पुणे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या १७८ गावे आणि १ सहस्र ३१६ वाड्यावस्त्यांना २५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे आणि ३५३ वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईची झळ बसली आहे. या तालुक्यातील गावे आणि वाड्यांना ८७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरंदर पाठोपाठ आंबेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तालुक्यांतील २९ गावे आणि १५८ वाड्या- वस्त्यांना २३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय टँकरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून ही बाब उघड झाली आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ७८ खासगी विहिरी आणि १९ विंधन विहिरी (बोअरवेल) राखीव ठेवण्यात आल्या आहेत.