६ जणांना अटक
पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – मडगाव येथे एका अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याचा छळ केल्याच्या प्रकरणी ६ जणांना मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. या ६ जणांपैकी ३ जण अल्पवयीन आहेत. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार १० जानेवारी या दिवशी खारेबांद, मडगाव येथील शाहबाज हवालदार आणि साद अर्काटी, तसेच आर्लेम येथील महंमद किल्लेदार यांसह अन्य ३ अल्पवयीन मुले यांनी एकत्र येऊन अवैधपणे माझ्या अल्पवयीन मुलाला गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या, तसेच त्याच्या थोबाडीत मारले आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार मुलाच्या पालकांनी मडगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली. याखेरीज या संशयितांनी या घटनेचा ‘व्हिडिओ’ प्रसारमाध्यमातून प्रसारित करून माझ्या मुलाची अपकीर्ती केली, असेही त्या तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी अन्वेषण करून अल्पवयीन मुलाला मारहाण करणार्या या ६ जणांना अटक केली. यापैकी तिघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून ३ अल्पवयीन मुलांना ‘अपना घर’ या मुलांच्या सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.