एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती आणि प्राचीन गुरु-शिष्य परंपरा यांचा समावेश होणार !

नागरिकांना ३ जूनपर्यंत अभिप्राय-सूचना पाठवण्याचे आवाहन !

मुंबई, २३ मे (वार्ता.) – नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात प्राचीन भारतीय संस्कृती-प्राचीन ज्ञान, नैतिक मूल्ये आदींचा समावेश करण्याचा महत्त्वाचा निर्णय ‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने) घेतला आहे. या अभ्यासक्रमाचे प्रारूप (मसुदा) सिद्ध करण्यात आले असून नागरिकांचे अभिप्राय-सूचना जाणून घेण्यासाठी हे प्रारूप परिषदेच्या ‘https://www.maa.ac.in/’ या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. नागरिकांना ३ जूनपर्यंत अभ्यासक्रमाच्या प्रारूपाविषयीचा अभिप्राय आणि सूचना ‘https://forms.gle/7r5ZRR7eYZ9WtUZ17’ या लिंकवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या इयत्ता ३ ते १२ वीच्या पर्यंतच्या अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत पालट करण्यात येणार आहे. या नवीन अभ्यासक्रमाचा उद्देश सुसंवाद, सलोखा आणि एकसूत्रीपणा आणणे, हा असणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न रहाता चारित्र्यवान, निरोगी, नैतिक आणि संवेदनशील नागरिक घडवणे, हाही या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. या अभ्यासक्रमानुसार उच्च शिक्षण हे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे असणार आहे. भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेला समाज निर्माण करण्याचे ध्येय ठेवून या अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या आवाहनाची प्रत


भारतीय संस्कृतीमधील या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश असेल !

नवीन अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीमधील सभ्यता, परंपरा, वारसा आणि विविधता यांचा समावेश असेल. यांसह भारतातील गणित, तत्त्वज्ञान, कला, योगशास्त्र, अर्थशास्त्र, कृषी, आरोग्यशास्त्र, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, हस्तकला, काव्य, साहित्य आदी विषयांचाही समावेश असणार आहे. भारतीय गुरु-शिष्य परंपरेचा केंद्रीयभूत विचार या अभ्यासक्रमात असणार आहे.


अभिप्राय कसा नोंदवाल ?

अभ्यासक्रमाविषयी अभिप्राय नोंदवतांना त्यामध्ये स्वत:चे नाव, भ्रमणभाष क्रमांक, ई मेल, पत्ता, कार्यालयाचा पत्ता, जिल्हा याची महिती भरावी. अभिप्राय आणि सूचना सप्रमाण आणि कारणासह नोंदवावी. त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ प्रारूपातील तपशील, आवश्यक पालट, पालट करण्याचे कारण, कोणत्या सूत्रामध्ये दुरुस्ती व्हावी असे वाटते  ?, त्याची माहिती, सुधारित लिखाण कसे असावे ?, याचा समावेश असावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केले आहे.


टपालाने अभिप्राय पाठवता येणार !

अभिप्राय टपालाने पाठवायचा असल्यास ‘७०८, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे – ४११ ०३०’ या पत्त्यावर ‘एस्.सी.एफ्.-एस्.ई.’ राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) – २०२४’ असे ठळकपणे लिहून पाठवावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आले आहे.


बातमीसमवेत अभ्यासक्रमाच्या प्रारूपाची (मसुदा) धारिका

Download

संपादकीय भूमिका

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पाश्‍चात्त्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम लागू केला. या अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांना स्थान नसल्यामुळेच सद्यःस्थितीत समाजाचे झालेले अध:पतन हे काँग्रेसचे पाप आहे. याला छेद देऊन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यास लागू करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य आहे !