‘मध्यंतरी मला संगीतविषयक माहितीचे टंकलेखन करण्याची सेवा मिळाली होती. ही सेवा करत असतांना मला ‘काही न सुचणे, एकदम अस्वस्थता येणे’ इत्यादी त्रास होत होते. त्या वेळी मला अशी अनुभूतीही येत होती की, ‘हे त्रास माझे शरीर आणि बुद्धी यांना होत आहेत; पण माझे अंतर्मन मात्र सेवेशी पूर्ण एकरूप झाले आहे.’ त्यानंतर देवाने मला संगीताविषयीचे काही विचार आणि सूत्रे सुचवली. ती पुढे दिली आहेत.
१. संगीताविषयी सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान
१ अ. मनात भाव असेल, तर गायकाचे स्वर ईश्वरी तत्त्वाशी एकरूप होतात ! : संगीतातील स्वर हे मनातील भावनांवर अवलंबून आहेत. मनात जसे भाव असतील, तसा त्या सुरांचा मनावर परिणाम होतो. स्वर अचूक लागावेत, यासाठी सराव करायलाच हवा; पण संगीतासाठी मनातील भावही अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले स्वर ईश्वरी तत्त्वाशी लवकर एकरूप होतील !
१ आ. संगीतातील स्वरांशी एकरूप झाल्यावर अंतर्मनातून स्वर ऐकू येतील ! : संगीतातील स्वरांमध्ये प्रथम स्वतःला विसरून स्वरांशी पूर्णपणे एकरूप होणे आवश्यक आहे. नंतर साधना वाढल्यावर आपल्याला आपल्या अंतर्मनातूनच स्वर ऐकू येतील. संगीतातील स्वर आणि मनातील भाव यांमुळे देवाचा स्पर्श अनुभवता येतो. संगीतात भाव आणि स्पंदने यांना महत्त्व आहे.
१ इ. कोणत्याही कलेच्या आरंभी ‘शिवाची शक्ती सहन व्हावी’, यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करावी ! : गायन, वादन, नृत्य आदी कलांना आरंभ करतांना भगवान शिवाला प्रार्थना करावी. प्रत्येक स्वर भगवान शिवाकडूनच येतो आणि तो शिवाकडेच जातो. ‘शिवाची शक्ती सहन व्हावी’, यासाठी त्याला प्रार्थना करावी.
१ ई. संगीताची शक्ती आणि तेज केवळ साधकांनाच सहन करता येणे शक्य ! : ‘संगीतशास्त्र’ हे सोपे शास्त्र नाही, तर ती साध्य करण्याची गोष्ट आहे. संगीतशास्त्रात पुष्कळ शक्ती आहे. ती शक्ती आणि संगीताचे तेज केवळ साधना करणारे जीव अन् उन्नत व्यक्ती यांनाच सहन होते. तेच संगीताची साधना करू शकतात.
१ उ. अहंभावी व्यक्तीने स्वरांचे गायन केल्यास ते शिवापर्यंत न पोचता आपोआप नष्ट होणे; परंतु अहं अल्प असलेल्या व्यक्तीने गायन केल्यास ते शिवापर्यंत पोचून स्वर जिवंत होणे : अहं असलेल्या व्यक्तीने गायन केले, तर त्या तत्त्वाचा परिणाम अधिक वेळ टिकत नाही. ते स्वर आपोआपच नष्ट होतात; कारण व्यक्तीच्या मनातील विचारांचा परिणाम तिच्या स्वरांवर होत असतो. त्यामुळे त्या स्वरांमधे जिवंतपणा नसतो. ते स्वर भगवान शिवापर्यंत पोचत नाहीत आणि त्यातून साधनाही होत नाही. याउलट एखादी उन्नत व्यक्ती, जिच्यामध्ये अहंभाव अल्प प्रमाणात आहे, तिने गायन केल्यावर तिचे स्वर भगवान शिवापर्यंत पोचून ते जिवंत होतात. त्याचा परिणाम अधिक होऊन वातावरण चैतन्यमय आणि आनंदी बनते. यातून तो जीव जलद आध्यात्मिक प्रगती करू शकतो.
१ ऊ. अंतर्मन शुद्ध असल्याविना खरे संगीतशास्त्र शिकता न येणे : मनातील विचारांकडे लक्ष देऊन त्यांत सुधारणा केली, म्हणजेच मनातील विकार दूर केले, तर स्वर आपोआपच सुधारतील ! संगीत अंतर्मनाने शिकले पाहिजे. अंतर्मन शुद्ध असल्याविना आपण खरे संगीतशास्त्र शिकू शकत नाही.
२. संगीतविषयक लिखाणाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
२ अ. ‘भगवान शिवासमोर नृत्य करत असून त्या वेळी लिखाण कानावर पडून ‘ते लिहीत आहे’, असे जाणवणे, त्याच वेळी साधिकेच्या हाताला तीव्र वेदना होत असूनही तिने स्वतःचे अस्तित्व विसरून जाणे : हे लिखाण करत असतांना माझ्या मनाची स्थिती अगदी वेगळी होती. ‘मी भगवान शिवासमोर नृत्य करत आहे. ते सर्व ज्ञान माझ्या कानावर पडत आहे आणि मी ते लिहीत आहे’, असे मला वाटत होते. ती स्थिती अशी होती की, ‘मी ती शब्दांत मांडू शकत नाही’; पण हे सगळे होत असतांना माझ्या हाताला पुष्कळ वेदना होत होत्या. मी माझे अस्तित्व पूर्णपणे विसरले होते. ते काही क्षण अगदी वेगळेच होते.
२ आ. लिखाण लिहितांना सर्व शब्द जलद गतीने सुचणे, थोड्या वेळाने लिखाण बंद करूनही परत आपोआप लिखाणाला आरंभ होणे : हे सर्व लिखाण लिहितांना माझा हात पुष्कळ दुखत होता; पण ते सर्व शब्द एवढ्या जलद गतीने सुचत होते की, त्यामुळे कागदावरील माझे अक्षर अगदी वेगळे येत होते. काही वेळाने मी लिखाण थांबवले, तरीसुद्धा आपोआपच परत लिखाण चालू झाले. जणू काही माझा हात केवळ निमित्तमात्र होता आणि देवच लिखाण लिहून घेत होता.
देवाने माझ्यासारख्या शुद्र जिवाला ते अमूल्य क्षण अनुभवण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. श्रावणी पेठकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२४)
कलेला साधनेची जोड दिल्यावरच अंतर्मनातील संगीत अनुभवता येत असल्याने कलाकाराने कलेसह साधना करणेही आवश्यक !
कु. श्रावणी पेठकर या साधिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतः संगीतक्षेत्राशी संबंधित नाही, तरी तिला संगीतातून साधना होण्याविषयीचे ज्ञान मिळाले. एखाद्या संगीत क्षेत्रातील व्यक्तीने लिहावे, असेच लिखाण तिने केले आहे. ‘साधनेमुळे सूक्ष्मातील कळण्याची क्षमता वाढल्यामुळे आणि साधिकेच्या भावामुळे हे शक्य झाले’, हे आपल्या लक्षात येते.
‘जेव्हा मौखिक गायन बंद होते, तेव्हाच अंतर्मनातील संगीताला आरंभ होतोे’, असे अनेक जाणकारांनी सांगितले आहे. कलेला साधनेची जोड दिल्यावरच अंतर्मनातील संगीत अनुभवता येते. यासाठी कलाकाराने कलेसह साधना करणेही आवश्यक आहे. ‘कलेतून साधना आणि ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय मार्गदर्शन करते.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४७ वर्षे), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.१२.२०२४)
|