Excavations At Bhojshala : धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत उत्खननात सापडल्या हिंदु देवतांच्या प्राचीन मूर्ती !

मुसलमान पक्षाचा आक्षेप

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेत भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सर्वेक्षण चालू आहे. सर्वेक्षणाच्या ८० व्या दिवशी श्री गणेश, माता वाग्देवी, माता पार्वती, हनुमान आणि इतर देवता यांच्या मूर्ती बंद खोलीत पायर्‍यांखाली आढळून आल्या. यासमवेतच पारंपरिक आकार असलेले शंख-चक्र आणि शिखर यांसह सुमारे ७९ प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. ही बंद खोली दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’च्या याचिकाकर्त्याने ‘भोजशाळेला प्रमाणित करणे, ही आजपर्यंतची सर्वांत मोठी संधी आहे’, असे म्हटले आहे. या सर्व मूर्ती आणि इतर वस्तू नंतर येथे ठेवण्यात आल्याचा आक्षेप मुसलमान पक्षाने केला आहे. (सत्य स्वीकारल्यास मुसलमान पक्ष तोंडघशी पडेल, अशी भीती सतावत असल्याने मुसलमान पक्ष काल्पनिक दावा करत आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. न्यायालयात सत्य समोर येणारच आहे ! – संपादक)


१. ‘जी.पी.आर्.’ मशीनद्वारे पडताळणी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हे  सर्वेक्षण चालू करण्यात आले. एक मजला हटवल्यानंतर सर्वेक्षण करणार्‍या पथकाला खोलीचे उत्खनन केले असता भूमीखाली प्रथम श्री गणेश, माता वाग्देवी, माता पार्वती, महिषासुरमर्दिनी आणि हनुमान यांच्या मूर्ती सापडल्या. काही मूर्ती दीड फूट उंच, तर काही दोन ते अडीच फूट उंच आहेत.

२. यज्ञशाळेतील माती काढली असता हिंदु धर्मातील अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या. हिंदु पक्षाचे गोपाल शर्मा म्हणाले की, सापडलेले अवशेष प्रमाणित आहेत. ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे सदस्य आणि याचिकाकर्ते आशिष गोयल यांनी दावा केला आहे की,  भोजशाळेतील ही खोली वर्षानुवर्षे बंद होती.

३. मुसलमान पक्षाच्या वतीने अब्दुल समद यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण पूर्णत: गोपनीयपणे केले जात आहे. माती काढण्यासह आवारात सपाटीकरणाचे कामही करण्यात आले आहे. या वेळी सापडलेले अवशेष नंतर ठेवण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला.