सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील ४ भ्रष्ट कर्मचार्‍यांना बडतर्फ करा !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तांकडे शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

सांगली, २३ मे (वार्ता.) – येथील रहिवासी भावेश शहा यांसह सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील २८५ हून अधिक अवैध नळजोडणी प्रकरणी महापालिका कार्यालयातील ३ कर्मचार्‍यांसह नितीन आळंदे यांना कार्यमुक्त केले आहे. निलंबित आणि कार्यमुक्त असतांनाही नितीन आळंदे यांनी येथील राजरतन यांची १७ मे या दिवशी अनुमाने ७ सहस्र ५०० रुपये घेऊन अवैध नळजोडणी केली. निलंबित असूनही अवैध नळजोडणी आिण आर्थिक गैरव्यवहार करणारे नितीन आळंदे यांच्यासह महापालिकेतील संबंधित दोषी अधिकार्‍यांना बडतर्फ करावे, तसेच भावेश शहा आणि अन्य यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री. विनायक येडके यांनी निवेदनाद्वारे २२ मे या दिवशी आयुक्तांकडे केली. अशी मागणी २० मे या दिवशीही केली होती. अनागोंदी, संगनमत आणि भ्रष्टाचार प्रकरणात यापूर्वीही निवेदनातून जागृती, तसेच साखळी उपोषण करणारे शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे, शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख उमाकांतजी कार्वेकर, उपतालुकाप्रमुख श्री. विनायक येडके, श्री. धर्मेंद्र आबा कोळी, शहर संघटक श्री. सुजोत कांबळे, श्री. चेतन गायकवाड, श्री. अभिषेक पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका :

निलंबित असूनही अवैध नळजोडणी आणि आर्थिक गैरव्यवहार करण्याचे धैर्य होते, तर कार्यरत असतांना आळंदे यांनी किती अवैध गोष्टी केल्या असतील ?