६० दिवसांत ३०८ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल !

पिंपरी – विविध कर सवलतींचा लाभ घेत २ लाख ७१ सहस्र ५०३ मालमत्ताधारकांनी करभरणा केला आहे. त्यामुळे अवघ्या ६० दिवसांत ३०८ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल झाला आहे. कर सवलतीसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २ लाख ३९ सहस्र ४० निवासी मालमत्ताधारक, २० सहस्र ७९९ बिगर निवासी मालमत्ताधारक, ८ सहस्र ८८ मिश्र, १ सहस्र ९७२ औद्योगिक, तर १ सहस्र ६६१ मोकळ्या भूमी असणार्‍या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. कर सवलत योजना बिलामध्ये नमूद केल्याप्रमाणे ३० जूनपर्यंत लागू असून नागरिकांनी महिना अखेरची वाट न पहाता तात्काळ कराचा भरणा करावा. कर संकलन विभागाने पहिल्या तिमाहीमध्ये ५०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

कर संकलनासाठी शहरात १७ प्रभाग आहेत. यामध्ये वाकड प्रभागमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९ सहस्र ७५९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे; तर पिंपरी नगर प्रभागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३० सहस्र १९ मालमत्ताधारकांनी भरला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख ३० सहस्र नोंदणीकृत मालमत्ता आहेत. यापैकी २ लाख ७१ सहस्र ५०३ मालमत्ताधारकांनी ३०८ कोटी ४२ लाख ३१६ रुपयांचा कर जमा केला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.