सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘मी वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत व्यवहार आणि मायेतील गोष्टी यांत अडकलो होतो. तेव्हा मनाविरुद्ध प्रसंग घडल्यावर मला दुःख होऊन ‘मी एकटा पडलो आहे’, असे वाटत असे. वर्ष १९८९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाल्यावर त्यांनी मला टप्प्याटप्प्याने साधना शिकवून माझी आध्यात्मिक प्रगती करून घेतली. तेव्हापासून ते मला एकटेपणा आणि निराधार अवस्था यांतून आनंदसागरात घेऊन जात आहेत.
मायेच्या दाटीत असूनही होतो मी एकटा ।
गुरुकृपेच्या छत्रछायेत झालो मी सर्वांचा ।। १ ।।
मायेच्या माणसांसह असूनही होतो मी अनाथ ।
गुरुमाऊलींच्या (टीप १) पंखाखाली झालो मी सनाथ ।। २ ।।
मायेतील संपत्ती मिळवूनही होतो मी भिकारी ।
श्रीमन्नारायणाच्या (टीप २) कृपेने मज पावली महालक्ष्मी ।। ३ ।।
मायेच्या माहितीजालात असूनही होतो मी अज्ञानी ।
ज्ञानवंत गुरूंच्या कृपेने मिळाली मज सरस्वती ।। ४ ।।
मायेतील सुखात असूनही झालो होतो मी त्रस्त ।
पुढे गुरुकृपेने झालो मी प्रसन्न अन् निर्धास्त ।। ५ ।।
मायेच्या दाटीत असूनही भटकत होतो सप्तपाताळांत ।
गुरुकृपेने आता जाईल माझा सूक्ष्मदेह उच्च लोकात ।। ६ ।।
मायेच्या दाटीत असूनही मला नव्हता शाश्वत आधार ।
गुरुमाऊली करत आहे जन्मोजन्मी माझा सांभाळ ।। ७ ।।
मायेच्या दाटीत असूनही झालो होतो मी उदास ।
गुरुमाऊलींनी करावे मजला त्यांचा दासानुदास (टीप ३) ।। ८ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
टीप २ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे.
टीप ३ – ‘साधक हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दास आहेत. मला अशा साधकांच्या चरणांचा दास करावे’, अशी प्रार्थना !’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे, १०२ वे समष्टी संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|