श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरीदेवी यांच्या विवाह सोहळ्याने वार्षिक रथोत्सवाची सांगता !

मूर्तींना विशेष महाअभिषेक !

श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरीदेवी 

सातारा, १५ जानेवारी (वार्ता.) – येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरातील सर्व देवतांच्या वार्षिक रथोत्सव सोहळ्याची सांगता झाली. रथोत्सव झाल्यानंतर श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरीदेवी यांच्या पंचधातूच्या भव्य मूर्ती मंदिरातील गाभार्‍यात ठेवण्यात आल्या. नंतर ब्रह्मवृंदांनी मूर्तींना विशेष महाअभिषेक घातला.

पाणी, दूध, दही, मध, तूप, चंदन, भस्म, विविध फळांचे काप, उसाचा रस, नारळ-शहाळ्याचे पाणी यांनी दोन्ही मूर्तींना विशेष अभिषेक घालण्यात आला. नंतर चंदनाचा सुशोभित केलेला असा भव्य हार घातला. विविध अलंकारांनी आणि सुवासिक फुलांनी दोन्ही मूर्तींना सजवण्यात आले. दोन्ही मूर्तींच्या मध्ये अंतरपाट धरून ब्रह्मवृंदांनी मंगलाष्टका म्हटल्या. लग्न सोहळा झाल्यानंतर सुवासिनींनी श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरी देवीची दृष्ट काढून सर्वांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली. यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचे वितरण झाले.

या वेळी पुणे येथील श्री सत्य साई निकेतन हायस्कूल आणि वसुंधरा ग्रीन बायो एनर्जीचे अध्यक्ष श्री. सुदर्शन मुदलियार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विजयालक्ष्मी मुदलियार, नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, त्यांच्या पत्नी सौ. उषा शानभाग, व्यवस्थापक वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट्टगुरुजी, वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी, मंदिर व्यवस्थापक चंद्रन, संकेत शानभाग, रमेश हलगेकर आदी मान्यवर आणि शिवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने रथपूजन

रथोत्सवातील मिरवणुकीच्या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्री आनंद नटराज आणि श्री शिवकामसुंदरी देवीच्या रथाचे पूजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश तुपे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे ह.भ.प. बबनराव सापते महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सनातन संस्थेच्या सौ. संतोषी माने उपस्थित होते.