महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६२० एकर भूमी बळकावल्याचे प्रकरण !
सातारा, १ जून (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी येथील ६२० एकर भूमी वस्तू आणि सेवा कर आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले होते. या प्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यामुळे सातारा जिल्हाधिकार्यांनी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे आणि पियुष बोगीरवार यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ११ जून या दिवशी सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश तिघांना देण्यात आले आहेत. अनुपस्थित राहिल्यास संबंधीत भूमी शासनाधीन करण्याची कार्यवाही चालू करण्यात येईल, असे नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण…?
गुजरात येथील वस्तू आणि सेवा कर आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी या गावातील ६२० एकर भूमी कवडीमोल भावाने ग्रामस्थांकडून विकत घेतली, तसेच या भूमीवर अनुमाने ४० एकर जागेत अनधिकृत ‘रिसॉर्ट’ बांधल्याचे माहिती अधिकाराच्या माध्यमातून स्पष्ट झाले. यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्यांसह विविध शासकीय अधिकार्यांना निवेदन देऊन याविषयीची माहिती दिली. याची गंभीर नोंद घेत सातारा जिल्हाधिकार्यांनी चौकशी समिती नेमून वाईच्या उपविभागीय अधिकार्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. वाई येथील विद्यमान आमदार मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.