गुरुदेव, श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या संदर्भातही ‘तुम्हीच जिंकलात, आम्ही हरलो !’

प.पू. भक्तराज महाराज

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत कधीही स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेतला नाही. वर्ष २०१५ पासून सनातनला मार्गदर्शन करणार्‍या विविध महर्षींच्या आज्ञेचे पालन म्हणून साधक गुरुदेवांचा वाढदिवस साजरा करत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना प्रारंभापासून कार्यरत साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे स्मरण होणे

११.५.२०२३ या दिवशी गुरुदेवांचा झालेला जन्मोत्सव सोहळा हा आतापर्यंत साजर्‍या केलेल्या जन्मोत्सव सोहळ्यांतील सर्वांत मोठा जन्मोत्सव सोहळा होता. तो ‘ब्रह्मोत्सवा’च्या स्वरूपात साजरा करण्यात आला. तो पहातांना सनातन संस्थेच्या प्रारंभापासून सेवारत असणार्‍या साधकांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या अमृत महोत्सवाची आठवण आली नसेल, तरच नवल !  वर्ष १९९५ मध्ये साजरा झालेल्या प.पू. बाबांच्या अमृतमहोत्सवाचे आयोजन साक्षात् गुरुदेवांनीच केले होते. आमच्यासारख्या ज्या साधकांनी तो अमृत महोत्सव पाहिला नाही; पण त्याविषयी वाचले आहे, त्यांनाही ब्रह्मोत्सवावरून तेव्हाच्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या भव्य-दिव्यतेची कल्पना आली.

श्री. सागर निंबाळकर

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कुठलीही आधुनिक साधने हाताशी नसतांना प.पू. भक्तराज महाराज यांचा साजरा केलेला भव्य-दिव्य अमृतमहोत्सव !

२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर केलेले सर्व व्यवस्थांचे नियोजन ! : वर्ष १९९५ मध्ये प.पू. बाबांचा अमृतमहोत्सव साजरा करायचा होता. वर्ष १९९४ च्या गुरुपौर्णिमेपासूनच गुरुदेवांनी अमृतमहोत्सवाचे संपूर्ण दायित्व घेऊन मोठ्या कौशल्याने त्याचे नियोजन केले होते. त्यांनी ‘१० सहस्र भक्तांसाठी कार्यक्रमाच्या मुख्य मंडपाचे नियोजन’, ‘बाहेरून येणार्‍या ३ सहस्र भक्तांच्या निवासाची व्यवस्था’, ‘संतांच्या निवासाची सोय’, ‘२ सहस्र भक्तांना एकाच वेळी महाप्रसाद ग्रहण करता येईल’, इतक्या मोठ्या भोजनमंडपाची व्यवस्था’, ‘प.पू. बाबांच्या लाडक्या खंजिरीच्या आकारातील २२ फुटी स्वागतकमान उभी करणे’, ‘प.पू. बाबा आणि त्यांचे श्री गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या पादुकांची मिरवणूक अन् त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणे’, ‘१२ ध्वनीफिती, १६ चित्रफिती आणि ग्रंथ यांचे प्रकाशन करणे, ‘संतांचे सन्मान करणे’, ‘प.पू. बाबांनी श्रीकृष्णाचे वस्त्रालंकार घालून भक्तांना दर्शन देणे’, ‘लघुनाटिका सादर करणे’ इत्यादी वैविध्यपूर्ण गोष्टींचे आयोजन केले होते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उचललेले अमृतमहोत्सवाचे शिवधनुष्य ! : वर दिलेल्या गोष्टी या नियोजनाच्या काही मुख्य कृती होत्या. याखेरीज त्या अनुषंगाने येणार्‍या पुष्कळ गोष्टींचे शेवटपर्यंतचे बारीकसारीक पूर्ण नियोजनही गुरुदेवांनी केले होते. ‘आजच्याप्रमाणे संगणक, भ्रमणभाष यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध नसतांना हे सर्व नियोजन करणे’, हे शिवधनुष्य उचलण्यासारखेच होते. त्यामुळे तेव्हाच प.पू. बाबा म्हणाले होते, ‘‘असा सोहळा कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही !’’ यावरून लक्षात येते, ‘गुरुदेवांनी या सोहळ्याच्या आयोजनाच्या माध्यमातून आदर्श निर्माण केला आणि श्री गुरूंचे मन जिंकले !

३. ब्रह्मोत्सव साजरा करतांना अनेक आधुनिक नवीन साधने आणि साधक यांची उपलब्धता असल्यामुळे तुलनेने तो साजरा करणे सोपे असणे

वर्ष २०१५ पासून वर्ष २०२१ पर्यंत गुरुदेवांचे देवतांच्या रूपातील आश्रमांतर्गत दर्शनसोहळे झाले. वर्ष २०२२ मध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात रथोत्सव साजरा केला. वर्ष २०२३ मध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणावर ‘ब्रह्मोत्सव’ साजरा केला. ब्रह्मोत्सव साजरा करतांना प.पू. बाबांच्या अमृतमहोत्सवाच्या तुलनेत साधकसंख्या आणि नवीन आधुनिक साधने विपुल प्रमाणात उपलब्ध होती, उदा. ‘फ्लेक्स प्रिंटिंग’ यांसारख्या सोप्या सोयी, स्वागतकमानींवरील छायाचित्रे आणि लिखाण यांचे संगणकीय संकलन, समन्वयासाठी प्रत्येकापाशी असलेले भ्रमणभाष इत्यादी. त्यामुळे तुलनेने नियोजन करणे पुष्कळ सुलभ झाले.

४. भगवंताप्रमाणेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना साधकांनी भावपूर्ण अर्पण केलेल्या छोट्या सेवेचेही पुष्कळ कौतुक असणे

गुरुदेवांनी अमृतमहोत्सवाचे केलेले नियोजन पहाता, त्या तुलनेत ‘पुष्पवृष्टी, रथोत्सव, ब्रह्मोत्सव’, असे काही सोहळे स्वतंत्ररित्या साजरे करणे’, ही पुष्कळ लहान सेवा आहे; पण आम्हा साधकांच्या अल्प क्षमतेप्रमाणे केलेली ती सेवा, म्हणजे गुरुचरणांवर अर्पण केलेली कृतज्ञतापुष्पेच म्हणावी लागतील ! भगवान श्रीकृष्ण म्हणतो,

‘पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भत्तया प्रयच्छति ।
तदहं भत्तयुपहृतमश्नामि प्रयतात्मनः ।।

(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २६)

अर्थ : जो कुणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या आणि निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने ग्रहण करतो.

त्याचप्रमाणे गुरुदेवांनाही साधकांच्या लहान-लहान कृतींचेही पुष्कळ कौतुक असते. त्यामुळे असे सोहळे झाल्यावर ते आयोजक साधक आणि त्यात सेवारत असलेले साधक यांचे पुष्कळ कौतुक करतात.

सर्व साधकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक एवढेच म्हणावेसे वाटते, ‘गुरुदेव, आपला, श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या संदर्भातही नेहमीप्रमाणे तुम्हीच जिंकलात ! आम्ही हरलो !’

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२४)