Israel And Hamas Ceasefire : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी ४ टप्प्यांत होणार !

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांमध्ये १५ महिन्यांपासून युद्ध चालू असले, तरी आता युद्धविरामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. युद्धविरामाचा हा करार बनवण्यात हमास-इस्रायल यांच्या व्यतिरिक्त अमेरिका, इजिप्त आणि कतार यांचाही सहभाग आहे. हा करार ४ टप्प्यांत राबवण्यात येणार असून करारानुसार ‘हमास ओलिसांची सुटका करील’, ‘बफर झोन (दोन्ही गटांमधील भूभाग जो तटस्थ असतो) तयार होईल’ आणि ‘इस्रायल १ सहस्र पॅलेस्टिनींची सुटका करील.’ प्रथमच इस्रायल आणि हमास यांची शिष्टमंडळे कतारमधील एकाच इमारतीत अप्रत्यक्ष चर्चा करत आहेत.

युद्धविरामाचे टप्पे !

१. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम ४ टप्प्यांत लागू होईल. पहिल्या टप्प्यात कराराच्या पहिल्या दिवशी हमास ३ ओलिसांची सुटका करणार आहे.

२. युद्धविराम लागू झाल्यानंतर दुसरा टप्पा सातव्या दिवशी लागू होईल. त्या दिवशी हमास आणखी ४ ओलिसांची सुटका करेल. यानंतर इस्रायल उत्तर गाझातून निर्वासित होऊन दक्षिणेत रहाणार्‍या पॅलेस्टिनींना परत येण्याची अनुमती देईल. या करारात पूर्व आणि उत्तर सीमांवर ८०० मीटरचे ‘बफर झोन’ करण्याची तरतूद आहे. ही प्रक्रिया ४२ दिवस चालेल.

३. तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्याची चर्चा युद्धविराम कराराच्या १६ व्या दिवशी चालू होईल.