्यक्ती यांची माहिती पोलीस ठाण्यात देण्याची सूचना केली होती. या सूचनेचे अनेकांकडून पालन झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी धाटवाडी आणि शहरातील आयी रोड परिसरात शोधमोहीम राबवली. या तपासणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांची पहाणी केल्यानंतर कुणीही बांगलादेशी नसल्याचे निष्पन्न झाले. या वेळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस हवालदार विठोबा सावंत, राजेश गवस यांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत आदी उपस्थित होते.